नवी मुंबई: ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेने राजन विचारे यांची उमेदवारी जाहीर केल्याने बेलापूर व ऐरोली मतदार संघातील स्थानिक नेत्यांच्या कामगिरीवरून विधानसभेची उमेदवारी देण्याचे सेना नेतृत्वाने निश्चित केल्याचे संकेत दिले आहेत. सेना नेतृत्वाचा कल पाहून ऐरोली विभागात जिल्हाप्रमुख विजय चौगुले तर बेलापूर मतदार संघात नगरसेवक विठ्ठल मोरे यांनी कंबर कसली असून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्याचा सपाटा चालविला आहे.
मागील लोकसभा निवडणूकीत संजीव नाईक यांना ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघातून सुमारे ४६ हजार मताधिक्य नवी मुंबईतून मिळाले होते. पुढे झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत हे मताधिक्य २८ हजारांपर्यंत घटल्याचे पहावयास मिळाले होते. दरम्यान देशात लोकशाही आघाडी विरूध्द असलेले जनमत व मोदींची हवा यामुळे शिवसेना ठाणे मतदारसंघात आश्चर्य घडवू पहात आहे. गेली दोन वर्षे नवी मुंबई शिवसेनेत कोणतीही जान असल्याचे पहावयास मिळाले नव्हते.
जिल्हाप्रमुख विजय चौगुले हे वडार समाजाचे राष्ट्रीय पुढारी म्हणून मेळावे घेत असताना नवी मुंबईकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले होते. परंतू विठ्ठल मोरे शिवसेनेत आल्यानंतर व त्यांनी मिळविलेल्या विजयामुळे शिवसेनेत पुन्हा चैतन्य पसरल्याचे पहावयास मिळत आहे. ४जानेवारी रोजी बेलापूर विधानसभा संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे यांनी भरविलेल्या कार्यकर्ता मेळाव्यास न भुतो न भविष्यती असा पाठींबा मिळाल्याने शिवसेनेने पूर्ण ताकद नवी मुबंईत केंद्रीत केली आहे. ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईकांचे पुतणे वैभव नाईक यांस गळास लावून ऐरोली मतदार संघात राष्ट्रवादीची मदार असलेल्या भागातच खिंडार पाडल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. वैभव नाईक यांच्या प्रवेशामुळे आतापर्यंत कोषात असलेले विजय चौगुले पुन्हा सक्रिय झाल्याचे नवी मुंबईकर पहात आहेत. वैभव नाईक यांनी घणसोली, कोपरखैरणे व वाशीच्या विभागाची जबाबदारी घेतली आहे. तर विठ्ठल मोरे, गायखे, रंजना शिंत्रे यांच्याकडे बेलापूर मतदार संघाची धुरा सोपविली आहे. राजन विचारे यांना बेलापूर व ऐरोली मतदार संघातून किती मते मिळतात यावरून विजय चौगुले, विठ्ठल मोरे, गायखे यांची आमदारकी निश्चित करण्याचे स्पष्ट संकेत पक्षप्रमुखांनी दिली आहेत. परंतू ऐरोली मतदार संघात वैभव नाईक यांना पक्ष नेतृत्वाने ताकद दिल्याने वैभव नाईकही कसून प्रयत्न करीत असल्याने विजय चौगुले काहीसे झाकोळले गेले आहेत. राजन विचारे हे ठाण्याचे उमेदवार असल्याने ठाण्यातून त्यांना मते मिळतीलच हे गृहीत धरून नवी मुंबईतून संजीव नाईकांचा लिड कमी करण्याचा सेना नेतृत्वाच्या प्रयत्नास स्थानिक नेतृत्व, पुढारी कसे साथ देतात यावर शिवसेनेची मदार आहे. निदान भविष्यातील आमदारकीसाठी तरी आता इच्छूकांना प्रामाणिकपणे काम करावे लागेल हे निश्चित.