नवी मुंबई : सानपाडा-पामबीच भाग विकसित होण्याच्या प्रक्रियेला एक तपापेक्षा अधिक कालावधी लोटला तरी या भागाला अद्यापि पोलीस ठाण्याची प्रतिक्षा करावी लागत आहे. मोराज रेसिडन्सीसमोरील अविकसित व पोलीस ठाण्यासाठी आरक्षित असलेला भुखंड आणखी किती दिवस गृहखाते बकाल ठेवणार असा संतप्त सवाल स्थानिक रहीवाशांकडून विचारला जात आहे.
२०००च्या मध्यापासून सानपाडा-पामबीच परिसरात काही प्रमाणात नागरीकरणाची प्रक्रिया वाढीस लागली, ती २००३च्या अखेरीपर्यत सानपाडा-पामबीच परिसर गर्दीने गजबजू लागला. आजमितीला सानपाडा-पामबीच परिसराची लोकसंख्या तीस हजारापेक्षा अधिक असल्याची माहिती या भागातील स्थानिक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांकडून दिली जात आहे.
सुरूवातीला या भागात रहावयास आलेल्या रहीवाशांना चोरी, घरफोडी, लुटमार, वाटमार आदी प्रकाराचा सातत्याने सामना करावा लागला होता. बुधदेव मंदीराची दानपेटीही चोरण्याचा प्रयास झाला होता. या भागात सुरूवातीला रेल्वे रूळावरून येणार्या उड्डाणपुलालगतच्या छोटेखानी पादचारी पुलावरूनच ये-जा करावी लागत होती. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाची दोन वेळा बससेवा सुरू झाली आणि बंदही झाली. आजही या भागात बेस्टच्या बसची प्रवाशी सुविधा उपलब्ध असून एनएमएमटीची नकारघंटा कायम आहे. या छोटेखानी पादचारी पुलावरून येणार्या महिलांना लुटमारीच्या घटनांचा सामना करावा लागला होता. कालांतरांने स्थानिक रहीवाशांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नाल्यावर लोकवर्गणीतून श्रमदानातून पुल उभारला. पण त्याही ठिकाणी वीज नसल्याने रात्रीच्या अंधारात व दुपारच्या वेळी लुटमारीच्या घटना घडल्या.
सुरूवातीच्या काळात तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी जावे लागत असे. तुर्भे पोलीस ठाणे सानपाडा पामबीच परिसरापासून लांब असल्याने व येण्या-जाण्यास रिक्षाशिवाय पर्याय नसल्याने नागरिकदेखील तक्रार करण्यास टाळाटाळ करत असत. काही महिन्यापासून सानपाडा पेट्रोलपंपासमोरील महापालिकेच्या हुतात्मा बाबु गेनू मैदानात गणेश मंदीरालगत सानपाडा पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे.
रेल्वे रूळालगत व कारशेड तसेच पामबीच मार्गालगत हा सानपाडा पामबीच परिसर गेल्या दोन दशकाच्या कालावधीत विकसित झाला आहे. येथील सदनिकांच्या व दुकानांच्या किंमतींनी गगनभरारी मारली आहे. हा परिसर विस्तीर्ण असून लोकसंख्यादेखील ३० हजाराच्या घरात गेली आहे. पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र भुखंड आरक्षित असतानाही राज्याच्या गृहखात्याकडून या ठिकाणी पोलीस ठाणे उभारण्याविषयी चालढकलच केलेली आहे.
या ठिकाणी पोलीस ठाणे उभारण्यात यावे यासाठी मनसेचे विलास घोणे, विठ्ठल गावडे, स्थानिक नगरसेवक व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, ऍड. रमेश त्रिपाठी यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी गृहखात्याकडे पाठपुरावा केेलेला आहे. सानपाडा पामबीच परिसराचा विस्तीर्ण परिसर आणि नजीकच्या भविष्यात लोकसंख्येत आणखी पडणारी भर तसेच उपलब्ध असलेला भुखंड पाहता लवकरात लवकर गृहखात्याने या ठिकाणी पोलीस ठाण्याची निर्मिती करून स्थानिक रहीवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनसेचे स्थानिक भागातील पदाधिकारी विलास घोणे व विठ्ठल गावडे यांनी केली आहे.