नवी मुंबईतील ५०० विद्यार्थ्यांना मनसेतर्फे शिवनेरी किल्ले दर्शन
अविनाश तावडे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सध्याच्या युगात लहान मुले मोबाईल गेम, रील्स, इंटरनेटच्या विळख्यात अडकलेले आहेत. अशा वेळी मुलांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा गड दाखवावा अशा संकल्पनेतून मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी १४ ते १८ वयोगटातील जवळपास ५०० मुलांना शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घडवले. शिवछत्रपतींच्या जन्मभूमीत तरुणांना नेवून पुढील आयुष्य जगण्यासाठी या तरुणांना एक प्रेरणा, ऊर्जा मिळावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी मनसेने दोन ते तीन आठवडे नोंदणी मोहीम आयोजित केली होती. या नोंदणी मोहिमेत स्वतःहून नोंदणी केलेल्या तरुण तरुणींना किल्ले दर्शन घडविण्यात आले.
गड किल्ले हीच खरी छत्रपती शिवाजी महाराज यांची ओळख आहे. तसेच गड किल्ल्यांचे संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या राज ठाकरे यांच्या विचारांवर आधारित या शिवनेरी किल्ले दर्शनाचे आयोजन गजानन काळे यांच्याकडून करण्यात आले होते. या मोहिमेसाठी सकाळी ७ वाजता मनसे मध्यवर्ती कार्यालयात सर्व मुले मुली एकत्र आले होते. यावेळी ओझर गणपतीचे दर्शन घेऊन सर्व तरुण शिवनेरीकडे रवाना झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने सर्व युवकांनी शिवनेरीची चढाई केली. यावेळी गजानन काळे यांनीसुद्धा युवकांसोबत गड चढून त्यांना प्रोत्साहन दिले. शिवनेरी किल्ला सर केल्यावर सर्वांनी मनोभावे शिवाई देवीचे दर्शन घेतले. तसेच ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्या ठिकाणी गजानन काळे व युवक नतमस्तक झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या जन्मभूमीवर येण्याचा योग आला. त्याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो, अशी प्रतिक्रिया तरुणांनी दिली. त्याचसोबत शिवनेरी गडावर असणाऱ्या कडेलोट टोकाचे दर्शन घेतले. महिलांवर तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्यांना कडेलोट टोकावरून खाली ढकलून देण्याची शिक्षा ही किती प्रभावी होती, याची जाणीव या ठिकाणी आल्यावर झाली. अशी तात्काळ शिक्षा झाल्यावर महिलांवर हात टाकायची हिंमत कोणावर होणार नाही अशी प्रतिक्रिया काही तरुणींनी दिली.
मनसेच्या या मोहिमेत मनसे पुणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मकरंद पाटे व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. नवी मुंबई मनसेच्या या मोहिमेत गजानन काळे यांच्या सोबत महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, मनसे शहर सचिव सचिन कदम, मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार विभाग शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील, मनसे विभाग अध्यक्ष अक्षय भोसले, भूषण कोळी, योगेश शेटे, निखिल गावडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक यांनी विशेष परिश्रम घेतले.