ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांची मागणी
संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील :Navimumbailive.com@gmai.com
नवी मुंबई : महापालिका नेरूळ सेक्टर दोनमधील सार्वजनिक उद्यानात तुटलेल्या खेळण्यांची दुरुस्ती करावी अथवा नव्याने खेळणी बसवावीत तसेच उद्यानात निकृष्ठ दर्जाची खेळणी बसविणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्यास महापालिकेची अन्य कोणतीही कामे न देण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर दोन परिसरामध्ये महापालिका प्रशासनाचे सार्वजनिक उद्यान आहे. या उद्यानात नव्याने बसविण्यात आलेली सर्वच खेळणी गेल्या काही महिन्यापासून पूर्णपणे तुटलेली आहे. या तुटलेल्या खेळण्यामुळे परिसरातील मुलांना उद्यानात खेळणी वापरता येत नाही. ही खेळणी गळून पडली असून त्यांची थडगी त्या ठिकाणी अस्ताव्यस्त स्वरुपात पसरली आहेत. या खेळण्यांच्या दुरुस्तीबाबत आम्ही सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. पालिका प्रशासनाकडून कंत्राट घेऊन तकलादू, कामचलाऊ दर्जाची निकृष्ठ स्वरूपाची खेळणी बसविणाऱ्या ठेकेदाराला प्रशासनाने खेळण्यांच्या कामात दाखविलेल्या हलगर्जीपणाबाबत काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच या ठेकेदाराला यापुढे महापालिका प्रशासनाची कोणत्याही स्वरुपाची कामे देण्यात येऊ नये. दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. खेळण्यांअभावी स्थानिक परिसरातील मुलांची होत असलेली गैरसोय पाहता उद्यानातील तुटलेल्या खेळण्यांची युद्धपातळीवर डागडूजी करण्यात यावी अथवा नव्याने खेळणी बसविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.