सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरणहिताय उपक्रमांवरही ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भर देण्यात येत असून ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियानांतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आयोजित करण्यात आलेली ‘स्वच्छता सायक्लोथॉन’ ५०० हून अधिक सायकलपटूंच्या सहभागाने यशस्वीरित्या संपन्न झाली. विशेष म्हणजे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्वत: सायकल चालवित या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊन स्वच्छता व पर्यावरणाचा संदेश प्रसारित केला.
नमुंमपा मुख्यालयाच्या आयकॉनिक इमारतीपासून सुरू झालेली ही स्वच्छता सायक्लोथॉन मुख्यालयासमोरील सर्व्हिस रोडवरून पामबीच मार्गाने टी.एस.चाणक्य चौकापर्यंत गेली व तिथून वळून पुन्हा पामबीच रस्त्याने मुख्यालयासमोर सायक्लोथॉनची सांगता झाली.
या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यात आला तसेच सायकलसारख्या इंधनविरहित वाहनाचा वापर वाढवून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे तसेच स्वआरोग्य जपणुकीचे महत्वही प्रसारित करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, माजी आमदार संदीप नाईक, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे व डॉ. संतोष वारूळे, सहा.आयुक्त डॉ. अमोल पालवे व शशिकांत तांडेल, कार्यकारी अभियंता राजेश पवार व इतर मान्यवर आणि सायकलपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुक्त महोदयांसमवेत उपस्थितांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ घेऊन प्रारंभ झालेल्या या स्वच्छता सायक्लोथॉनमध्ये सहभागी सायकलपटूंना सहभाग पदके देऊन सन्मानीत करण्यात आले. ७ वर्षांच्या लहानग्या सायकलपटूपासून ६८ वर्षांपर्यंतचे ५०० हून अधिक सायकलपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये सहभागी महिला सायकलपटूंची संख्याही लक्षवेधी होती.
लेट्स सेलिब्रेट फिटनेस आणि द लर्नयार्ड या संस्थांच्या सहयोगाने आयोजित या सायक्लोथॉनव्दारे स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रसारित करण्यासोबतच सायकल सारखे वाहन चालवून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी असाही संदेश देण्यात आला.
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत सोमवार, दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजता महापालिका क्षेत्रातील रेल्वे स्टेशन्सची सखोल स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली असून मंगळवार, दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसीच्या सर्व मार्केट्समध्ये सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याप्रसंगी उपस्थित राहून सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.