नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघात येणार्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी ऐरोली मतदारसंघ हा ठाण्याच्या सीमेलगतच असून सध्या या मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे नगरसेवक कमी असले तरी गत लोकसभा-विधानसभा निवडणूकीनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने हा मतदारसंघ शिवसेनेच्या प्रभावाखाली गेल्या काही महिन्यात वाटचाल करत असल्याने लोकसभा निवडणूकीत ऐरोली विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला मताधिक्य देवून विधानसभा निवडणूकीची तालिमच शिवसेनेच्या इच्छूकांकडून सुरू झाल्यान या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने कितीही जोर लावला तरी शिवसेनेची आघाडी रोखणे राष्ट्रवादीच्या रथी-महारथी धुरींणींना अवघड ठरणार आहे.
गतलोकसभा निवडणूकीत ठाण्यासारख्या बालेकिल्ल्यात झालेला पराभव शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागल्याने हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे आणण्यासाठी शिवसेनेकडून फार पूर्वीपासून रणनीती आखली जात आहे. मतदारसंघ खेचायचाच या इर्षेने पेटलेल्या शिवसेनेने राजन विचारेंसारख्या स्वच्छ प्रतिमेच्या आमदारालाच लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरविले आहे. राजन विचारेंची ठाणे महापौरपदाची कारकीर्द ठाणेकरांना सुखावणारी असल्याने ठाण्यातून शिवसेनेला धोबीपछाड करणे तसेच ठाण्यातून जास्तीत जास्त मतदान खेचणे राष्ट्रवादी कॉंग्रेसला शक्य होणार नाही. गतलोकसभा निवडणूकीच्या तुलनेत मनसेचा प्रभाव नसल्याने राजन राजेंसारखी १ लाख ३४ हजार मते या निवडणूकीत पुन्हा प्राप्त करणे मनसेच्या उमेदवाराला जमणार नाही. ठाण्यातील मताची शिदोरी बांधून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारण्याची योजना शिवसेनेच्या ‘थिंक टँक’कडून आखली जात आहे.
ऐरोली विधानसभा मतदारसंघ हा ठाण्याच्या लगतच असून ठाण्यातील शिवसैनिकांची फौज ऐरोली-दिघा व लगतच्या परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घडामोडीवर लक्ष्य ठेवून आहे. त्यातच ऐरोली मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असंतुष्ठांनी संख्या गतकाही महिन्यापासून वाढीस लागली आहे. पालिकेतील नाराज असंतुष्ठ आत्म्याची गुप्त बैठक गोठीवली गावात एका मातब्बराच्या बंगल्यावर झाली होती, हा इतिहासही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. गतविधानसभा निवडणूकीत ऐरोली मतदारसंघात कोपरखैरणे आणि तुर्भेने राष्ट्रवादी कॉंग्रेसला मनापासून सहकार्य केल्याने अकरा हजार ९५७ मतांचे मताधिक्य मिळाले होते. या जागेवर गतविधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला विजय मिळाला असला तरी राष्ट्रवादीच्या धुरींणांची दमछाक झाल्याचे ठाणे जिल्ह्याने जवळून पाहिले होते. नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून महाराष्ट्रात ओळखल्या जाणार्या ना. गणेश नाईकांना बेलापूर सोडून निवडणूक कालावधीत सर्वाधिक काळ ऐरोली मतदारसंघातच ठाण मांडून त्याकाळात बसावे लागले होते. घणसोली कॉलनीपर्यत राष्ट्रवादी कॉंग्रेस पिछाडीवर होती. संदीप नाईकांना त्या निवडणूकीत ७९ हजार ७५ मते तर शिवसेनेच्या उमेदवार असणार्या जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंना ६७ हजार ११८ मते पडली होती.
