सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा संपूर्ण देशभरात राबविण्यात येत असून या अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छताविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
या उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमांप्रमाणेच स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येत असून पथनाट्यासारख्या मनोरंजनातून प्रबोधनात्मक माध्यमाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. या पंधरवड्यामध्ये ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान राबविले जात असून त्या अनुषंगाने पथनाट्याच्या माध्यमातून वर्तनावर मिश्किल भाष्य करीत स्वच्छतेचा संस्कार रुजविण्यात आला.
या अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आरंभ क्रिएशन्स नाट्यसमूहाच्या वतीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतेविषयी पथनाट्ये सादर करून हसत-खेळत प्रबोधन करण्यात आले. विशेषत्वाने रेल्वे स्टेशन्स, गणेशोत्सव मंडळे, मुख्य चौक, मार्केट, बस डेपो, मॉल अशा गर्दीच्या ठिकाणी या पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. बेलापूर ते दिघा विभाग कार्यालय क्षेत्रात विविध १६ ठिकाणी झालेली ही पथनाट्ये बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करून सादरीकरण करणाऱ्या कलावंतांचे कौतुक केले.
या माध्यमातून कचरा वर्गीकरण, कचऱ्याची घरातच किंवा सोसायटीच्या आवारात विल्हेवाट, सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्या नागरिकांना त्यापासून जागरूकतेने रोखण्यासाठी ‘टोक दो’ अभियान, गणेशोत्सवात विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर अशा विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. सर्वच ठिकाणच्या पथनाट्यांना नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वी केला.