महाराष्ट्र कर्मचारी युनियनची महापालिका प्रशासनाकडे मागणी
नवी मुंबई : महापालिका परिवहन उपक्रमातील चालक व वाहकांना पालिका प्रशासनाने मेडिक्लेम योजना लागू करण्याची लेखी मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे आणि परिवहन व्यवस्थापकाकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमामध्ये काम करणाऱ्या चालक आणि वाहकांना तुटपुंज्या वेतनात काम करावे लागत आहे. त्यांना अपघात झाल्यास अथवा आजारपण आल्यास कर्ज काढून उपचार करावे लागतात. त्यामुळे कामावर गैरहजेरी लागल्यास पालिका प्रशासन वेतनही कापून घेत आहे. सध्या महागाईच्या काळात तुटपुंज्या वेतनावर घरखर्च, घरभाडे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आजारपण याची जमवाजमव करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे त्यांना आजारपण, अपघात यासाठी जमवाजमव करताना पतसंस्था तसेच खासगी वित्तीय संस्था याकडे जास्त व्याजदराने कर्ज उचलावे लागत आहे. परिवहनच्या चालक आणि वाहक यांना मेडिक्लेम योजना तातडीने मंजूर व्हावी यासाठी आम्ही गेल्या काही वर्षापासून पालिका प्रशासनदरबारी सातत्याने प्रयत्न करत आहोत, तरीही प्रशासनाच्या निदर्शनास समस्येचे गांभीर्य येऊ नये, ही कामगारांसाठी एक शोकांतिका आहे. हे निवेदन प्राप्त झाल्यावर संबंधितांना परिवहन चालक आणि वाहकांना मेडीक्लेम योजना तातडीने लागू करावी यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत. याप्रकरणी निर्णय न घेतल्यास दहा दिवसानंतर महापालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषणाच्या मार्गांने आंदोलन करावे लागेल, असा इशारा कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.