सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष आणि इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रविंद्र सावंत हे महापालिका आस्थापनेतील कायम ,कंत्राटी, ठोक मानधनावरील कर्मचारी, बाजार समिती कर्मचारी, एमआयडीसी कर्मचारी यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या त्या आस्थापनेचे मुख्यालय, मंत्रालय, कामगार आयुक्तालय, पणन विभाग आदी ठिकाणी सातत्याने लेखी पाठपुरावा करत असतात, सातत्याने भेटी घेत असतात. जगातील १६० देश सभासद असलेल्या इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (आयटीएफ) लंडन या बहूराष्ट्रीय संघटनेचे अधिवेशन १२ ऑक्टोबर रोजी मोरोक्को येथे सुरु झाले आहे, ते १९ ऑक्टोबरपर्यत चालणार आहे. या अधिवेशनात नवी मुंबईतील कामगार नेते रविंद्र सावंत सहभागी झाले आहेत.
नवी मुंबईतील कामगार नेतृत्वाला आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगार समस्यांवरील चर्चासत्रात सहभागी होता आले. नवी मुंबईतील कर्मचारी वर्गाच्या समस्या व असुविधांअभावी कर्मचाऱ्यांचे होणारे हाल यावर कामगार नेते रविंद्र सावंत यांनी भूमिका मांडली, अधिवेशनात सहभागी झाल्याने रविंद्र सावंत यांना जागतिक पातळीवर कर्मचाऱ्यांच्या समस्या समजल्या. विविध कामगार नेत्यांशी चर्चा करता आली. या अधिवेशनात सहभागी होऊन नवी मुंबईतील कामगार चळवळीचा ठसा आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवल्याने रविंद्र सावंत यांच्यावर नवी मुंबईतील कर्मचारी वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.