नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनाला शहराला बकालपणातून मुक्त करण्याचे आदेश देताना तुमच्या आदेशावर केलेल्या कारवाईचा अहवाल मागवून घेण्याची लेखी मागणी एमआयएमचे कोकण विभाग प्रभारी तसेच एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहर हे सुनियोजित शहर असले तरी आज या शहराची अवस्था बकालपणाच्या विळख्यात अडकलेले शहर अशी झालेली आहे. ही अवस्था महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उदासिनतेमुळे झालेली आहे. विशेष म्हणजे पालिका आयुक्तांनी आदेश देऊनही अधिकारी बकालपणा हटविण्यासाठी काहीही करत नाहीत, ही संतापजनक व नवी मुंबईकरांसाठी नामुष्कीची बाब आहे. नवी मुबई शहरात ऐरोली व बेलापुर असे दोन विधानसभा मतदारसंघ येतात व महापालिकेचे १११ प्रभाग आहेत. या दोन विधानसभा मतदारसंघातील १११ प्रभागामधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावर, चौकाचौकात, मैदाने, उद्याने, बसस्थानक, पथदिव्यांवर, गृहनिर्माण सोसायटीच्या संरक्षक भिंतीवर तसेच कानकोपऱ्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनर व होर्डींग लागलेले असतात. अनधिकृत होर्डींग व बॅनरमुळे या शहराला बकालपणा आला असून हे फलक व बॅकर लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे महापालिका प्रशासनाला अधिकार आहेत. पंरतु महापालिका प्रशासन अनधिकृत बॅनर व होर्डींगमुळे पालिका प्रशासनाचा दर महिन्याला लाखो रुपयांचा महसूल बुडत असतानाही कारवाई करत नाही व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करत नाही आणि अतिक्रमण विभाग हे बॅनर व होर्डींग काढण्याची तत्परता दाखवत नाही. या अनधिकृत होर्डींग व बॅनरवर कारवाईस व हे लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यास पालिका प्रशासन दाखवित असलेल्या चालढकलपणाबाबत महापालिका प्रशासनाला जाब विचारुन प्रत्येक प्रभागात दररोज अनधिकृत बॅनर व होर्डींगवर कारवाई करण्याचे आदेश देवून आपण केलेल्या कामाचा दर महिन्याला राज्य सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी केली आहे.
नवी मुंबई शहराच्या पदपथावरही फेरीवाल्यांनी, छोट्या मोठ्या व्यवासायिकांनी अतिक्रमण केले असून प्रभागाप्रभागामध्ये पदपथ व रस्ते या फेरीवाल्यांनी, हातगाडीवाल्यांनी व्यापले आहेत. लोकांना चालण्यासाठी पदपथ राहीले नाहीत. महापालिकेची समाजमंदीरे, मैदाने, मच्छि मार्केट व वर्दळीचे अंर्तगत व बाह्य रस्ते, पदपथ फेरीवाल्यांच्या विळख्यात असतानाही पालिकेचा अतिक्रमण विभाग यावर कारवाई करत नाही. या लोकांकडून महिन्याला काहीतरी आर्थिक भेट मिळत असल्याचा आमचा संशय असून त्यामुळेच पालिकेचा अतिक्रमण विभाग या अतिक्रमणाला खतपाणी घालताना कारवाईस टाळाटाळ करत आहे. या अनधिकृत फेरीवाले, व्यावसायिकांमुळे प्रत्येक विभाग अधिकारी कार्यालयाला महिन्याला लाखो रुपयांच्या भेटी मिळत असल्याने पदपथ व रस्ते फेरीवाल्यांनी व्यापलेले असतानाही कारवाई होत नाही. पदपथावरुन व रस्त्यावरून या फेरीवाल्यांमुळे चालता येत नसल्याने नवी मुंबईकरांना रस्त्यावरुन चालावे लागते. त्यामुळे किरकोळ अपघात होतात. वाहने सावकाश चालविल्याने वाहतुक कोंडी होत असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
नवी मुंबई शहराचे हे चित्र असतानाही शहराला स्वच्छतेचे पुरस्कार मिळत आहे, हे मोठे आश्चर्य आहे. नवी मुंबई शहरातील अनधिकृत बॅनर व होर्डींगवर सातत्याने कारवाई करून ते लावणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे तसेच पदपथ व रस्त्यावर अतिक्रमण करुन अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात दररोज कारवाई करुन रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कारवाई करण्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाला आदेश देवून नवी मुंबईकरांना दिलासा देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी केली आहे.