ऐरोली मतदारसंघ दिघ्यापासून तुर्भ्यापर्यत विखुरलेला आहे. तुर्भे हा गत विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विजयातील ‘मॅन ऑफ द मॅच’या पुरस्काराचा मानकरी ठरला होता. तुर्भेतून मतदान राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी खेचताना सुरेश कुलकर्णीनींनी जीवाचे रान केले होते. सुरेश कुलकर्णी आजही तुर्भे परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकखांबी तंबू असून येथील जनाधार सुरेश कुलकर्णींच्या मागे आहे. स्थायी समितीच्या कारभारात सुरेश कुलकर्णीच्या चेहर्यावर गतकाही महिन्यात उमटलेली नाराजी केवळ स्थायी समिती सदस्य आणि पालिका अधिकारी यांच्यापुरतीच मर्यादीत न राहता पालिका मुख्यालयात वावरणार्या राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जगजाहीर झाली होती.
कोपरखैरणे हा नोड राष्ट्रवादीकरांचे पर्यायाने बोनकोडेकरांचे ‘होमपीच’ मानले जात आहे. तथापि या होमपीचच्या खेळपट्टीला तडे गेल्याने राष्ट्रवादीच्या छावणीतील चेंडू स्वींग होवू लागले आहे. एकेकाळी राष्ट्रवादीच्या फलदाजांना अनुकूल असणारी खेळपट्टी तडे गेल्यामुळे शिवसेनेच्या गोलदाजांना ही खेळपट्टी या निवडणूकीत मोठ्या प्रमाणावर मदत करणारी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक हे एक निष्णात क्रिकेटपटू असल्याने त्यांना यामागील मतीथार्थ लागलीच समजून येईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तनाने असणारा व मनाने कुठेही स्वच्ंछदी फिरणारा एक ज्येष्ठ नगरसेवक सतत ‘शिव’राळ भाषा वापरत असल्याने तो राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी काम करण्याची सुत‘राम’ही शक्यता नाही. त्यातच दीड वर्षापूर्वी एका सातारी घटकाने परप्रातिंय पदाधिकार्याच्या सहकार्याने एका माजी नगरसेवकाची प्रतिमा मलिन करण्याचा केलेला प्रयास, लोकांसमोरच वापरलेली भाषा आणि बातम्या मॅनेज करून पातळी ओंलाडून केलेले राजकारण, सरकारराज या वर्तमानपत्राचे घराघरात केलेले वितरण कोपरखैरणे भागातील पुणेरी समाज आजही विसरलेला नाही. हा माणूस बोनकोडेचा निष्ठावंत असतानाही त्याला वार्यावर सोडल्याचे शल्य केवळ कोपरखैराणेतच नाही तर भाजी, फळ आणि कांदा मार्केटमधील घटकांकडून उघडपणे बोलले जात असून आपल्या माणसाशी घडलेल्या प्रकाराबाबत नाराजीचा संतप्त सूरही आजही आळविला जात आहे.
वैभव नाईकांनी शिवसेनेचा खांद्यावर घेतलेला भगवा ऐरोली मतदारसंघात शिवसेनेला निर्णायक आघाडीसाठी चांगलाच हातभार लावण्याची चिन्हे आतापासून निर्माण झाली आहे. ऑक्टोबर २०१४च्या विधानसभा निवडणूकीसाठी ऐरोली मतदारसंघातून शिवसेनेच्या छावणीतून चर्चिल्या जाणार्या नावांपैकी वैभव नाईक हे एक प्रबळ दावेदार मानले जातात. लोकसभेनंतर चार महिन्यासाठी होणार्या विधानसभेची लोकसभा निवडणूक रंगीत तालिमच असल्याने व आपल्या मागे असलेला जनाधार मतपेटीत दाखविण्यासाठी वैभव नाईकांनाही परिश्रमाची शिकस्त करावी लागणार आहे. वैभव नाईकांच्या पाठीशी असणारा युवा वर्ग, सर्वसामान्यांमध्ये वैभव नाईकांप्रती असणारे आकर्षण, कै. तुकाराम नाईकांचा या भागात आजही मोठ्या संख्येने असणारा चाहता वर्ग आदी सर्व बाबी ऐरोली मतदारसंघात शिवसेनेच्या पथ्यावर पडणार आहे.
