सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : शासकीय व निमशासकीय कार्यालयांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राबविण्यात येत असलेल्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखडयानुसार कालबध्द कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे हे सातत्याने आढावा घेत असून नवी मुंबई महापालिकेतील प्रत्येक विभागामार्फत सात कलमांनुसार करण्यात येत असलेल्या सुनियोजित व गतिमान कार्यवाहीकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे.
यामधील प्रत्येक विभागाने अंमलबजावणी करावयाचा महत्वाचा भाग म्हणजे कार्यालयातील स्वच्छता व सोयी – सुविधा हा असून या अनुषंगाने सर्वच विभागप्रमुखांना व कार्यालयप्रमुखांना मार्च अखेरपर्यंत कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्वच विभागांमध्ये अभिलेख वर्गीकरण व जतन याबाबतचे प्रचलित नियम व कार्यपध्दतीप्रमाणे निंदणीकरण, नष्टीकरण व निर्लेखन प्रक्रिया प्राधान्याने राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत प्रत्येक विभागातील कागदपत्रे व नस्ती यांचा अभिलेख प्रामुख्याने निंदणीकरण करुन तपासणीअंती त्यामधील आवश्यकता नसलेली कागदपत्रे विहित नियमावलीनुसार नष्ट करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे जतन करुन ठेवायचा अभिलख जतन करावयाच्या कार्यपध्दतीनुसार ‘अ, ब, क आणि ड’ अशा चार प्रकारात सर्व बाबींच्या नोंदी घेऊन वर्गीकरण करण्यात येत आहेत.
या बाबींच्या तपासणीकरीता महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार प्रशासन विभागामार्फत तपासणी समिती गठीत करण्यात आल्या असून हे समिती सदस्य विविध विभागांमध्ये भेटी देऊन या अनुषंगाने सुरु असलेल्या कामकाजाची पाहणी करत आहेत.
महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये प्राधान्याने अभिलेख निंदणीकरणाचे वर्गीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून आतापर्यंत १ लाख ५० हजार ४७१ संचिकांचे ‘अ, ब, क, ड’ अशा चार प्रकारांत वर्गीकरण करण्यात आलेले आहे.
अभिलेख वर्गीकरण व जतन याविषयी प्रशासन विभागामार्फत सत्यजित बडे यांचे व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते. अभिलेख विषयक कार्यवाहीत सुसूत्रता व समानता आणण्यासाठी हे व्याख्यान लाभदायक ठरले आहे. अभिलेख निंदणीकरणाप्रमाणेच कार्यालयातील विद्यमान दप्तर सहा गठ्ठे पध्दतीनुसार ठेवण्याची कार्यवाही देखील केली जात आहे. तसेच कार्यालयातील अंतर्गत स्वच्छतेवर व परिसर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. कार्यालयामधील जुन्या व निरुपयोगी जड वस्तूंची विहित कार्यपध्दतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही देखील करण्यात येत आहे.
त्यासोबतच कार्यालयांमध्ये सुसज्ज प्रतिक्षालयाची व्यवस्था, पिण्याच्या स्वच्छ व शुध्द पाण्याची व्यवस्था, स्वच्छ प्रसाधनगृहांची व्यवस्था, सुव्यवस्थित नामफलक व दिशादर्शक फलकांची व्यवस्था व वातावरण प्रसन्न आणि आल्हाददायक राहील अशाप्रकारे सुशोभिकरण व्यवस्था करण्यात येत आहे.
१०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार कार्यालयीन कागदपत्रांसह सर्व अभिलेखाचे नियमांनुसार वर्गीकरण व जतन कार्यवाही करण्यासोबतच कार्यालयीन स्वच्छता व लोकाभिमुख सुविधा पूर्तता यामुळे कार्यालयांचे स्वरुप आता बदललेले प्रसन्न दिसून येत आहे.