दिपक देशमुख
नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे भवितव्य ठरविण्यासाठी मतदारराजाकडे आता अवघ्या काही तासाचाच कालावधी शिल्लक राहीला आहे. मंगळवार, दि. २२ एप्रिलला सांयकाळी ५ वाजता प्रचाराचा धुराळा कायमचाच थंड होईल आणि खर्या अर्थांने निर्णायक थरार सुरू होणार अळीमिळी, गुपचिळी प्रचाराचाच! मंगळवारची रात्र आणि बुधवारचा दिवस आणि रात्र सर्वच पक्षांना जागी राहूनच काढावी लागणार आहे. कारण मतदारांना आमिष दाखविताना विरोधी घटकांकडून गर्व्हनरच्या सहीच्या कागदांचे वाटप झाल, तर आपल्या मेहनतीवर पाणी फिरण्याची दाट शक्यता असल्याने कोणीही बेसावध राहण्याचे धाडस दाखविणार नाही.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागून राहीले आहे. शिवसेना आणि एनसीपीसाठी ही लढत राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची झालेली आहे. ठाण्याचा गढ गमाविल्याचे शल्य खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीच अनेकदा जाहीरपणे बोलून दाखविल्याने ही जागा जिंकून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्याचा निर्धार शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना, एनसीपी, मनसेच्या महत्वपूर्ण मातब्बर पदाधिकार्यांना, कार्यकर्त्यांना व नगरसेवकांना जाळ्यात ओढण्याचे प्रयासदेखील पडद्याआडच्या घडामोडीदरम्यान झाले.
ठाण्यातील प्रचाराची सूत्रे सांभाळण्यास खुद्द विचारे परिवार, जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक आणि ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी-शिवसैनिक सक्षम असल्याने शिवसेना उमेदवार आमदार राजन विचारेंनी सर्वाधिक वेळ नवी मुंबईतच घालविला. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आंबेडकरी जनतेच्या गळ्यातील ताईत असणारे रामदास आठवले, शेतकरी नेते व ऊस आंदोलनातील लढवय्ये राजू शेट्टी, फेसबुकच्या माध्यमातून व ग्रामीण जनसंपर्कातून बारामतीच्या अभेद्य गडाला खिंडार पाडण्याची महत्वाकांक्षा बाळगणारे आमदार शिवतरे, शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनाधार असणारे व ग्रामीण भागात गाडा संस्कृती जोपासण्यासाठी जिवाचे रान करणारे शिवाजीराव आढळरावपाटील यांच्यासह अनेक रथी-महारथी शिवसेना-भाजपा-आरपीआय व अन्य पक्षांचा समावेश असणार्या माहयुतीचे उमेदवार आमदार राजन विचारेंच्या प्रचारादरम्यान सहभागी झाले. आमदार राजन विचारेंदेखील सकाळी ६ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यत कधीही शिवसेनेसाठी उपलब्ध झाल्याने प्रभागाप्रभागातील शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह संचारला होता. शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंनी प्रारंभापासूनच नवी मुंबईची सूत्रे सक्षमपणे सांभाळली. सुरूवातीपासून प्रचाराची रूपरेषा, सभा, बैठका यावर प्रारंभापासून सांभाळली.
नवी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त विजय नाहटा यांचा प्रचारातील सहभाग शिवसेनेसाठी उपयुक्त ठरणार आहे. जैन समाज प्रचंड प्रमाणात नाहटाच्या नेतृत्वशैलीकडे आकर्षित होवून शिवसेनेच्या छावणीकडे जावू लागल्याने ही बाब एनसीपीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. त्यातच शिवसेनेच्या नगरसेवकांनी व शाखाप्रमुख आणि शिवसैनिकांनी पालिकेच्या निवडणूकीच्या धर्तीवर आपल्या कार्यक्षेत्रात घरटी प्रचारावर दिलेला भर हा शिवसेनेच्या मतपेटीसाठी उपयुक्तच ठरण्याची शक्यता आहे. यंदा शिवसेनेने चौकसभांवरही भर दिला. चौकसभेत सुकुमार किल्लेदारनामक वादळ एनसीपीच्या अनेक हल्ल्यांना निरूत्तर करत होते. एनसीपीच्या आरोपांची वर्तमानपत्रांतील बातम्यांचेच पुरावे देत चौकसभेत जनतेच्यासमोरच किल्लेदारांनी सातत्याने केलेली चिरफाड बेलापूर मतदारसंघात शिवसेनेसाठी फायदेशीर ठरली. नेरूळ पश्चिमेला शिवसेना नगरसेवक रतन नामदेव मांडवेंच्या प्रभागात मंजूर होवून वर्क ऑर्डर निघालेला , परंतु राजकीय कारणास्तव जाणिवपूर्वक रखडवलेला हायमस्ट पश्चिम महाराष्ट्रातील नेरूळ पश्चिममधील जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण करणारा ठरला. रतन मांडवेंना जुईनगर आणि नेरूळ पश्चिम परिसरात मानणारा मोठा वर्ग असल्याने मांडवेंच्या प्रभागातील हायमस्ट रखडविण्यात कोणाचा हात आहे, कोणी राजकीय प्रतिष्ठेचा विषय केला, याची माहिती मांडवे समर्थकांनी घरटी पोहोचविल्याने व शिवसेनेच्या चौकसभांमध्ये रखडलेल्या हायमस्टच्या राजकारणाची चिरफाड झाल्याने नेरूळ पश्चिममधील जनतेमध्ये संतापाची बाब बनला. मोदी पॅटर्नमुळे गुजराथी, राजस्थानी, पंजाबी आणि हिंदी भाषिकांमध्ये शिवसेना उमेदवार राजन विचारेंबाबत विशेष ममत्व निर्माण झाल्याचे प्रचारादरम्यान पहावयास मिळाले. वैभव नाईकांचा शिवसेना प्रवेशही राजन विचारेंच्या दिल्ली वाटेसाठी आशिर्वादच लाभल्याचे शिवसैनिकांमध्ये बोलले जात आहे.
