खा. संजीव नाईक यांचा आरोप
मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई : इंटरनॅशनल तामिळ युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलॅन्ड, यूएसए यांनी मला बहाल केलेली ‘डॉक्टरेट’ ही पदवी मानद आहे. नवी मुंबईचा प्रथम महापौर असताना ‘प्रिव्हेंटीव्ह हेल्थ ऍण्ड बेटर एन्व्हायरन्मेंट’ या क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल ही मानद पदवी बहाल करण्यात आली आहे. असा खुलासा ठाणे लोकसभा मतदारसंघातील कॉंगे्रस-नॅशनॅलिस्ट कॉंगे्रस-पीआरपी आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांनी केला आहे. विरोधकांकडे काहीच मुददे उरले नसल्याने या डॉक्टरेट पदवीबद्दल राजकीय हेतूने गैरसमज पसरविले जात आहेत, असा आरोप खा. नाईक यांनी केला आहे.
ही मानद पदवी खा. नाईक यांना बहाल करताना पाणी टंचाई, ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण, अनारोग्य इत्यादी विषयात केलेल्या कामगिरीची दखल घेण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेचा प्रथम महापौर असताना त्यावेळी पोलिओच्या उच्चाटनासाठी पुढाकार घेवून तत्कालिन पंतप्रधान आणि तत्कालिन केंद्रीय आरोग्य सचिवांना याबाबत नाईक यांनी उपयुक्त सुचना केल्या होत्या. त्यानंतर भारतभर पोलिओ लसीकरणाची मोहिम तीव्र करण्यात आली होती. याचा सकारात्मक परिणाम असा झाला की पोलिओच्या रुग्णांमध्ये देशभरात ९७ टक्के घट झाली होती. शहरात पोलिओचा प्रसार मुख्यत्वे बाहेरुन स्थलांतरीत होणार्यांकडून होत असतो याकडे केंद्र आणि राज्य सरकारांनी गंभीरपणे लक्ष देण्यास सुरुवात केली होती. नवी मुंबईत रासायनिक कंपन्यांतून रसायनमिश्रीत पाणी खाडीत सोडण्यात येत होते. त्यामुळे खाडयांमधील प्रदुषण वाढले होते. नवी मुंबईतील नेरुळ, वाशी आणि ऐरोली येथे जागतिक सीटेक तंत्रज्ञानाची एसटीपी ही सांडपाणी शुध्दीकरण केंद्रे महापौर असताना खा. नाईक यांनी सुरु केली. या केंद्रांमधून पिण्याच्या पाण्याइतके शुध्द पाणी तयार होते. या सांडपाणी शुध्दीकरण केंद्रांमुळे खाडयांचे प्रदुषण कमी झाले.
भविष्यातील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता नवी मुंबईचे महापौरपद भुषवित असताना दुरदृष्टीने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार २००२साली नवी मुंबई महापालिकेने जीवन प्राधिकरणाचे मोरबे धरण विकत घेतले होते. त्यावेळी महापौर म्हणून घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे आज जगभरात पाणीटंचाई जाणवत असताना नवी मुंबई मात्र पाणी पुरवठयाबाबत स्वयंपूर्ण झाली आहे. डॉक्टर या पदवीचा आणि माझ्या शिक्षणाचा काहीएक संबंध नाही. महाराष्ट्रात आणि देशात अनेक मान्यवरांना ज्यांचे शिक्षण कमी असताना देखील विविध विद्यापिठांकडून त्यांचे सामाजिक कार्यातील मोलाचे योगदान पाहून अशाप्रकारच्या मानद डॉक्टरेट बहाल करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारची डॉक्टरेट ही उपाधी आपल्या नावापुढे लावावी की लावू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अनेकवेळा आपण जरी अशी पदवी नावापुढे लावली नाही तरी जनता आपल्यावरील प्रेमापोटी अशी पदवी आपल्या नावापुढे लावत असते. असा कुठेही नियम नाही की अशी बहाल केलेली मानद पदवी नावापुढे लावू नये, असे नाईक यांनी सांगितले.
इंटरनॅशनल तामिळ युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलॅन्ड, यूएसए नावाचे विद्यपिठ इंटरनेटरवर शोधूनही सापडत नाही असा अपप्रचार केला जातो आहे. मात्र गुगलवर या विद्यापिठाच्या नावाने शोध घेतला तर पाहिली लिंक इंटरनॅशनल तामिळ युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलॅन्ड, यूएसए या विद्यापिठाचीच येते. यंदाची लोकसभा निवडणूक ही माझी लोकसभेची तिसरी निवडणूक आहे. प्रत्येकवेळी निवडणूक अर्ज भरताना मी त्यासोबतच्या प्रतिज्ञापत्रकात माझ्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख करीत असतो. त्यामुळे माझी शैक्षणिक पात्रता बारावी आहे. हा जुना विषय झाला आहे. तो नव्याने का सांगण्यात आला आहे हे कळत नाही. महाराष्ट्रातील लोकसभेच्या विविध पक्षीय उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विविध स्तरातील शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख दिसून येतो, असे असताना माझ्या संदर्भातील शैक्षणिक पात्रतेचा नव्याने उल्लेख करण्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप खा. नाईक यांनी केला आहे.