अमोल शीरसागर
नवी मुंबई : ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांचा व्यक्तिगत पातळीवर बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदारसंघात जनसंपर्क दांडगा आहे. सर्वपक्षीय घटकांशी, नगरसेवकांशी, पदाधिकार्यांशी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी त्यांचा व्यक्तिगत ‘टच’ असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये ओबामांचा जनसंपर्क राष्ट्रवादी कॉंग्रेसला तारणार का हीच चर्चा सुरू झाली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघ सध्या राज्यामध्ये चर्चेतल्या मतदारसंघापैकी एक आहे. एकेकाळी शिवसेनेचा गड असणारा हा मतदारसंघ शिवसेनेच्याच काही चुकांमुळे आणि मतविभागणीमुळे राष्ट्रवादीमय झाला. तथापि या मतदारसंघातील पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागल्याने आणि खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्याविषयीचे ‘शल्य’ जाहीरपणे व्यक्त केल्यामुळे ही निवडणूक शिवसेनेकडून प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. त्यांनी हा मतदारसंघ खेचून आणण्यासाठी स्वच्छ प्रतिमेची ठाण्यातील आमदार राजन विचारेंना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यातच मनसेचा गतवेळेप्रमाणे फारसा जोर नसल्याने एक लाख ३४ हजार मतांना कुर्निसात करणारी मनसे एक लाखाच्या आतच अडखळणार असल्याने हाही अडथळा राष्ट्रवादीसाठी नुकसानदायी व शिवसेनेसाठी फलदायी ठरणार आहे. आम आदमी पक्षाने निर्माण केलेले आव्हान, परप्रातिंयामध्ये आपची लोकप्रियता, सुशिक्षितांमध्ये आपचे आकर्षण या बाबीदेखील राष्ट्रवादीसाठी चिंता वाढवित असून शिवसेनेकडून सर्वच बाजूंनी अनुकूल वातावरण पहिल्याच टप्प्यात निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची पक्षबांधणी कमकुवत असल्याने, जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष आणि अन्य पदाधिकार्यांचा फारसा प्रभाव नसल्याने ही निवडणूक पुन्हा एकवार नाईक परिवाराच्या वैयक्तिक करिश्म्यावर लढवावी लागणार आहे. शिवसेनेने प्रचारासाठी जय्यत तयारी सुरू केली असून शाखांशाखांमध्ये रणनीती आखली जात आहे. खुद्द शिवसेना उमेदवार आमदार राजन विचारेंनीही नवी मुंबईच्या अनेक भागांना भेटी देण्याचा धडाका लावल्याने ही निवडणूक शिवसेना एका वेगळ्याच जिद्दीने लढणार असल्याचे स्पष्ट झाल्याने शिवसैनिकांतही नव्याने उत्साह संचारला आहे.
एकेकाळी नवी मुंबई हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पर्यायाने गणेश नाईकांचा बालेकिल्ला राजकीय क्षेत्रात गणला जायचा. पण आता तशी परिस्थिती राहीलेली नाही. शिवसेना नव्या जोमाने पुढे येवू लागली आहे. गजानन काळे, संदीप गलुगडे, मंदार मोरे, निलेश बाणखिले, विनोद पार्टे, धीरज भोईर, गजानन खबाले, शिरीष पाटील, अमर पाटील, सविनय म्हात्रे, यांच्यासारख्यांमुळे मनसे नावारूपाला येवू लागली आहे. बाबाजी गोडसे, जयेश मढवी, विठ्ठल गावडे, नितीन नाईक यासारख्या अनेक शाखाध्यक्षांमुळे मनसेची पायामुळे प्रभागाप्रभागात विस्तारू लागली आहेत. जनहितची धुरा मनसेने हाजी शाहनवाझसारख्या मुरब्बी धुरीणाकडे सोपविल्याने मुस्लिमांना मनसे पर्याय उपलब्ध झाला आहे. जुन्या कार्यकारिणीच्या थंडपणामुळे निस्तेज झालेली मनसे आता आक्रमकतेमुळे जनसामान्यांमध्ये चर्चिली जावू लागली आहे. ना. गणेश नाईकांच्याही भाषणात नाविन्य राहीले नसल्याचा सूर राष्ट्रवादीच्याच घटकांकडून आळविला जावू लागला आहे. संजीव नाईकांना ठाणे-भाईंदरवर लक्ष केंद्रीत करावयाचे असल्याने आमदार संदीप नाईकांनाच नवी मुंबईत प्रचारयंत्रणा सांभाळावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आमदार संदीप नाईकांचा ऐरोली व बेलापूर या दोन्ही मतदारसंघात जनसंपर्क दांडगा आहे. वारंवार काढलेल्या पाहणी अभियानांमुळे जनसामान्यांची नस त्यांना समजलेली आहे. पालिकेच्या तिसर्या सभागृहात वावरताना सलग तीन स्थायी समिती सभापतीपद सांभाळताना त्यांनी ‘सभापती आपल्या अंगणात’ हे अभियान चालविले होते. पावसाळीपूर्व कामांची पाहणी करताना त्यांनी नवी मुंबईकरांची मानसिकता, राहणीमान, समस्या याचाही अभ्यास केला होता. बोनकोडेत ना. गणेश नाईक, संजीव नाईकांच्या तुलनेत संदीप नाईकांची गुप्तहेर यंत्रणा प्रभावी आहे. संदीप नाईक ऐरोलीचे आमदार असले तरी बेलापूरातील खडा न् खडा माहिती त्यांना तात्काळ उपलब्ध व्हायची. पक्षीय नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासोबत इतर पक्षामध्ये काय चालले आहे याचाही अपडेट संदीप नाईकांकडे तात्काळ जमा होत असतो.
संदीप नाईकांचा नवी मुंबईत विखुरलेला मित्रपरिवार पाहता आणि सिडको सदनिकाधारकांमध्ये त्यांची प्रतिमा पाहता संदीप नाईकांनाच प्रचाराची धुरा सांभाळावी लागणार आहे. कंडोनिअमअंतर्गत झालेली सिडको वसाहतीमधील कामे ही संदीप नाईकांच्या परिश्रमाची पोचपावती असल्याची अशी कृतज्ञता आजही सिडको वसाहतीमधून व्यक्त करण्यात येत आहे. ऐरोली मतदारसंघात सर्व काही आलबेल नसल्याने व घरातच भाऊबंदकीचे आव्हान मिळाल्याने संदीप नाईकांना ऐरोलीचा गड सांभाळताना बेलापूरातही डागडूजी करण्याची करामत करावी लागणार आहे.