ठाण्यातील आमदाराच्या रूपाने तगडा उमेदवार, ठाणेकर उमेदवार, मोदी लाट, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंचे अहोरात्र परिश्रम आणि एकहाती प्रचाराची धुरा नियोजन, वैभव नाईकांचा शिवसेना छावणीतील प्रवेश, माजी महापालिका आयुक्त विजय नाहटांचा सहभाग, चौकसभांमध्ये सुकुमार किल्लेदारांनी चढविलेला तुफानी हल्ला, रतन मांडवेंचा रखडविलेला हायमस्ट, नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकार्यांनी-शिवसैनिकांनी प्रचारात दिलेले योगदान पाहिल्यावर आमदार राजन विचारेंचे खासदार राजन विचारेंमध्ये झालेले परिवर्तन हमखासपणे १६ मेला पहावयास मिळणार असल्याचे शिवसैनिकांकडून छातीठोकपणे सांगितले जात आहे.
शिवसेनेकडे नवी मुंबईत स्थानिक पातळीवर रथी-महारथी सक्रिय झालेले असताना एनसीपीचा सर्व खेळ ना. गणेश नाईक या एकखांबी नेतृत्वावरच अवंबून राहीला. आमदार संदीप नाईकांनी ऐरोली सांभाळताना बेलापूर मतदारसंघातही तसेच ठाण्यातही आपल्या संपर्क अभियानाचा करिश्मा दाखविला. संजीव नाईकांनीदेखील ठाण्यात आणि भाईंदरमध्येच अधिक मुक्काम ठोकल्याने प्रचारासाठी ते नवी मुंबईत अधिक काळ उपलब्ध झाले नाहीत. एनसीपीमध्ये अनेकजण बालाजी, व्हाईट हाऊसला चकरा मारत असले तरी त्यांनी आपल्या प्रभागात किती ‘दिवा’ लावला हे नामदार, आमदारांना १६ मेला मतपेटीतच पुराव्यासह दिसून येणार असल्याने ऑक्टोबरसाठीच्या निवडणूकाकरीता नामदार, आमदारांना संघटनात्मक पातळीवर मोठे खांदेपालट करावे लागणार असून दुसर्या फळीतील नेतृत्वाला, पदाधिकार्यांना, कार्यकर्त्यांना पुढे घ्यावे लागणार आहे. आमदार राजन विचारेंच्या निवडणूक अर्जातील माहितीचा आधार घेत एनसीपीच्या घटकांनी, फेसबुकवरील चाहत्यांनी शिवसेना उमेदवार गुन्हेगार अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयास एनसीपीवरच शेकविण्याचा शिवसेनेने जोरदार प्रयास केला. अतिक्रमण घोटाळ्यातील आरोपी नगरसेवक, मुख्तार अन्सारी, कुकशेतच्या क्रिकेट पारितोषिक वितरणातील हाणामारी यासह एनसीपीच्या काही नगरसेवकांना पोलिस ठाण्याच्या चढाव्या लागलेल्या पायर्या यासह गतविधानसभा निवडणूकीत ना. नाईकांवर खालच्या पातळीवर टीका करणार्या रमेश शिंदेचा एनसीपीप्रवेश, एनसीपीचे सेवादल नवी मुंबई अध्यक्ष बुगदे यांना (१२/१२/.२०१२लाच) मारहाण करणार्याला एनसीपीत दिलेला प्रवेश या सर्व घडामोडी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मतदारांवर प्रभाव निर्माण करण्यात शिवसेनेचे स्थानिक घटक यशस्वी ठरले.
