बेलापूरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांना यश
सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सौंदर्यात भर घालणाऱ्या ज्वेल ऑफ नवी मुंबई या स्थळाला अधिक आकर्षक करण्याच्या दृष्टीने येथे गौतम बुद्धांचा भव्य पुतळा उभारण्याची संकल्पना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी २०१९ मध्ये मांडली होती व तत्कालीन महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यासह या स्थळाची पाहणी करण्यात आली होती. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांतून शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे विश्वशांतीचे प्रतीक असलेल्या भगवान गौतम बुद्धांचा आकर्षक पुतळा बसविण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन सोमवार दि. १४ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ६ वाजता ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथे पार पडणार आहे.
विविध प्रकल्पांमुळे नवी मुंबईला जागतिक शहराचा दर्जा प्राप्त व्हावा याकरिता अन्य प्रांतातील विविध धर्मियांचा या शहराकडे ओढा वाढू लागला आहे. पामबीच मार्गावर नेरूळ येथे महापालिकेच्या माध्यमातून ज्वेल ऑफ नवी मुंबई हे आकर्षक उद्यान विकसित करण्यात आले आहे. तसेच सदर उद्यान पर्यटकांसाठी आकर्षणाचा भाग ठरले आहे. नवी मुंबईच नव्हे, तर आजूबाजूच्या शहरातील नागरिकांचीसुद्धा येथे रीघ लागल्याचे पाहावयास मिळते.
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून नवी मुंबईच्या अंदाजित ७४ लाख रुपयांचा खर्च करून विश्वशांतीचे प्रतीक असलेल्या भगवान गौतम बुद्धांचा आकर्षक पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. आमदार मंदाताई म्हात्रे पुढे म्हणाल्या की, गौतम बुद्ध यांना शांततेचे प्रतीक म्हणून जगात ओळखले जाते. नवी मुंबईत त्यांचा कोठेही पुतळा नाही. ज्वेल ऑफ नवी मुंबईसारख्या प्रेक्षणीय स्थळी बुद्धांचा आकर्षक पुतळा उभारल्यास या ठिकाणाचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा पुतळा आता प्रत्यक्षात आकार घेणार आहे. त्यामुळे सर्व गौतम बुद्ध अनुयायी यांनी भूमिपूजना प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.