नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी अस्तित्वाचा तर शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा झालेला आहे. शिवसेनेने आमदार राजन विचारेंसारखा स्वच्छ प्रतिमेचा तगडा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला ही निवडणूक सोपी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘आम आदमी पार्टी’ पक्षाप्रती परप्रातिंयाची लोकप्रियता पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठ्या प्रमाणावर ‘हात’च्या मतांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूकीत आघाडीचा धर्म निभवायचा आणि पालिका निवडणूकीत टक्कर द्यायची या रणनीतीवर ‘जालिम’ उपाय शोधण्यासाठी गतपंचवार्षिकमध्ये पालिका स्तरावर राजकारण खेळताना कॉंग्र्रेसी शिलेदारांना सहन कराव्या लागलेल्या मनस्तापाचा हिशोब चुकता करण्याची स्थानिक पातळीवर मातब्बर कॉंग्रेसींनी तयारी सुरू केल्याचे पडद्याआडच्या घडामोडीवरून पहावयास मिळत आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रचार करून त्यांचे निवडणूक चिन्ह नवी मुंबईकरांमध्ये लोकप्रिय करायचे आणि महापालिका निवडणूकीत स्वबळावर निवडणूक लढविताना आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह सांगायचे अशा दुहेरी कात्रीमुळे कॉंग्रेस पक्षाची नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर हानी झाली असल्याचे कॉंग्रेसी पदाधिकार्यांकडून, कार्यकर्त्यांकडून आणि नगरसेवकांकडून सांगितले जात आहे. नवी मुंबईत पक्षसंघटना वाढविताना राष्ट्रवादीच्या घटकांनी कॉंग्रेसचे खच्चीकरण करण्यात कोणताही मुलाहिजा बाळगला नसल्याने आपण त्यांना लोकसभा व विधानसभा निवडणूकीत मदत करून नवी मुंबईत कॉंग्रेस संपविण्याचे निमत्रंण का द्यायचे असा संतप्त सूरही कॉंग्रेसी घटकांकडून आळविला जावू लागला आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघाबरोबरच नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ऐरोली व बेलापूर हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला बहाल करण्याचा कॉंग्रेस श्रेष्ठींचा निर्णय स्थानिक भागातील कॉंग्रेसींनी आजही मान्य केलेला नाही. त्यामुळेच २००४च्या विधानसभा निवडणूकीत ज्येष्ठ कॉंग्रेसी नेते हरिबंशसिंह यांनी तर २००९च्या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेव भगत यांनी बंडखोरी करत सर्वसामान्य कॉंग्रेसी कार्यकर्त्यांच्या नाराजीला वाट मोकळी करून दिलेली आहे.
नामदेव भगत हे महापालिकेत नगरसेवक, सिडकोत संचालक आणि कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणिस असून प्रदेश कॉंग्रेसमध्ये आणि मंत्रालयीन पातळीवरदेखील त्यांनी गतकाही वर्षात आपला दबदबा निर्माण केला आहे. नामदेव भगत यांनी गेल्या पाच वर्षात विधानसभा निवडणूकीत पराभूत झाल्यावरही सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व क्रिडा उपक्रम राबविताना बेलापूर मतदारसंघात आपला नावलौकीक वाढविण्याचे काम केले आहे. धार्मिक यात्रा, क्रिडा स्पर्धांचे आयोजन, आगरी-कोळी महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह अशा नानाविध कार्यक्रम राबविताना बेलापूर विधानसभा मतदारसंघात आपली प्रबळ दावेदारी आजही कायम ठेवली आहे. दशकभरापेक्षा अधिक कालावधीत नामदेव भगत यांना ज्यांनी त्रास दिला, नामदेव भगत यांचे समूळ राजकीय खच्चीकरण करण्याचाच ज्यांनी प्रयास केला, त्यांनाच मदत का म्हणून, कशासाठी करायची असा प्रश्न नेरूळ, जुईनगर, सानपाडा, शिरवणे, बेलापूर, सिवूड्समधील कॉंग्रेसचे पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्ते आता उघडपणे विचारू लागले आहेत.
