नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील एमएसईडीसीच्या विद्युत उपकेंद्राच्या प्रवेशद्वारावर गेल्या काही महिन्यापासून बेवारस अवस्थेत पडलेली दुचाकी हटविण्याची लेखी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात मेरेडियन व शिवालिक सोसायटीसमोर तसेच प्लॉट १५ वरील सिडकोच्या शिवम सोसायटीलगत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सबस्टेशन आहे. या सबस्टेशनच्या विद्युत डीपीकडे जाण्याच्या प्रवेशद्वारालगतच पदपथावर एक दुचाकी गेल्या काही महिन्यापासून बेवारस अवस्थेत पडून आहे. पावसामुळे ही दुचाकी गंजलेली व नादुरुस्त अवस्थेत आहे. या बेवारस भंगार अवस्थेत पडलेल्या दुचाकीमुळे पदपथावर ये-जा करताना अडथळे निर्माण होतात. विद्युत डीपी आवारालाही बकालपणा प्राप्त झाला आहे. लहान मुले या दुचाकीसभोवताली गाडी गाडी खेळत असल्याने उद्या ही बेवारस दुचाकी लहान मुलांच्या अंगावर पडल्यास दुर्घटना होण्याची भीती आहे. आजूबाजूच्या दुकानदारांकडे व रहीवाशांकडे चौकशी केली असता, गेल्या काही महिन्यापासून बेवारस अवस्थेत पडलेले वाहन कोणाचे आहे. याबाबत कोणालाही माहिती नाही. नेरूळ विभाग कार्यालयाला ही धुळखात पडलेली, गंजलेली, भंगार अवस्थेत पडलेली दुचाकी तेथून तातडीने हटविण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.