वर्षेभरात त्यांच्या संशोधन, विचारप्रणालीवर होणार कार्यक्रम
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
मुंबई : महाराष्ट्रातील एक विख्यात प्राच्यविद्यापंडित व सत्यशोधक मार्क्सवादी विचारवंत प्राच्चविद्यापंडित शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी (१९२५-२०२४) वर्षाला मंगळवारी, १७ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. यासाठी त्यांनी विकसित केलेल्या तत्त्वज्ञानावर तसेच यांच्या साहित्य संपदेवर राज्यासह देशभरातील विविध विद्यापीठे, संशोधन संस्था व शैक्षणिक संस्थास्तरावर चर्चासत्र, कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील जन्मशताब्दी महोत्सव समितीसह विविध संशोधन संस्था, साहित्य चळवळीं यांच्या माध्यमातून पाटील यांच्या जीवनसंघर्षांचा उलगडा केला जाणार आहे. यासाठी कृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती जन्मशताब्दी महोत्सव समितीकडून देण्यात आली.
पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात नुकतेच ‘मराठवाडा विदर्भातील लोकसाहित्यातील स्त्रिया’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन तसेच जळगाव येथे दोन दिवसांचे राज्यस्तरीय शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे, तर धुळे येथे जन्मशताब्दी वर्षाचा मुख्य कार्यक्रम मंगळवारी, १७ सप्टेंबर रोजी झाला.
स्वातंत्र्याच्या चळवळीपासून ते गोवामुक्ती आंदोलन व संयुक्त महाराष्ट्राची चळवळीपर्यंत आणि पुढे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवणारे शरद पाटील हे संस्कृत व्याकरणातील मोठे संशोधक होते. त्यांनी संस्कृत व्याकरणाच्या आधारावर भारतीय संस्कृतीतील अनेक मातृदेवता, गणमाता आदींच्या इतिहासाची पुर्नमांडणी करण्याचे ऐतिहासिक कार्य केले. यामुळे देशातील संशोधकांना इतिहासाच्या पुनर्रचनेत महाप्रकल्पाचे महाद्वार इतिहास संशोधकांसाठी खुले केले आहे.
महाराष्ट्राच्या साहित्य व संस्कृतीच्या चळवळीमध्येही पाटलांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. त्यांनी सौत्रान्तिक मार्क्सवादी तत्त्वज्ञान, बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषणपद्धत, जाणीव – नेणिवान्वेषी तर्कशास्त्र यांची मांडणी करून संशोधनाच्या क्षेत्रात ऐतिहासिक कार्य केले. त्यासोबतच त्यांनी भारतात पहिल्यांदाच समाजवादी सौत्रान्तिक सौंदर्यशास्त्राचा पाया रोवला. त्यातून त्यांनी सामाजिक सर्वहारांच्या बाजूच्या सौंदर्यशास्त्रामध्ये द्वैती मनाचा व त्याच्या प्रमाणशास्त्राचा विकास केला. तसेच अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राची मांडणी करून त्यांनी दलित-आदिवासी – ग्रामीण साहित्याची नाळ प्राचीन अब्राह्मणी परंपरेशी जोडण्याचे कार्यही देशात पहिल्यादांच पाटील यांनी आपल्या संशोधन साहित्यातून समोर आणले.
—
शरद पाटील यांची ग्रंथसंपदा
दासशूद्रांची गुलामगिरी (खंड १, भाग १ व २), जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व (खंड २ ), जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती (खंड ३), प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मातृसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद (खंड ४) , बुद्ध, भिक्खू आनंद, विशाखा, भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत, रामायण – महाभारतातील वर्णसंघर्ष, अब्राह्मणी साहित्यांचे सौंदर्यशास्त्र, पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका, शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण : महंमदी की ब्राह्मणी, मार्क्सवाद -फुले-आंबेडकरवाद, स्त्री -शूद्रांचा राजा (नाटक), नामांतर औरंगाबाद व पुण्याचे (२०११) ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.