नवी मुंबई : महापालिकेतील ठोक मानधनावरील कर्मचारी व कायम आस्थापनेतील अधिकारी-कर्मचारी, महापालिका परिवहन उपक्रमातील ठोक मानधनावरील वाहक-चालक तसेच रोजंदारीवरील कर्मचारी व कायम कर्मचारी, महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षक व ठोक मानधनावरील शिक्षकांना तसेच तासिका शिक्षकांना सानुग्रह अनुदान (बोनस) जाहिर करण्याची लेखी मागणी कामगार नेते व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त तसेच परिवहन व्यवस्थापकांकडे एका निवेदनातून केली आहे.
ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना ३० हजार रुपये आणि कायम आस्थापनेतील कर्मचारी-अधिकारी ४० हजार रुपये, परिवहन विभागातील ठोक मानधनावरील वाहक व चालक तसेच रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना ३० हजार व कायम आस्थापनेतील कर्मचारी-अधिकारी ४० हजार रुपये, ठोक मानधनावरील शिक्षकांना ३० हजार रुपये आणि कायम आस्थापनेतील शिक्षकांना ४० हजार रुपये, तासिका शिक्षकांबाबत मानवतेच्या दृष्टीकोनातून महापालिका प्रशासनाने २० ते २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त व परिवहन व्यवस्थापकांकडे केली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाच्या शिक्षण विभागातील तासिका शिक्षकांना महापालिका प्रशासनाकडून सानुग्रह (बोनस) अनुदान लवकरात लवकर जाहीर होणे अपेक्षित आहे. या तासिका शिक्षकांना रजेचे पैसे देण्यात येत नाहीत. वेतन अत्यल्प असल्याने त्यांना या महागाईच्या काळात हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे तासिका शिक्षकांबाबत मानवतेच्या दृष्टीकोनातून बोनस जाहीर करुन कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केली आहे.