नवी मुंबई : कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी ऍड. राहुल नार्वेकर हे मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वात प्रभावी उमेदवार आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ऍड. नार्वेकर यांच्या प्रचारार्थ कामोठे येथे शुक्रवारी (दि. ११) कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि पीआरपी, आरपीआय आघाडीची भव्य प्रचारसभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
कामोठे येथील नालंदा बुध्दविहार जवळील भव्य मैदानात झालेल्या या सभेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मावळचे उमेदवार ऍड. राहुल नार्वेकर, आमदार प्रशांत ठाकूर, खासदार ऍड. मजीद मेमन, खासदार डि. पी. त्रिपाठी, सिडकोचे चेअरमन प्रमोद हिंदुराव, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस महादेव शेलार, आझमभाई पानसरे, रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आर.सी.घरत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंतराव ओसवाल, माजी आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार किरण पावसकर, आमदार नरेंद्र पाटील, मुंबई महानगर लोखंड व पोलाद समितीचे अध्यक्ष गुलाबराव जगताप, कामगार नेते शाम म्हात्रे, रायगड जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष जी. आर. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या प्रमुख भाषणात श्री. पवार यांनी कॉंग्रेस आघाडी सरकारने देशाचा आणि राज्याचा केलेला विकास, लोकशाही मुल्यांची केलेली जपणूक सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय स्थिर आणि विकासाभिमुख सरकार आदींचा उहापोह केला. केंेद्रातील कॉंग्रेस आघाडी सरकारने अन्नसुरक्षा कायदा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात असा कायदा नाही. या कायद्यामुळे कुणाचीही उपासमार होणार नाही, अशी काळजी केंद्र सरकारने घेतली आहे, असे सांगून श्री. पवार पुढे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारकडून विकासाचे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. गरजूंना सबसीडी देण्याबरोबरच उद्योग, दळणवळण, निवासाचा प्रश्न, विकासाचे विविध कार्यक्रम केंद्र आणि राज्य सरकारने हाती घेतले आहेत. या उपक्रमांना गती देण्यासाठी केंद्रात कॉंग्रेस आघाडीचे सरकार असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रात कॉंग्रेस आघाडीची सत्ता हाती आल्यानंतर शेती क्षेत्रात आपण लक्षणीय प्रगती केली आहे. देशाची अन्नाची गरज भागवून, आता आपण अन्नधान्य निर्यात करीत आहोत ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचेही ते म्हणाले.
शेतकरी कामगार पक्षाने मावळ, रायगडात उमेदवार उभा करून बळीचा बकरा करण्याचे काम केले आहे. या उमेदवारांची आणि शेकापचीही कुवत नाही. त्या तुलनेत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने उभे केलेले ऍड. राहुल नार्वेकर हे या मतदारसंघातील सर्वाधिक सक्षम, सुक्षिशित, सुविद्य आणि तरुण उमेदवार आहेत. त्यांचा विक्रमी मतांनी विजय निश्चित असल्याचेही शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले.
जर्मनीत हिटलर ने लोकशाही मार्गाने सत्ता हस्तगत केली. त्यानंतर हुकूमशाही लादून देशाचा नाश केला. त्याच प्रमाणे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी राज्य करीत आहेत. मोदी यांच्या आक्रस्तळेपणामुळे देशातील सर्वसामान्य आणि अल्पसंख्याक भयभीत झाले आहेत. भयभीत समाज प्रगती करू शकत नाही, त्यासाठी मोदी यांना रोखण्याची गरज आहे. केंद्रातील सत्ता हस्तगत करण्यासाठी मोदी यांनी केंद्रीकरण सुरू केले आहे. त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अंगिकारलेल्या लोकशाही मुल्यांना हानी होत आहे, असेही पवार आपल्या भाषणात म्हणाले.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे तरुण तडङ्गदार आणि अभ्यासू उमेदवार ऍड. राहुल नार्वेकर हे अन्य सर्व उमेदवारांच्या तुलनेत सरस असल्याची ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. ऍड. नार्वेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात मुख्यमंत्र्यांनी केंेद्र आणि राज्य सरकारच्या विकासकामांचा आढावा घेत विरोधकांवर हल्लाबोलही केला.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी ज्या पध्दतीने कारभार करीत आहेत तो लोकशाही संकेताला धरून नाही. त्यांनी राज्य कारभार करताना लोकशाही मुल्यांची पायमल्ली केली आहे. तेथील विधी मंडळातील कामकाज आणि आपल्याकडील यात ङ्गार मोठा ङ्गरक आहे. पंतप्रधान होण्यासाठी मोदी यांनी आततायी पणा केला असून, सुरुवातीला ते भाजपचे प्रचारप्रमुख झाले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करून घेतले, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अमेरिकेत ज्या प्रमाणे अध्यक्षीय पध्दत आहे आणि तेथील निवडणुकीचे रंग भारतात निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. पंतप्रधान पदाची निवड खासदारांकडून केली जाते. मात्र लोकशाही मुल्यांची पायमल्ली करीत मोदी यांना भाजपने निवडणूक यादीत पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करण्याची घोड चूक केली असल्याचे ते म्हणाले.
गुजरातपेक्षा महाराष्ट्र विकासात अनेक पटींनी अग्रेसर आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या १२ वर्षांत गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या विकासाची तुलना केल्यास महाराष्ट्रात गुजरातपेक्षा १८ पट परकीय गुंतवणूक अधिक झाली आहे, बालमृत्युचे प्रमाण घटले आहे. आयटी क्षेत्रात महाराष्ट्रात ५० हजार कोटींची गुतवणूक झाली आहे, तर गुजरातमध्ये अवघ्या बाराशे कोटीची गुंतवणूक झाली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गुजरात मॉडेल हा केवळ दिंडोरा पिटण्यात येत आहे. माझे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना खुले आव्हान आहे, महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न, सकल घरेलू उत्पन्न, आद्योगिक विकास यात महाराष्ट्र गुजरातपेक्षा ङ्गार पुढे आहे. दंगलीच्या कालावधीत एका ठराविक समुदायाला लक्ष करण्यात येत असताना केवळ बघ्याची भुमिका घेणारा मुख्यमंत्री देशाचा प्रधानमंत्री होऊ शकत नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.
मावळ लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे ऍड. राहुल नार्वेकर यांच्या प्रचार जोमाने सुरू आहे. दोन्ही कॉंग्रेस एकदिलाने, एकजुटीने प्रचारात उतरल्याने ऍड. नार्वेकर यांचा विजय निश्चित असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले. या भागात विविध समस्या भेडसावत आहेत. त्या समस्यांना योग्य न्याय देण्याचे काम नार्वेकर करतील, असा आम्हाला विश्वास आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने विविध विकासकामे हाती घेतली असल्याने या भागाचा विकास झपाट्याने होत आहे. विविध प्रकल्प येत आहेत, त्यामुळे समस्याही वाढत आहे. या समस्यां प्रभावीपणे मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी नार्वेकर पाठपुरावा करतील, यासाठी त्यांना निवडून देणे गरजेचे असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने सर्वात तरुण सुक्षिशित उमेदवार म्हणून मला संधी दिली आहे. मी येथील मतदारांना योग्य तो न्याय देईन, असे आश्वासन मावळचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार ऍड. राहुल नार्वेकर यांनी दिले. कॉंग्रेस आघाडीने देशात सर्वाधित तरुण आणि सुक्षिशित उमेदवारांना संधी दिली आहे. सुक्षिशितांना राजकारणात आणले आहे. मी रायगडचा सुपूत्र असून, घाटावरचा जावई आहे. त्यामुळे दोन्ही भागांना पूर्णपणे न्याय देईन, अशी ग्वाही देत नार्वेकर म्हणाले की, या भागात अनेक समस्या आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. सिडको, जेएनपीटीशी संबंधित प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन नार्वेकर यांनी आपल्या भाषणात दिले.
ऍड. राहुल नार्वेकर मावळचे उमेदवार नसून, ‘उम्मीद’ आहे, असा विश्वास खासदार डी. पी. त्रिपाटी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. मावळला सुक्षिशित आणि अभ्यासू उमेदवार मिळाला आहे. त्यांचा विजय निश्चित असल्याचे सांगून, त्रिपाटी पुढे म्हणाले की, गुजरातमध्ये लोकशाही अस्तित्वात नसून, या निवडणुकीत मोदी नावाची लहर नसून केवळ जहर आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रचारसभेच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी नालंदा बौध्दविहारात अभिवादन केले.
खा. ऍड. माजीद मेनन, ज्येष्ठ कामगार नेते श्याम म्हात्रे, आमदार नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी मागसवर्गीय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष उत्तम गायकवाड यांचीही भाषणे झाली. या सभेला कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रचंड उपस्थिती होती. सुत्रसंचालन टि.के.माळी व मिलिंद पाटील यांनी केले.