दशकभरापूर्वी नेरूळ गावातील गावदेवी यात्राप्रकरणात झालेल्या मारहाणीच्या घटनेत पडद्याआडून नामदेव भगत विरोधकांना मदत करून नामदेव भगत यांना पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणत्या राजकारण्यांने त्यांना नेरूळ गावातूनच पळताभुई थोडी केली होती, तो इतिहास आजही नामदेव भगत समर्थक व कॉंग्रेसी कार्यकर्ते विसरलेले नाहीत. महापालिकेच्या चौथ्या निवडणूकीत नेरूळ सेक्टर १० प्रभागात नामदेव भगत यांच्या प्रभागासाठी शेवटचे तीन-चार दिवस तळ ठोकून कोणीकोणी पडद्यामागून ‘उचापती’ केल्यात त्याचे पुरावे आजही नामदेव भगत समर्थंकांकडून मांडले जात आहे. नेरूळ गावातील ‘बांचोली मैदान’ हा कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका सौ. इंदूमती भगत यांच्या प्रभागातील विषय असताना कोणी त्यामागे हस्तक्षेप केला, कोणी राजकारण करून इंदूमती भगत यांच्या प्रस्तावाचे राजकारण केले हे जगजाहीर असतानाही आमच्याकडून कोणी लोकसभा-विधानसभा निवडणूकीत आम्ही आघाडीचा धर्म पाळावा अशी अपेक्षा का म्हणून बाळगता, असा संतप्त सूरही कॉंग्रेसी छावणीतून आळविला जात आहे.
कॉंग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष व मुलुखमैदानी तोफ असणार्या दशरथ भगत यांच्या पालिका प्रभागात सानपाडा-पामबीच परिसरातील मोराजसमोरील भुखंडावर उद्यान व क्रिडांगण विषयाचे स्थायी समितीत झालेले राजकारण, त्यावर उद्रेक होवून संतप्त दशरथ भगतांना तत्कालीन सभापती अनंत सुतार यांच्यासमक्ष खुर्ची उचलून आपला व्यक्त केलेला राग या घटना आजही दशरथ भगतांचे समर्थक व त्यांच्या प्रभागातील कॉंग्र्रेसी कार्यकर्ते आणि जिल्हा कार्यकारिणीतील त्यांचे पदाधिकारी विसरलेले नाहीत. दशरथ भगत यांचा त्यांच्या पालिका प्रभागात दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांना पराभूत करणे राष्ट्रवादी कॉंग्रेसला शक्य झालेले नाही आणि दशरथ भगतांचे कार्य व असणारा जनसंपर्क पाहता नजीकच्या कालावधीतही ते शक्य होणार नाही. तिसर्या सभागृहातील पालिका निवडणूकीत सानपाड्यातील सिडको कम्युनिटी सेंटरवर झालेला गोंधळ आणि चौथ्या सार्वत्रिक निवडणूकीत सानपाडा-पामबीच भागातील साधु वासवानी शाळेसमोर झालेला गोंधळ आजही खुद्द दशरथ भगत आणि त्यांचे समर्थक विसरलेले नाहीत.
सारसोळे गावातील मनोज मेहेर हे सारसोळे आणि नेरूळ सेक्टर सहामधील नागरी समस्या सोडविण्यासाठी पालिका, मंत्रालय व जनता दरबार हेलपाटे मारत असताना त्यांना एकदाही सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रभागातील नागरी समस्या निवारणासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. हजारो लेखी तक्रारी करून नागरी समस्यांचे निवारण झालेले नाही. असंख्य लेखी पत्रे देवूनही महापौर-उपमहापौेर प्रभागाच्या भेटीला मेहेरांच्या बोलवण्यावरून एकदाही आले नाहीत. सारसोळेच्या जेटीवरील हायमस्ट झालेले राजकारण पालिका अधिकार्यांकडूनच ‘ओपन’ झाल्याने आम्हाला अंधारात मासेमारी करण्यास भाग पाडणार्यांना मदत करणे आमच्या गावातील कोळी समाज करणे शक्यच नसल्याचे मनोज मेहेरच्या निकटवर्तीय ग्रामस्थांकडून उघडपणे बोलले जात आहे.
कॉंग्रेसचे जुईनगरमधील नगरसेवक रंगनाथ औटी यांनाही प्रभागात कामे करताना सातत्याने शीतयुध्दाचा तर कधी होर्डिगबाजीतील लढाईचा सामना करावाच लागत आहे. कॉंग्रेसचे मातब्बर नेते व माजी उपमहापौर आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते रमाकांत म्हात्रेंचे पालिका स्तरावरील राजकारण संपविण्यातसाठी गोठीवलीतही पालिका निवडणूक काळात बर्याच नाट्यमय घडामोडी झाल्या होत्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेसवर कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांची व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. एकीकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत मतांसाठी कॉंग्रेसची मनधरणी केली जाते आणि दुसरीकडे पालिका निवडणूकीत कॉंग्रेसला चिरडायचे या राष्ट्रवादीच्या रणनीतीमुळे लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीला मदत न करता अलिप्त रहायचे असा एकाचा गटाचा सुर आहे तर दुसर्या गटाकडून मात्र लोकसभा निवडणूक संधी आल्याचे रागून पालिका स्तरावर आपल्याशी खेळल्या जात असलेल्या राजकारणाचा हिशोब चुकता करण्याची आक्रमक संतप्तता दुसर्या गटाकडून दाखविली जात आहे.