ऐरोली मतदारसंघातील कॉंग्रेसी घटकांची राष्ट्रवादी कॉंग्रेसवर असलेली नाराजीदेखील जगजाहीर आहे. आघाडी असली तरी लोकसभा-विधानसभा निवडणूकीत आम्ही यांचे काम करायचे आणि वाढत्या ताकदीचा फायदा घेत स्वबळाच्या नावाखाली यांनी आम्हाला चिरडायचे असा नाराजीचा पण काहीसा संतप्त सूर येथील कॉंग्रेसी पदाधिकार्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून आळविला जात आहे.
घणसोली कॉलनी व घणसोली गाव परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक असले तरी गत लोकसभा व विधानसभा निवडणूकीत येथे मताधिक्य मिळविणे राष्ट्रवादी कॉंग्रेसला शक्य झाले नव्हते. पालिका निवडणूकीत या ठिकाणी राष्ट्रवादीचे शिलेदार विजयी होतात, पण हेच शिलेदार लोकसभा व विधानसभा निवडणूकीत पक्षाला खुद्द स्थानिक पातळीवरील सुप्रिमोलाही मताधिक्य मिळवून देवू शकत नाही. लोकसभा पोटनिवडणूकीत संजीव नाईक हे आनंद पराजंपेच्या विरोधात पराभूत झाल्यावर घणसोली गावातीलच बोनकोडेचा नातेवाईक गोव्याला श्रमपरिहारासाठी दुसर्याच दिवशी निघून गेला असल्याची खमंग चर्चा आजही अधूनमधून होतच असते. त्यातच घणसोली गावात आगामी पालिका निवडणूकीविषयी पाटीलकीतच सुंदोपसुंदी अर्ंतगत धुसफुसत असल्याने राष्ट्रवादीला याचाही फटका बसणार आहे. दिघा परिसरात शिवसेनेचा प्रभाव असल्याने तेथे शिवसेनेपुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसची फारशी डाळ शिजणार नाही.
ऐरोलीमध्ये तात्या तेली, अनंत सुतार, एम.के.मढवी, जी.एस.पाटील, अशोक भाऊ पाटील अशी नानाविध नावांची मांदीयाळी असली तरी या ठिकाणीदेखील लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचा प्रभाव रोखणे या घटकांना अवघड जाणार आहे. मनोज हळदणकर प्रकरणाने आजही येथील शिवसैनिक संतप्त असून ते आपला राग मतपेटीतून व्यक्त करण्याची शक्यता आहे.
ऐरोलीमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंचा करिश्मा आहे. या भागात पालिका सभागृहातील नगरसेवक व सेनेचे पक्षीय पदाधिकारी प्रबळ असल्याने या भागात शिवसेनेची घोडदौड रोखण्यासाठी राष्ट्रवादीला चमत्काराचाच आधार घ्यावा लागणार आहे. विधानसभेच्या संभाव्य नावांमध्ये खुद्द जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंचेही नाव असल्याने चौगुलेंना आपली लोकप्रियता व पाठीमागे असलेला जनाधार मतपेटीतून दाखवून देण्याची आणि लोकसभा-विधानसभा निवडणूकीतील पराभवाचा हिशोब चुकता करण्याची संधी आयती चालून आलेली आहे.
ऐरोली भाग ठाण्याला लागूनच असल्याने आ. राजन विचारेंच्या प्रचारासाठी ठाण्यातील शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी ऐरोली विधानसभेतही प्रचारादरम्यान आपला करिश्मा दाखविण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजीव नाईक हे ऐरोलीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संदीप नाईक यांचे वडीलबंधू आहेत. ऐरोलीतून संजीव नाईकांना मतदानात धोबीपछाड मिळाल्यास काही महिन्यांनी होणार्या विधानसभा निवडणूकीसाठी संदीप नाईकांना धोक्याची घंटा ठरू शकते.