नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेला बदलत्या राजकीय समीकरणामुळे कागदोपत्री पालिका प्रभागातील नगरसेवकांचे संख्याबळ पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेस ‘प्रबळ’ वाटत असली तरी प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच आहे. कुकशेत या सुरज पाटलांचा प्रभाग वगळता स्नेहा पालकर, नारायण पाटील, रतन नामदेव मांडवे, दिलीप घोडेकर, इंदूमती भगत, सतीश रामाणे यांच्या प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी फारसे प्रभावी चित्र नाही. त्यामुळे नेरूळ पश्चिमेला संदीप नाईकांचा मित्र परिवार, काही प्रमाणात व्यक्तिगत असलेला जनसंपर्क, नेरूळ पश्चिमेला संदीप नाईकांनी केलेले मदतकार्य पाहता नेरूळ पश्चिमेची धुरा संदीप नाईकांनी स्वत:कडे घ्यावी असा सूर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
नेरूळ पश्चिमेला सुरूवात करतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका स्नेहा पालकरांच्या प्रभागापासून होते. त्यालगतच असलेल्या प्रभागात कॉंग्रेसचे नगरसेवक रंगनाथ औटी यांचा प्रभाग आहे. एकेकाळी रंगनाथ औैटी हे राष्ट्रवादी कॉंगेे्रेसचे वॉर्ड अध्यक्ष होते. पालिकेच्या चौथ्या निवडणूकीत तिकीट कापले गेल्यावर कॉंग्रेस पक्षात नामदेव भगतांच्या माध्यमातून प्रवेश करून त्यांनी निवडणूक लढविली. शिवसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख राजेश पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक दिग्गज नेते जयवंत सुतार आदी रथीमहारथींचा पराभव करून रंगनाथ औटी पालिका सभागृहात दाखल झाले. रंगनाथ औटींवर असलेला नामदेव भगतांचा प्रभाव पाहता आणि स्थानिक पातळीवर जयवंत सुतारांशी रंगनाथ औटींशी असलेले राजकीय ‘हाडवैर’ पाहता औटी राष्ट्रवादीशी पर्यायाने जयवंत सुतारांशी जुळवून घेण्याची शक्यता कमीच आहे
नेरूळ सेक्टर २ आणि ४ चे प्रतिनिधीत्व करणार्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका स्नेहा पालकर या तीन वेळा पालिकेत निवडून गेल्या असल्या तरी या प्रभागात शिवसेनेची व कॉंग्रेसची ताकदही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तोडीस तोड आहे. शिवसेनेत या भागात अकरा गट कार्यरत असले तरी त्यांचे मतभेद पालिका निवडणूकीतच उफाळून येतात. लोकसभा व विधानसभा निवडणूकीत हे गट आपली गटबाजी संपवून एकजीवपणे काम करत असल्याचा इतिहास आहे. कॉंग्रेसचे रविंद्र सावंत यांचे कार्य पाहता व त्यांच्या पाठीशी असलेला जनाधार पाहता त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे राष्ट्रवादी कॉंग्रेसला परवडणारे नाही. रविंद्र सावंतांची नगरसेवक बनण्याची महत्वाकांक्षा पाहता ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रचार करून आपल्या पायावर धोंडा मारून घेणार नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. नेरूळ सेक्टर २-४चे गणित पाहता शिवसेनेला रोखण्यासाठी त्यांना रविंद्र सावंतांची मनधरणी करावी लागण्याची शक्यता आहे.
