प्रशांत सिनकर
ठाणे : हवामानातील सातत्याने होणाऱ्या बदलांचा परिणाम पर्यावरणावर होत असला, तरी ऋतुमानानुसार स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांची वर्दळ अजूनही अनुभवता येते. सध्या वसंत ऋतूच्या आगमनामुळे झाडांची पानगळ सुरू झाली असून, त्यामुळे मुंबईचा प्रतिनिधी पक्षी मानला जाणारा तांबट सहज नजरेस पडू लागला आहे.
सहसा झाडांच्या दाट पानांमध्ये दडून राहणारा हा लहानसा रंगीत *व आकर्षक* पक्षी त्याच्या “टूक-टूक” असा आवाजामुळे ओळखला जातो. तांबट हा प्रामुख्याने पिंपळ, वड, उंबर आणि जांभूळ यांसारख्या झाडांवर आढळतो. हे झाड फळांनी समृद्ध असल्याने हा पक्षी येथे हमखास पाहायला मिळतो.
- वसंतात तांबट पक्ष्याचे खास दर्शन होते
हिवाळा संपत आल्यानंतर उन्हाचा कडाका वाढू लागला आहे, आणि पानगळ सुरू झाल्याने अनेक पक्ष्यांचे दर्शन सुकर झाले आहे. पक्षी अभ्यासक वीरेंद्र घरत यांच्या मते, तांबट हा चिमणीच्या आकाराचा (सुमारे *१५ ते १६* सेमी लांब) असून, हिरवा, लाल, काळा आणि पिवळ्या रंगछटांमुळे तो विशेष आकर्षक दिसतो.
मुंबईचा प्रतिनिधी पक्षी: तांबट
भारतात मोर राष्ट्रीय पक्षी, तर हरीयल महाराष्ट्राचा राज्यपक्षी म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे, मुंबईचा पक्षी म्हणून तांबट प्रसिद्ध आहे. तांबटाच्या ‘टूक-टूक’ आवाजामुळे त्याचे नाव पडले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे.
विणीचा हंगाम आणि निवासस्थान:
फेब्रुवारी ते एप्रिल हा तांबटाचा विणीचा हंगाम असतो. हा पक्षी झाडांच्या फांदीवर चोचीने टोचून स्वतःचे *ढोलीसारखे* घरटे तयार करतो.
*महाराष्ट्रात* तांबटाचे तीन प्रकार आढळतात—
सामान्य तांबट (मुंबई-ठाण्यात आढळतो)
तपकिरी डोक्याचा तांबट (संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तसेच उत्तर महाराष्ट्रात आढळतो)
पांढऱ्या गालांचा तांबट (पश्चिम घाटात आढळतो)
तांबटाचा आहार आणि वर्तन
तांबट हा मुख्यतः रसाळ फळांवर अवलंबून असतो, परंतु तो कधी कधी छोटे किडेही खातो. गर्द झाडांमध्ये लपून राहणारा हा पक्षी सध्या पानगळतीमुळे सहज नजरेस पडतो आहे. पक्षीप्रेमींसाठी हा उत्तम काळ आहे, कारण निसर्गाच्या या रंगीबेरंगी छोट्या कलाकाराचे दर्शन आता अधिक सोपे झाले आहे.