मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई :- ठाणे लोकसभा मतदारसंघात आपली लढत ही डॉक्टर मुन्नाभाई यांच्याशी आहे. बारावी नापास असून ते डॉक्टर झाले आहेत. जर इतके हुशार असतील तर सरकारने त्यांचा सत्कार करावा. जर पदवी बोगस असेल तर या मुन्नाभाईंनी जनतेची दिशाभुल न करता राजीनामा देऊन चालते व्हावे, असा घणाघात युवा सेनाप्रमुख अदित्य ठाकरे यांनी शनिवारी येथे केला.
महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी अदित्य ठाकरे यांचा आज नवी मुंबईत रोड शो झाला. सुमारे पाच हजार दुचाकींच्या समवेत निघालेल्या या तुफान रॅलीमुळे नवी मुंबईत भगवा झंझावात निर्माण झाला. जय भवानी जय शिवाजी, अशा गगनभेदी घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला.
अदित्य ठाकरे यांच्या रोड शोला शनिवारी सांयकाळी दिघा येथून सुरूवात झाली. ईश्वरनगरमधून हा रोड शो चिंचपाडा येथे बाहेर पडला. प्रत्येक चौकात रोड शोमध्ये ४०० ते ५०० मोटारसायकली सहभागी होत होत्या. त्यामुळे रोड शो तुर्भे नाक्यावर पोहचेपर्यंत मोटारसायकलींची संख्या पाच हजारापर्यंत गेली आणि रोड शोचे रुपांतर भगव्या सागरात झाले. हा भगवा झंझावात सीबीडी बेलापूर, सीवूड मार्गे नेरुळ येथे पोहचल्यानंतर सारसोळे बस डेपो चौकात अदित्य ठाकरे यांनी चौक सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी नवी मुंबईतील सत्ताधार्यांवर सडकून टिका केली. आज निघालेली मोठी रॅली ही प्रचार रॅली नसून विजयाची रॅली आहे. आपले उमेदवार राजन विचारे यांचा सामना नॅशनल चिटर पार्टीच्या डॉक्टर मुन्नाभाई यांच्याशी आहे. मुन्नाभाई एमबीबीएस हे जनतेची सेवा करीत होते. मात्र या मुन्नाभाईंनी फक्त स्वत:चे घर भरले आहे. त्यामुळे यांना आता घरी बसवा. ही लढाई फक्त मुन्नाभाईंपुरती मर्यादित नाही तर देशाच्या अस्तित्वाची आहे. आज महागाई, भ्रष्टाचार, डोनेशन, गरीबी, अशा समस्या आ वासून उभा ठाकल्या असल्या तरी त्यांच्यावर उपाय म्हणून उपमुख्यमंत्री करंगळी वर करतात. अशा दळभद्री सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार राहिला नाही, अशी टिकाही अदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख विजय चौगुले, भाजपचे जिल्हाध्यक्ष सी.व्ही. रेड्डी, आरपीआयचे महेश खरे, संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, के. एन. म्हात्रे, भोलानाथ तुरे, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, शहरप्रमुख सुरेश म्हात्रे, विजय माने, जिल्हा युवाधिकारी अभिमन्यु कोळी, शिवसेनेच्या प्रचार अभियानातील मुलुखमैदानी तोफ सुकुमार किल्लेदार, नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक व स्थायी समिती सदस्य रतन नामदेव मांडवे, दिलीप घोडेकर, उपशहरप्रमुख गणपत शेलार आदी उपस्थित होते.