नेरूळ सेक्टर ६ आणि सारसोळे गावातील नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचा असला तरी या प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात नाराजीचे वातावरण आहे. या भागातील कॉंग्रेसी घटकांवर पूर्णपणे नामदेव भगतांचा प्रभाव असून हजारोंच्या संख्येने लेखी तक्रारी करून, निवेदने देवून प्रभागातील नागरी समस्या सुटत नसल्याच्या व नागरी सुविधा रहीवाशांना मिळत नसल्याचा संताप कॉंग्रेसी घटकांकडून व्यक्त केला जात आहे. गणपत शेलार आणि विरेंद्र लगाडे या जोडगोळीने शिवसेनेची भक्कम बांधणीसाठी गेल्या काही वर्षापासून प्रयास सुरू केल्याने शिवसेनेची येथील स्थिती सुधारली आहे. गणपत शेलारांनी अपक्ष निवडणूक लढवून येथील आपल्या पाठीशी असणारा जनाधार वेळोवेळी स्पष्ट केलेला आहे. या भागातील हॅट्ट्रीकवीर नगरसेवक नारायण पाटील हे वारंवार आजारी पडत गेल्याने या प्रभागात विरोधक विशेषत: कॉंग्रेस प्रबळ होत गेली. प्रल्हाद पाटील आणि समुद्रा पाटील या उभयंताना नारायण पाटलांसारखी किमया साध्य करणे अद्यापि शक्य झाले नाही. बामणदेवाच्या भंडार्याला येण्यास बोनकोडेकरांना येण्यास सवड मिळत नसल्याचा संताप सारसोळेच्या कोळीवाड्यातून उघडपणे व्यक्त केला जात आहे. कॉंग्रेसच्या मनोज मेहेरांचा सामाजिक कार्यातून सारसोळे गावामध्ये व नेरूळ सेक्टर सहामध्ये नावलौकीक वाढीस लागला आहे. मनोज मेहेर यांनी महापौर व उपमहापौर तसेच पालकमंत्र्यांनाही निवेदने देवूनही प्रभागातील कामे न झाल्याचा संताप मनोज मेहेरांच्या निकटवर्तीयांकडून उघडपणे व्यक्त केला जात आहे. नेरूळ सेक्टर सहामधील दत्तगुरू इमारतीचा धोकादायकपणा, नेरूळ सीव्ह्यू सोसायटीची उद्यानालगतची तुटलेली संरक्षक भिंत, मार्च महिन्यात भाजी मार्केट मैदानात सार्वजनिक कार्यक्रमांस केलेला विरोध यासह अन्य कामांमुळे मनोज मेहेर हे सिडको वसाहती आणि खासगी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. पालिका प्रशासन पातळीवर प्रभागातील कामांच्या बाबतीत झालेली उपेक्षा पाहता या प्रभागातील कॉंग्रेस तटस्थ राहण्याची अथवा शिवसेनेला मदत करण्याची शक्यता आहे. गतलोकसभा निवडणूकीत या प्रभागातून शिवसेनेला मताधिक्य मिळाले होते. सारसोळे गावात आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात व सारसोळे गावामधील कोळी वाडा तसेच अन्य ग्रामस्थांमध्ये बाजूच्या प्रभागातील शिवसेना नगरसेवक रतन नामदेव मांडवेंना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. आरपीआयचे युवा नेते मनोज तांडेल यांच्याही कार्याचा व जनसंपर्काचा शिवसेनेला फायदाच होणार आहे.
नेरूळ सेक्टर ८ परिसरात शिवसेना नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांना मानणारा वर्ग मोठा असून त्यांच्या पाठीशी जनाधारही आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सातत्याने मांडवेंना अडचणीत आणण्याचे व त्यांचे कार्यकर्ते फोडण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला गेल्याचे विभागातील जनतेने जवळून पाहिले आहे. विरोधी पक्षातील नगरसेवक असतानाही प्रशासनाशी ‘मधुर’ संबंध ठेवून प्रभागातील कामे करून घेण्याची ‘हातोटी’ मांडवेंना साध्य झाल्याने सभोवतालच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांपेक्षाही मांडवेंनी अधिक कामे केल्याचे त्यांच्या प्रभागातील जनतेला माहिती आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घटकांनी मांडवेंना कोंडीत पकडण्याचा व त्यांचे जवळचे कार्यकर्ते फोडण्याचा एककलमी कार्यक्रम राबविण्यात चार वर्षे घालविली, त्यापेक्षा जनतेची कामे केली असती तर आज राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी चित्र वेगळे असते, असे जनतेकडूनच सांगितले जात आहे. मांडवेंच्या कार्यकर्त्यांची ‘सीसी’ राष्ट्रवादीने पळविण्याचे उद्योग सातत्याने केले असले तरी प्रभागातील जनाधाराची ‘ओसी’ मात्र मांडवेंकडेच असल्याने या प्रभागात शिवसेनेला पिछाडीवर टाकणे राष्ट्रवादी कॉंग्रेसला शक्य होणार नाही. रतन मांडवेंना दाबण्याचा सातत्याने प्रयास करताना नकळत रतन मांडवेंना मोठा करण्याचा प्रयासच राष्ट्रवादीकडून झाला असल्याचे जनतेकडून बोलले जात आहे.