आमदार राजन विचारेंसाठी उध्दव ठाकरे, रश्मीताई ठाकरे, आदित्य ठाकरे नवी मुंबईत सक्रिय झाले असताना एनसीपीच्या संजीव नाईकांसाठी ना. गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, संकल्प नाईक प्रचाराच्या धुराळ्यात सहभागी झाले होते. त्यासोबत जयवंत सुतार, ज्ञानेश्वर नाईक, विनायक म्हात्रेदेखील अळीमिळी गुपचिळी बैठका करत नाराजांची समजूत काढत होते. आमदार संदीप नाईकांच्या संपर्क अभियानामुळे भेटीगाठीमुळे शिवसेनेची काही प्रमाणात हवा निघाली.
ना. नाईकांनी गतकाही वर्षात ज्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना ताकद दिली, त्याच घटकांनी एनसीपीला पर्यायाने उमेदवाराचा अडचणीत आणण्याचा नकळत उद्योग केल्याचे १६ मेला मतमोजणीलाच स्पष्ट होणार आहे. ज्यांना महत्वाची पदे दिली, ताकद दिली, त्यांच्याच प्रभागात काय घडणार याची काही प्रमाणात कल्पना आताच येवू लागली आहे. मोदी-नाहटा, वैभव-किल्लेदार या चौकडी फॅक्टरचा काही प्रभागांमध्ये एनसीपीला फटका बसणार आहे. ना. नाईकांचा करिश्मा आणि संदीप नाईकांचा व्यक्तिगत जनसंपर्कच एनसीपीच्या मतदानात महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. नगरसेवकांनी कितपत गांभीर्याने काम केले यासाठी बोनकोडेकरांना १६ मेचीच प्रतिक्षा करावी लागणार आहे. एनसीपीच्या नगरसेवकांनी आपला बडेजाव सांभाळताना शेजारच्या नगरसेवकांना त्रास देत आपली प्रतिष्ठा वाढविण्याचा केलेला प्रयासही एनसीपीसाठी तापदायक ठरल्याचे मतपेटीतूनच स्पष्ट होणार आहे.
संशयकल्लोळ हा एनसीपी आणि शिवसेनेसाठी त्रासदायक ठरणार आहे. शिवसेनेच्या काही मातब्बर घटकांनी आपल्या प्रभागात परिश्रम न करता उमेदवाराच्या सभोवताली फिरूनच फोटोसेशन करण्यात समाधान मानल्याने त्यांच्या प्रभागातील मतदानावर शिवसेनेचे बारीक लक्ष राहणार आहे. एनसीपीच्या काही नगरसेवकांचा गट देखल्या देवा दंडवत या उक्तीप्रमाणे बोनकोडेकरच आल्यावर प्रचारात दिसायचे आणि नंतर मात्र न्यूट्रल राहायचे असे वागत असल्याचे उघडपणे पहावयास मिळाले.
कॉंग्रेसची उदासिनता ही बाब कितपत शिवसेनेला फायदेशीर आणि एनसीपीला त्रासदायक ठरली, याचेही उत्तर १६ मेलाच मिळणार आहे. आम आदमी पार्टीलादेखील प्रचार अभियानाच्या अखेरच्या टप्प्यात नवी मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. उत्तर भारतीय हिंदी भाषिक आणि मुस्लिम समाजाचा आपच्या प्रचारातील वाढता सहभाग शिवसेनेसह एनसीपीचे निश्चितच ठोके वाढविणार आहे.
गतलोकसभा निवडणूकीत १ लाख ३४ हजार मतदान घेवून दबदबा निर्माण करणारी मनसे यंदाच्या लोकसभा निवडणूक प्रचारात फारशी गांभीर्याने उतरली नसल्याचे पहावयास मिळाले. मनसे चौथ्या क्रमाकांवर फेकली जाणार असल्याचे खुद्द पडद्याआडून मनसैनिकांकडून व मनसेच्या पदाधिकार्यांकडून बोलले जात आहे. राज ठाकरेंच्या घणसोलीच्या सभेचाही ऑक्सिजन मनसेच्या प्रचारामध्ये उत्साह निर्माण करू शकला नाही. आंदोलनातील मनसे प्रचारात कोठेही आढळली नाही. मनसेच्या स्थानिक नेतृत्वाकडून व शहर कार्यकारिणीतील पदाधिकार्यांकडून १ ते सव्वा लाखाचा दावा सुरूवातीच्या काळात करण्यात आला असला तरी संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघात पानसेंना तितकेही मतदान होईल की नाही याबाबत खुद्द मनसैनिकच सांशक आहेत.
एनसीपी आणि शिवसेनेसाठी ही लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची आहे. मोदी लाट, नाहटा-वैभव-किल्लेदार-ठाणेकर उमेदवार, आपची मुसंडी जोरदार, मनसेचा थंडावा ही सर्व परिस्थिती एनसीपीकरीता प्रतिकूल असली तरी ना. नाईक यातूनही करिश्मा दाखवतील असा भोळाभाबडा अंदाज आजही सच्च्या नाईक समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मतदान आता अवघ्या काही तासावर आले असल्याने अळीमिळी- गुपचिळीच्या प्रचारातील घडामोडीही मतदानावर प्रभाव पाडण्याची शक्यता असल्याने सर्वानीच तुर्तास जागते रहो!