सखापाटील जुन्नरकर : navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : अखेर सिडकोने जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता लाखो लोकांना याचा फायदा होणार असून मागील ४० वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न निकाली निघाला आहे. या निर्णयामुळे नवी मुंबईतील घरांचे हस्तांतरण शुल्क (ट्रान्सफर चार्ज ) घेणे आपोआप रद्द झाले असून शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. अभ्यासपूर्ण तांत्रिक मुद्द्यांवर भर देत अनेक बैठका पार पडल्या. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जनतेला भेडसवणारे अनेक प्रलंबित प्रश्न मिटवले असून त्यात सिडको फ्री होल्ड या समस्येचाही समावेश असल्याचे उपनेते विजय नाहटा यांनी वाशी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना विजय नाहटा यांनी सांगितले की, सिडकोने घरांचे हस्तांतरण शुल्क घेणे बंद करावेत यासाठी मागील चार दशकापासून अनेक आंदोलने झाले. निवडणूक काळात राजकीय नेत्यांनी सिडको फ्री होल्ड प्रश्न मुद्दा बनवला. मात्र प्रत्यक्षात संबंधित मंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांना निवेदने देताना फोटो काढणे या पलीकडे काहीही केले नाही. याचे साक्षीदार पूर्ण नवी मुंबईकर आहेत. आता सिडको अधिग्रहित आणि जिथे सिडकोने भाडेपट्ट्यावर भूखंड व फ्लॅट्स जनतेला वाटप केले आहेत अशा सर्व जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय केला आहे. त्यामुळे हस्तांतरण शुल्क घेणे रद्द झाले आहे. नवी मुंबई महापालिका अस्तित्वात आली तेव्हाच मनपाने मालमत्ता कर आकारायला सुरुवात केली, तर दुसऱ्या बाजूला सिडकोने हे शुल्क घेणे सुरू ठेवले. १९९२ पासूनच हे शुल्क घेणे बंद व्हायला हवे होते. या निर्णयामुळे नवी मुंबई, पनवेल उरण मधील लाखो सोसायट्यांना फायदा होणार असल्याचे नाहटा यांनी सांगितले.
यावेळी बोलताना संपर्क प्रमुख किशोर पाटकर यानी सांगितले की, नवी मुंबईकर सिडको आणि मनपा अशा दोघांना ट्रान्सफर चार्ज देत होती. मनपाचे शुल्क अत्यल्प होते तरीही मूलभूत सुविधा तीच देत होती. मात्र सिडको घेत असलेला चार्ज सामान्य लोकांना परवडणारे नव्हते. आता यातून सुटका मिळाली असल्याचे पाटकर यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत उपनेते विजय नाहटा, शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पाटकर, उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर, श्रीकांत हिंदळकर, रोहिदास पाटील, दीपक सिंग, संजय भोसले, युवा सेना शहर प्रमुख महेश कुलकर्णी, महिला जिल्हा प्रमुख सरोज पाटील आदी उपस्थित होते.