महावितरणने दिवाळीच्या अगोदर वीज समस्या मार्गी लावाव्या : संदीप नाईक
अविनाश तावडे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : माजी आमदार तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे सृजनांशी संवाद या उपक्रमांतर्गत बेलापूर मतदारसंघातील विविध नोडमधील सोसायटी, गावठाण क्षेत्रातील दौरा करत असताना अनेक नागरिकांनी महावितरण मंडळाशी निगडित समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. या सर्व समस्यांची तातडीने दखल घेत संदीप नाईक यांनी सोमवारी (दि. ७ ऑक्टोबर) शिष्टमंडळासह विद्युत वितरण मंडळाचे अधीक्षक-अभियंता गोरखनाथ बेले यांची भेट घेतली. सर्व वीज समस्या दिवाळीपूर्वी तातडीने सोडविण्याची मागणी केली. संपत शेवाळे, दशरथ भगत, भरत नखाते, शुभांगी पाटील, अमित मेढकर, अंजली वाळुंज, विजय वाळुंज, गणेश भगत, सुरेश शिंदे आदी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी त्यांच्या समवेत उपस्थित होते.
नवी मुंबई शहर हे सर्वाधिक विद्युत शुल्क भरणारे शहर असतानाही आज येथील नागरिकांना विजेच्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा संताप संदीप नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
सब स्टेशनची दुरवस्था दूर करा..
बहुतेक ठिकाणी महावितरणच्या सब स्टेशनची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. सिमेंट आणि पेंट निघाला आहे. बांधकामातील सळ्या बाहेर आलेल्या आहेत. दुर्गंधी पसरली आहे. भविष्यात या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू शकते. काही सब स्टेशन गर्दुले, मद्यपी असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सब स्टेशनच्या सुरक्षिततेसाठी तातडीने अभियान राबवून अशी मागणी त्यांनी केली.
उघड्या केबल, डीपी बॉक्स सुरक्षित करा
अनेक ठिकाणी डीपी बॉक्स उघडे आहेत. उघड्या केबल्स आणि जीर्ण झालेल्या केबल्समुळे विजेचा लोड घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे घरातील उपकरणे बिघडत आहेत. दुर्घटना होत आहेत असे सांगून संदीप नाईक यांनी उघड्या केबल्स आणि डीपी बॉक्स सुरक्षित करण्याची सूचना केली.
ट्रान्सफॉर्मरच्या दुर्घटना टाळाव्यात
अनेक ठिकाणी काम सुरु असताना ट्रान्सफार्मरला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या दुर्घटनांमुळे जीवितहानी होण्याचा धोका आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात.
मागेल त्याला मीटर योजना राबवावी.
अनेक नागरिकांनी मीटर जोडणी साठी अर्ज केलेले आहेत मात्र त्यांना अद्याप जोडणी मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर मागेल त्याला मीटर योजना राबवावी.
चुकीच्या वीज शुल्काचा नागरिकांना भुर्दंड नको…
खराब मीटरमुळे नागरिकांना चुकीचे जास्त वीज शुल्काचा भुर्दंड पडतो. या गंभीर प्रश्नी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
दिवाळीच्या आधी विद्युत संबंधी समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी संदीप नाईक यांनी केली. त्यावर अधीक्षक-अभियंता बेले यांनी लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही दिली.