नेरूळ सेक्टर १० परिसर हा एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. पालिका निवडणूकीत या प्रभागातून कट्टर शिवसैनिक असणारे दिलीप घोडेकर ५०० पेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. घोडेकरांचे कार्य व जनसंपर्कामुळे हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला झाला असून शिवसेनेखालोखाल या ठिकाणी मनसेचा प्रभाव आहे. रमेश शिंदेंनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने या ठिकाणच्या राष्ट्रवादीत नाराजीचे धुमारे धुमसू लागले आहेत. कॉंग्रेसचे नामदेव भगतांनी पराभूत झाल्यावरही येथील जनसंपर्क तोडला नाही. उलटपक्षी सातत्याने विविध उपक्रम राबविताना येथील लोकांशी व्यक्तिगत ‘टच’ कायम ठेवला. पालिका निवडणूकीत शिवसेना उमेदवाराला विजयी करण्यासाठी नामदेव भगतांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील कोणा मातब्बरांनी काम केले याची भगतांना इत्यंभूत माहिती असल्याने ते लोकसभा निवडणूकीत या उपकराची परतफेड करण्याची शक्यता अधिक आहे. राजेश भोरसारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याचा जनसंपर्कच राष्ट्रवादीच्या मतदानाला टेकू लावण्याची शक्यता आहे.
कुकशेत गाव आणि तेरणा शाळेसमोरील सिडकोच्या मोजक्या सोसायट्यांचा अपवाद वगळता बनलेल्या प्रभागाचे प्रतिनिधीत्व सुरज पाटील करत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा या प्रभागातील दबदबा केवळ सुरज पाटील या एकखांबी तंबूवरच अवलंबून आहे. राजकारणात ‘कुकशेतचा ढाण्या वाघ’ या नावानेच सुरज पाटील यांना ओळखले जाते. सातत्याने विकासकामे करून व जनतेची नस ओळखून परिश्रम करणार्या सुरज पाटीलांचा हा गड नेरूळ पश्चिममध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला आघाडी मिळवून देणारा हमखास एकमेव मतदारसंघ म्हणून ओळखला जात आहे. या मतदारसंघात कॉंग्रेसचाही प्रभाव असून येथे नामदेव भगत हेही काही प्रमाणात चलनी नाणे आहे. या प्रभागात शिवसेनेला मिळणारी मते बबनदादा पाटील या माणसाचा जनाधार स्पष्ट करणारी असल्याने ही लोकसभा निवडणूक बबनदादा पाटील यांच्याकरीताही महत्वाची आहे. बबनदादांना स्वत:च्या वॉर्डात कोण विचारत नाही अशी नाराजी सभोवतालच्या प्रभागातील शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी व्यक्त करत असल्याने कुकशेतमधून शिवसेनेला तारण्याचे शिवधनुष्य त्यांना उचलावे लागणार आहे.
