सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जाणीवजागृती करणाऱ्या व त्यांना यादृष्टीने विचारप्रवृत्त करून त्यांच्या मनावर स्वच्छतेचे नकळत संस्कार रूजविणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेअंतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहेत.
यामध्ये नुकतीच नमुंमपा शिक्षण विभागाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली शालेय स्तरावर घोषवाक्य व प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महानगरपालिकेच्या व खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग घेत आपल्या मनातील स्वच्छतेविषयीच्या भावना अभिव्यक्त केल्या.
यामधील घोषवाक्य स्पर्धा इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता आयोजन करण्यात आली होती. यामध्ये नमुंमपाच्या ५७ प्राथमिक शाळेतील ३७६० विद्यार्थी तसेच खाजगी शाळांतील ६६,५६३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत हा उपक्रम यशस्वी केला.
यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयीच्या घोषवाक्यांविषयी माहिती दिली व घोषवाक्ये लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांनी विविध रंगांच्या कार्ड पेपरच्या पट्ट्या तयार करून त्यावर मार्कर पेनने सुलेखनात घोषवाक्ये लिहून ती प्रदर्शित केली. याव्दारे इतर विद्यार्थ्यांमध्येही घोषवाक्य लिहिण्याची प्रेरणा जागृत करण्यात आली.
अशाच प्रकारे प्रश्नमंजुषा स्पर्धाही महानगरपालिकेच्या ५७ प्राथमिक व२३ माध्यमिक तसेच २९८ खाजगी शाळांमध्येही उत्साहात पार पडली. यामध्ये १०५१२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत हा उपक्रम यशस्वी केला. विशेष म्हणजे या प्रश्नमंजुषा स्पर्धेकरिता शाळांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांनी विषयानुरूप प्रश्नसंच निर्मिती केली होती.
स्पर्धेकरिता स्वच्छतेशी संबंधित विषय देण्यात आले होते. ज्यामध्ये, इ.तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता महात्मा गांधी, संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज, इ.सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता माझ्या स्वप्नातील शहर, स्वच्छतेतून समृध्दीकडे तसेच इ.नववी – दहावी गटाकरिता ऊठ तरूणा जागा हो – स्वच्छतेचा धागा हो आणि स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता हे विषय देण्यात आले होते.
या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांचे पालक व कुटुंबीयदेखील स्वच्छतेशी जोडले गेले व स्वच्छतेचा संदेश घराघरांत प्रसारित झाला. घोषवाक्य स्पर्धेतील १० सर्वोत्तम विद्यार्थ्यांना तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेतील केंद्रनिहाय प्रत्येक गटातून निवडण्यात आलेल्या एका विद्यार्थ्यास अशा ३० विद्यार्थ्यांस पारितोषिके प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. स्वच्छता ही सेवा मोहीमेंतर्गत शालेय स्तरावर आयोजित विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या अर्थात नवी मुंबईचे भविष्य असणाऱ्या मुलांच्या मनावर स्वच्छतेचा संस्कार रूजविण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे.