नवी मुंबई : देशात सर्वत्र नमो, नमोचा जप चाललेला असतानाच ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पायाखालची वाळू सरकण्यास प्रारंभ झाला आहे. निवडणूक रिंगणात शिवसेना एकीकडे आक्रमकता दाखवित असतानाच दुसरीकडे मनसेचा पाहिजे तसा जोर नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून उघडपणे चिंतेचा सूर आळविला जात आहे. त्यातच आम आदमी पार्टीदेखील नव्याने सहभागी झाल्याने हा पक्ष कोणाला पोहोचविणार आणि कोणाला संपविणार याचा काहीही अंदाज नसल्याने आपली ठाण्याची जागा टिकविताना राष्ट्रवादी कॉंग्रेसची दमछाक होणार असल्याचे चित्र आतापासूनच निर्माण झाले आहे.
गतलोकसभा निवडणूकीत राज्यामध्ये मनसेच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे शिवसेना उमेदवार पराभूत झाले होते. ठाणे लोकसभा मतदारसंघातही हेच चित्र पहावयास मिळाले. मनसेचे तत्कालीन उमेदवार राजन राजेंना मिळालेल्या १ लाख ३४ हजार मतांमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा ४९ हजार मतांनी दणदणीत विजय झाला होता. कधी नव्हे ते प्रथमच शिवसेनेच्या गडाला भगदाड पडून त्याजागी घड्याळाची टिकटिक सुरू झाली. पण आजमितीला बदलत्या राजकीय घडामोडीमुळे आणि शिवसेनेने ठाण्यातील उमेदवार देत ठाणेकरांवरील आपले प्रेम पुन्हा एकवार प्रगट केल्याने राष्ट्रवादीच्या संजीव नाईकांना ही लढत सोपी नसल्याचे स्पष्ट होवू लागले आहे.
गतनिवडणूक आणि आताची निवडणूक या पाच वर्षात मनसेमध्ये संघटनात्मक पातळीवर बरीच उलथापालथ झाल्याने मनसेचा नवी मुंबई कार्यक्षेत्रात पाहिजे तसा पूर्वीइतका दबदबा राहीलेला नाही. आताची मनसे १००-२०० मोजक्या कार्यकर्त्यांसोबतची जनआंदोलने आणि जनआंदोलने झाल्यावर मिडीयाच्या दरबारी चपला झिजवून बातम्या छापून आणण्याइतपतच सिमीत राहीलेली आहे. त्यातच ठाण्यातील मनसेकारांनी मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांना ‘मनसे’ स्वीकारले नसल्याने त्यांना ठाण्यातूनच अडचणी निर्माण होण्यास सुरूवात झालेली आहे. निवडणूकीच्या तोंडावर आयात झालेल्या उमेदवाराचे स्वागत ठाण्यातील जुन्याजाणत्या मनसेकारांनी न केल्याने ठाण्यात गोंधळ आणि नवी मुंबईत ‘नो अंदाज’ अशी दुहेरी कात्रीत अभिजित पानसे अडकल्याचे चित्र सुरूवातीच्या टप्प्यात निर्माण झाले आहे.
गतलोकसभेच्या तोंडावर मनसेची स्थापना झालेली होती. युवा पिढीवरच राज ठाकरेंचा प्रभाव होता. नंतर मात्र मनसेची नवी मुंबई-ठाण्यात पडझड झाली. ठाण्यातील पालिका निवडणूकीत मनसेला फारसे यश मिळाले नाही आणि नवी मुंबईत तर मनसेला खातेही उघडता आले नाही. मनसेला यंदाचे वातावरण पाहता १ लाखापर्यतही मते मिळणार की नाही याबाबत खुद्द मनसैनिकच सांशक आहेत.
शिवसेनेने मात्र यावेळी आमदार राजन विचारेंसारखा तगडा व स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवून ठाण्याचा गड पुन्हा खेचून आणण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले हे गतलोकसभा निवडणूकीत व विधानसभा मतदारसंघात ऐरोलीतून पराभूत झालेे होते. त्यांना या दोन निवडणूकांचा दांडगा अनुभव असल्याने शिवसेना कुठे कमजोर तर कुठे प्रबळ याचा पुरेपूर अंदाज आलेला आहे. त्यांनी नवी मुंबईत गेल्या काही दिवसापासून प्रचाराची सूत्रे हाती घेतली असून आघाडीवर ते स्वत: नेतृत्व करत आहेत. सानपाडा-पामबीचवरिल वडार भवनात शाखाशाखातील पदाधिकार्यांची, गटप्रमुखांची व शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेवून त्यांनी तुतारी फुंकली आहे. यावेळी त्यांच्या दिमतीला १७ नगरसेवकांची फौज आणि भक्कम पक्षबांधणीचे पाठबळ आहे. महिला संघठक रंजना शिंत्रे यांची महिला आघाडीदेखील प्रबळ आहे. मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसची महिला आघाडी फारशी ऐकीवातही नाही. जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंच्या सोबतीला वैभव नाईक, ऍड. मनोहर गायखे, सुरेश म्हात्रे, विजय माने यासह अनेक दमदार सहकारी सक्रिय सहभागी झाले आहेत. याउलट राष्ट्रवादी कॉंग्रेसची नवी मुंबईतील पक्षसंघटना तकलादू असून जिल्हाध्यक्ष गोपीनाथ ठाकूरदेखील नवी मुंबईकरांना फारसे परिचित नाहीत. तालुकाध्यक्षांना कार्यालयातून बाहेर पडण्यास व वार्डा वार्डात फिरण्यास अद्यापि स्वारस्य निर्माण झालेली नाही. शिवसेनेच्या विजय चौगुलेंना बोनकोडेतून वैभव नाईकांची रसद मिळाल्याने ऐरोली विधानसभा मतदारसंघात नव्याने बहरताना पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही असंतुष्ठ बिभिषणांची चौगुले-वैभव नाईकांना साथ पडद्याआडून मिळण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला ही निवडणूक दररोज नवनव्या अडचणीत भर टाकणारी ठरत आहे.
अरविंद केजरीवालांचा ‘आम आदमी पार्टी’ हादेखील ठाणे लोकसभा निवडणूक रिंगणात सहभागी झाला असून त्यांनीदेखील संजीव सहानेंसारखा चांगला उमेदवार पणाला लावला आहे. आपला दिल्लीत सत्ता राखता आली नसली तरी आजही सुशिक्षितांमध्ये आपचे आणि केजरीवालांचे वलय कायम आहे. परप्रातिंय घटकांमध्ये केजरीवाल आणि आपची लोकप्रियता कमी न झाल्याचे उघडपणे पहावयास मिळत आहे. आपने ठाणे, भाईंदर, नवी मुंबई मिळून ३० ते ४० हजार मते मिळविली तर तो फटका शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीला अधिक बसण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंनी मोदीवर प्रेम व्यक्त केले असले तरी नवी मुंबईतील गुजराथी भाषिकांवर त्यांचा फारसा प्रभाव पडला नसल्याचे पहावयास मिळते. दिल्लीदरबारी नमोचे हात बळकट करण्यासाठी राजन विचारेंना लोकसभेत पाठविणे गरजेचे असल्याचे गुजराथी भाषिकांकडून बोललेे जात आहे. भाजपा पदाधिकार्यांनाही एका मतामुळे अटलबिहारी वाजपेंयीचे सरकार कोसळल्याची जाणिव असल्याने भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मॅनेज होणार नसल्याचे भाजपा नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. बहूमतासाठी आम्ही ठाण्याची जागा ए प्लसमध्ये गृहीत धरल्याचे भाजपा पदाधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे.
महापौरपदाच्या कालावधीत ठसा उमटवलेले आमदार राजन विचारेंच्या रूपाने शिवसेनेने ठाण्याचा उमेदवार दिला असल्याने ठाण्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला अटीतटीचा संघर्ष करावा लागणार आहे. तीनही मतदारसंघात लीडबाबत शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरेंने योग्य ते निर्देश दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मनसेला गतनिवडणूकीएवढी मते मिळणार नसल्याचे व अभिजित पानसेंना मनसेतून ‘मनसे’ सहकार्य मिळणार नसल्याचे आजचे चित्र आहे. नवी मुंबई परिसरदेखील राष्ट्रवादीला फारसा आलबेल राहीला नसल्याने नवी मुंबईतून कितपत रसद राष्ट्रवादीला, कितपत शिवसेनेला आणि कितपत आपला मिळणार याबाबत आजही संभ्रम आहे. मनसेच्या गजानन काळे, संदीप गलुगडे यांनी चौकसभांची जय्यत तयारी केली असली तरी त्याचा फारसा फरक पडण्याची शक्यता कमीच आहे.
(साभार : दै. ‘गांवकरी