नेरुळ सेक्टर १६,१८,२४ हा प्रभाग काही काळापासून शिवसेनेचा बालेकिल्ला ओळखला जात आहे. सतीश रामाणेसारखा मुरब्बी अवलिया चाणाक्ष या प्रभागाचे पालिकेत प्रतिनिधीत्व करत आहे. रामाणेंनी केलेली विकासकामे आणि शिवसेनेला मानणारा वर्ग ही शिवसेनेसाठी येथे जमेची बाजू आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांचा हा निवासी परिसर असून पालिकेच्या तिसर्या सभागृहात ते येथील नगरसेवक होते. काशिनाथ पवार पुन्हा शिवसेनेत आल्याने शिवसेनेची ताकद वाढली आहे. सुनिल हुंडारेसारखा विभागप्रमुख शिवसैनिकांमध्ये व स्थानिक परिसरात लोकप्रिय असल्याने हा प्रभाग शिवसेनेसाठी मताधिक्यांचा प्रभाग ठरणार आहे. गणेश भगत आणि डी.डी.कोलतेंसह काही घटक राष्ट्रवादीसाठी काम करत असले तरी या प्रभागावर शिवसेनेचा असलेला प्रभाव पुसुन काढणे कोणालाही शक्य झाले नाही. कॉंग्रेसचे वर्गिस डॅनियल येथे कार्यरत असलेे तरी नामदेव भगतांकडून ज्या सूचना येतील त्याच सूचनांचे वर्गिस व त्यांचे सहकारी पालन करण्याची दाट शक्यता आहे.
नेरूळ गावातून सलग तीन टर्म कॉंग्रेसच्या नगरसेविका इंदूमती भगत या विजयी झालेल्या आहेत. सासर आणि माहेर हे दोन्ही इंदूमती भगतांसाठी नेरूळ गावच आहे. इंदूमती भगतांची कामे, जनसंपर्क, स्वच्छ प्रतिमा, आध्यात्माची आवड आणि नामदेव भगत यांचा करिश्मा नेरूळ गावाचा जनाधार स्पष्ट करत आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख के.एन.म्हात्रे यांचा निवासी परिसर याच प्रभागात असला तरी त्यांचा फारसा दबदबा मतपेटीच्या माध्यमातून दिसून येत नाही. इंदूमती भगतांच्या प्रभागातील बांचोली मैदानाच्या बाबतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घटकांनी केेलेले राजकारण कॉंग्रेसी कार्यकर्त्यांसाठी संतापाची बाब असल्याने भगत आणि त्यांची कॉंग्रेस नेरूळ गावात मनापासून राष्ट्रवादीला सहकार्य करण्याची शक्यता कमीच आहे.
नेरूळ पश्चिमेला स्नेहा पालकर, नारायण पाटील, रतन नामदेव मांडवे, दिलीप घोडेकर, सुरज पाटील, सतीश रामाणे, इंदूमती भगत अशा सात नगरसेवकांच्या प्रभागात सुरज पाटीलांचा प्रभाग सोडल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी फारसे सुचिन्ह दिसून येत नाही.उपमहापौर अशोक गावडे यांच्या प्रभागाचा काही भाग नेरूळ पश्चिमेला मोडत असला तरी अधिकांश भाग सिवूडस परिक्षेत्रात येतो. महापौर सागर नाईकांनी नेरूळला गतकाही महिन्यात नेरूळला वरचेवर भेटी देवूनही फारसा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला झालेला नाही. उलटपक्षी महापौर केवळ रतन मांडवेंच्या प्रभागालाच भेट देण्यास येत असल्याचे आता उपहासाने बोलले जावू लागले आहे.
मराठी भाषिकांचा नेरूळ पश्चिमेला वावर जास्त आहे. संदीप नाईकांचा पामबीच मार्गावरील वाधवा टॉवरमधील भेटीगाठी विरोधकांना धडकी भरविणार्या आहेत. नेरूळ सेक्टर ४,६,१६,१०,१८, २४ या ठिकाणी मोठ्या संख्येने मित्र परिवार विखुरलेला असून या भागातील पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक भागातील अधिकांश भागातील घटकांचा संदीप नाईकांशी व्यक्तिगत ‘टच’ आहे. सारसोळे गावातील ग्रामस्थांची ना. गणेश नाईकांवर मोठी नाराजी असली तरी संदीप नाईकांशी त्यांचे बिगर राजकीय संबंध घनिष्ठ आहे. या भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ संदीप नाईकांचा करिश्माच तारण्याची शक्यता असल्याने त्यांना लवकरात लवकर सक्रिय करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.