नवी मुंबई : महापालिकेच्या परिवहन विभागातील कायम कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा देण्यात यावा, महापालिका परिवहन विभागातील महिला कर्मचाऱ्यांसाठी महिला कक्षात, प्रत्येक डेपोतील टॉयलेटमध्ये तसेच मुख्यालयात सॅनेटरी नॅपकिन मोफतपणे उपलब्ध करुन देणारी मशिन कार्यान्वित करावी, महापालिकेतील सेवानिवृत्त वाहन चालकांना सेवानिवृत्तीनंतर करार पद्धतीने सेवेत सामावून घेण्याची लेखी मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे आणि परिवहन व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांच्याकडे केली आहे.
महापालिका प्रशासनाच्या परिवहन विभागात काम करणारे कायम कर्मचारी वाढत्या महागाईच्या तुलनेत तुटपुंज्या वेतनावरच काम करत आहेत. या कायम कर्मचाऱ्यांना काम करताना अपघात झाल्यास त्यांच्या उपचाराची व्यवस्था करणे महापालिकेच्या परिवहन विभागाचे काम आहे. अपघात झाल्यास या कायम कर्मचाऱ्यांना उपचारासाठी इतरांकडे हात पसरावे लागतात अथवा बँका, पतसंस्थांकडे कर्ज काढावे लागते. परिवहन विभागाने कंत्राटी कामगारांसाठी आरोग्य विमा योजना लागू केली आहे. त्याच धर्तीवर कायम कर्मचाऱ्यांसाठीही परिवहन विभागाने आरोग्य विमा योजना लागू करणे आवश्यक आहे. कामादरम्यान अपघात झाल्यास कायम कर्मचाऱ्यांना उपचार घेण्यात कोणतेही आर्थिक अडथळे निर्माण होणार नाहीत अथवा त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याचीही वेळ येणार नाही. कायम कर्मचारी हे परिवहन सेवेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून इमानेइतबारे काम करत असल्याने त्याच्या आरोग्याची काळजी घेणे प्र्रशासनाचे कर्तव्य आहे. आरोग्याच्या बाबतीत कायम कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा सुविधा प्रशासन एकीकडे देत असताना दुसरीकडे कायम कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा सुविधेपासून वंचित ठेवले जात आहे. कायम कर्मचाऱ्यांना उपचारासाठी येत असलेल्या आर्थिक अडचणी पाहता महापालिका प्र्रशासनाने परिवहन विभागातील कायम कर्मचाऱ्यांना तातडीने विमा सुविधा उपलब्ध करुन देण्याविषयी आपण संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची मागणी केली आहे.
महापालिकेच्या परिवहन विभागामध्ये चालक व वाहक म्हणून महिला कार्यरत आहेत. परिवहनच्या सफाई व अन्य विभागातही महिला वर्ग कार्यरत आहे. निसर्ग नियमाप्रमाणे महिलांना मासिक पाळीचा त्रास हा सहन करावाच लागतो. अशावेळी ऑनड्यूटी असताना मासिक पाळी सुरु झाल्यास महिला वर्गाची कोंडी होते. त्यांना त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी परिवहन विभागामध्ये काम करणाऱ्या सर्वच आस्थापनेतील महिला कर्मचाऱ्यांना महापालिक प्रशासनाने प्रत्येक डेपोमध्ये उपलब्ध असलेल्या महिला कक्षामध्ये, टॉयलेटमध्ये तसेच मुख्यालयामध्ये सॅनेटरी नॅपकिन मोफतरित्या उपलब्ध करुन देणारी मशिन तातडीने बसविणे आवश्यक आहे. त्यामुळे महिला वर्गाची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. सॅनेटरी नॅपकिनसाठी त्यांना धावपळही करावी लागणार नाही व त्यांची कोंडीही होणार नाही. महिला वर्गाच्या या महत्वपूर्ण समस्येचे निवारण करण्यासाठी आपण संबंधितांना महापालिका परिवहन विभागातील महिला कर्मचाऱ्यांसाठी महिला कक्षात, प्रत्येक डेपोतील टॉयलेटमध्ये तसेच मुख्यालयात सॅनेटरी नॅपकिन मोफतपणे उपलब्ध करुन देणारी मशिन कार्यान्वित करणेबाबत निर्देश देण्याची मागणी केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनात वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यावर अनेक वाहन चालक सेवानिवृत्त होत आहेत. त्यातच महापालिकेच्या विविध आस्थापनेतील अनेक विभागांमध्ये चालकांची संख्या कमी आहे. चालक संख्या कमी असल्याने विविध यंत्रणेवर ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सेवानिवृत्त झालेल्या ज्या वाहनचालकांना पुन्हा महापालिका प्रशासनात काम करावयाची इच्छा असेल तर अशा वाहनचालकांना महापालिका प्र्रशासनाने करार पद्धतीने पुन्हा सामावून घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन सेवानिवृत्तीनंतरही चालकांना रोजगार भेटेल आणि महापालिका प्रशासनामध्ये भेडसावत असणारी चालक कमतरतेची समस्याही निकाली निघेल. आपण या मागणीवर सकारात्मक विचार करुन संबंधितांना महापालिकेतील सेवानिवृत्त वाहन चालकांना सेवानिवृत्तीनंतर करार पद्धतीने सेवेत सामावून घेण्याचे निर्देश देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.