सखापाटील जुन्नरकर :Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
मुख्याध्यापिकेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस आयुक्तांना साकडे
नवी मुंबई : महापालिकेची सीबीएसई शाळा क्रमांक ९४ चा M/S EDUCANTUM.INC या खासगी संस्थेशी असलेला करार रद्द करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. तर कोपरखैराणे महापालिकेची सीबीएसई शाळा क्रमांक ९४ मध्ये विद्यार्थ्यांना मारहाण व शिवीगाळ केलेल्या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करुन याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे रविंद्र सावंत यांनी केली आहे.
महापालिका प्रशासनाच्या शिक्षण मंडळाकडून M/S EDUCANTUM.INC या खारघर, ता. पनवेल, जि. रायगडमधील संस्थला कोपरखैराणे येथील सीबीएसई शाळा क्रमांक ९४ चालविण्यास दिलेली आहे. या संस्थेच्या माध्यमातून या शाळेमध्ये शिक्षण दिले जात आहे. या शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिकेकडून मारहाण व शिवीगाळ करण्यात आल्याचे प्रसिद्धीमाध्यमांत छापून आलेल्या बातम्यांवरुन समजले आहे. मारहाण करण्यात आलेले व शिवीगाळ करण्यात आलेले हे सर्व विद्यार्थी गरीब घरातील आहेत. हे विद्यार्थी मुख्याध्यापिकेच्या दहशतीला कमालीचे घाबरले असून त्यांनी शाळेत जाण्यास नकार दिला आहे. यामुळे शालेय परिसरात अन्य विद्यार्थ्यांवरही मानसिक परिणाम झाला असून त्यांच्या अभ्यासावरही परिणाम झाला आहे. या गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली असून या प्रकरणाच्या तळाशी जावून सखोल चौकशी करत महापालिका प्रशासनाने मुख्याध्यापिकेवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच मुख्याध्यापिकेवर स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिका प्रशासनाच्या शाळेत अशी घटना घडल्याने गोरगरीबांनी महापालिकेतील शाळेत शिक्षणासाठी पाठवावे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुळात महापालिकेची वास्तू असताना व सधन महापालिका असताना शिक्षणाची धुरा खासगी संस्थेकडे का सोपवावी, असाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालेला आहे. या खासगी संस्थेला कोणत्याही प्रकारची निविदा न राबविता M/S EDUCANTUM.INC या खारघर, ता. पनवेल, जि. रायगडमधील संस्थेला महापालिका सीबीएसई शाळेचा कार्यभार सोपविला आहे. आकांक्षा फाऊंडेशन या संस्थेला शाळा क्रं ९३, सिवूडस, सेक्टर ५० याचा कार्यभार देताना जेमतेम ५५ टक्के अनुदान दिले आहे. महापालिकेने M/S EDUCANTUM.INC या संस्थेला कोपरखैराणेतील शाळा क्रं ९२ या सीबीएसई शाळेचा कार्यभार देताना पालिकेने १०० टक्के अनुदान दिलेले आहे. या खासगी शैक्षणिक संस्थेवर अनुदानाचे औदार्य महापालिका प्रशासन का दाखवित आहे? आजमितीला महापालिका शाळांमध्ये ठोक मानधनावर तसेच तासिका शिक्षकांना अत्यल्प वेतनावर काम करावे लागत आहे. संबंधित शिक्षक टीईटी उत्तीर्ण असून चांगल्या प्रकारचे शिक्षण देत आहेत. या शिक्षकांना सेवेत कायम करुन घेणे अथवा वाढत्या महागाईचा विचार करुन चांगल्या प्रकारचे वेतन देणे पालिका प्रशासनाची जबाबदारी असताना पालिका शाळेतील ठोक मानधनावरील तसेच तासिका शिक्षकांवर अन्याय केला जात असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
M/S EDUCANTUM.INC या खासगी संस्थेंने नियुक्त केलेल्या शिक्षकांची शैक्षणिक कागदपत्रे व त्यांनी सीटीईटी ही परिक्षा उत्तीर्ण केलेली आहे का? याचीही खातरजमा करणे आवश्यक आहे. खासगी संस्थांना दिलेल्या शाळेत म्युझिक शिक्षक व अन्य शिक्षक उपलब्ध आहेत. परंतु महापालिका शाळेमध्ये पीटी शिक्षक, म्युझिक शिक्षकांचा दुष्काळ आहे. ज्यांना अनुदान दिले जाते, त्या शाळांत सुविधा आहे आणि जे अनुदान देतात, त्यांच्या शाळांमध्ये सुविधांचा दुष्काळ असा विरोधाभास नवी मुंबईकरांना पहावयास मिळाले आहे, अनुभवयास मिळाले आहे. या संस्थेला यापूर्वीचा शाळा चालविण्याचा कोणताही फारसा अनुभव नसताना महापालिका प्रशासनाने सीबीएसई शाळा का सोपविल्या आहेत, याचाही खुलासा महापालिका प्रशासनाकडून होणे आवश्यक आहे. मुख्याध्यापिकेकडून होत असलेल्या त्रासाने गोरगरीबांच्या घरातील मुले भीतीमुळे आता शाळेमध्ये जाण्यास तयार नाहीत. या प्रकाराची चौकशी करुन पालिका प्रशासनाने संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाकून हे कंत्राट रद्द करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात रविंद्र सावंत यांनी म्हटले आहे की, महापालिका प्रशासनाच्या शिक्षण मंडळाकडून M/S EDUCANTUM.INC या खारघर, ता. पनवेल, जि. रायगडमधील संस्थला कोपरखैराणे येथील सीबीएसई शाळा क्रमांक ९४ चालविण्यास दिलेली आहे. या संस्थेच्या माध्यमातून या शाळेमध्ये शिक्षण दिले जात आहे. या शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिकेकडून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचे प्रसिद्धीमाध्यमांत छापून आलेल्या बातम्यांवरुन समजले आहे. मारहाण करण्यात आलेले व जातीवाचक शिवीगाळ करण्यात आलेले हे सर्व विद्यार्थी गरीब घरातील आहेत. हे विद्यार्थी मुख्याध्यापिकेच्या दहशतीला कमालीचे घाबरले असून त्यांनी शाळेत जाण्यास नकार दिला आहे. यामुळे शालेय परिसरात अन्य विद्यार्थ्यांवरही मानसिक परिणाम झाला असून त्यांच्या अभ्यासावरही परिणाम झाला आहे. या गरीब विद्यार्थ्यांचे पालकांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली असून तसेच याप्रकरणी स्थानिक कोपरखैराणे पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी व मुख्याध्यापिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांचे पालक गेले असताना पोलिस ठाण्याने त्या गरीब पालकांची तक्रार दाख करून घेतली नाही. एकप्रकारे शिवीगाळ करणाऱ्या व मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापिकेला स्थानिक पोलीसांनी अभय दिले आहे. कदाचित या शिक्षण संस्थेचे मातब्बर राजकारण्यांशी लागेबांधे असावे व त्या राजकारण्याच्या दबावाखाली स्थानिक कोपरखैराणे पोलीस पालकांची तक्रार घेत नसल्याची कोपरखैराणे विभागात चर्चा सुरु आहे. आपण याप्रकरणी सखोल चौकशी करुन या पालकांची तक्रार दाखल करुन घेण्याचे व मारहाण तसेच शिवीगाळ करणाऱ्या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश स्थानिक कोपरखैराणे पोलीसांना देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे निवेदनातून केली आहे.