श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : स्वमालकीचे धरण असणाऱ्या आणि राज्य व केंद्र सरकार पातळीवर सातत्याने बक्षिसांचा स्विकार करणाऱ्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा बडा घर आणि पोकळ वासा असा गलथान कारभार नेहमीच पहावयास मिळत आहे. कुकशेत गावामध्ये महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयाचा कारभार सुरु होऊन जेमतेम महिनाही झाला नाही तोच या विभाग कार्यालयातील लिफ्टमध्ये पाणीपुरवठा खात्याचा कर्मचारी तब्बल दीड तास अडकल्याची घटना सोमवारी (दि. ४ नोव्हेंबर) रोजी सकाळी घडली आहे.
महापालिकेचेच पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी शंतन पाटील हे मीटर हेडरचे महापालिका प्रशासनात काम करत आहेत. सकाळी अकरा-पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास शंतनु पाटील हे नुकतेच कुकशेत गावामध्ये सुरु करण्यात आलेल्या नेरूळ विभाग कार्यालयातील लिफ्टमध्ये अडकले. लिफ्ट अचानक बंद पडल्याने व लिफ्टमध्ये अडकलेला पालिका कर्मचारी सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची युद्धपातळीवर कार्यवाही न झाल्याने तब्बल दीड तास लिफ्टमध्ये अडकून राहण्याची वेळ शंतनु पाटील या कर्मचाऱ्यावर आली. पालिका कर्मचारी असल्याने त्याने धीर धरला व तब्बल दीड तास काढला. याऐवजी कोणी ज्येष्ठ नागरिक लिफ्टमध्ये अडकला असता तर त्याच्यावर जीव गमविण्याची वेळ आली असती. या लिफ्टची पाहणी केली असता अवघ्या महिन्याभरात तळमजल्याच्या लिफ्टच्या काही भागाला दुरावस्था आली असून लिफ्टला गंज लागला असल्याचेही महापालिका सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. नवी मुंबई शहरामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये कुकशेत गावातील नेरूळ विभाग कार्यालयात पालिकेच्या पाणीपुरवठा खात्यातील मीटर हेडर तब्बल दीड तास अडकल्याची चर्चा सुरु होती. घडल्या प्रकाराची महापालिका आयुक्तांनी सखोल चौकशी करावी, आज महापालिकेचा कर्मचारी अडकला, उद्या कोणी नागरिक अडकून दगावला तर ठेकेदाराच्या कामाची महापालिका जबाबदारी स्विकारणार का, असा प्रश्न नवी मुंबईकरांकडून विचारला जात आहे.