मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई : एनसीपीचे खासदार संजीव नाईक हे ठाणे, नवी मुंबई, मीरा- भाईंदर या देशातल्या सर्वांत जास्त लोकसंख्या असणार्या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. संजीव नाईक यांचा जन्म १५ एप्रिल १९७२ साली सध्याच्या नवी मुंबईमध्ये झाला होता. संजीव नाईक यांनी आपले वडिल राज्याचे विद्यमान शुल्क व उत्पादन मंत्री गणेश नाईक यांच्याकडून राजकारणाचं
बाळकडू घेतलं. वयाच्या २३ व्या वर्षी ते नवी मुंबईचे महापौर झाले. त्यांनंतर लागोपाठ २००० आणि २००३ अशा दोन्ही वर्षी नवी मुंबईचे महापौर पद भूषवून हॅट्ट्रीक साधली.
महापौर पदाच्या आपल्या कारकीर्दीत संजीव नाईक यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन नवी मुंबईचा विकास वेगाने वाढवला. २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये संजीव नाईक विजयी झाले आणि ठाणे मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी संसंदेत काम करू लागले. आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत संजीव नाईक यांनी नवी मुंबईत विकासकामांचा धडाकाच लावला. ‘वन टाईम प्लॅनिंग’ संकल्पनेद्वारे नवी मुंबईचा कायापालट केला. उद्योग, वाहतुक , पायभूत सुविधा, नागरीकरण, पर्यावरण, कला, क्रीडा, आदी सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी विकासकामे केली आहेत.
लोकसभेत खासदार म्हणून संजीव नाईक यांनी मतदारसंघाच्या विकासकामांबद्दल ७४६ प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच ७५ वेळा त्यांनी विविध चर्चांमध्ये सहभाग घेतला आहे. खासदार संजीव नाईक यांची संसदेतील उपस्थिती ९४ टक्के इतकी लक्षणीय आहे. खासदार नाईक यांनी आपल्या कारकीर्दीत संसदेत महत्त्वपूर्ण प्रश्न मांडले आहेत.