लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका अखेरीला महाराष्ट्रात पार पडल्या. निवडणूकीतील प्रचारामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले, मुद्दे खोडून काढण्यात आले. नव्याने चिखलफेक करण्यात आली. अनेकांची प्रतिमा मलिन झाली. मतदान झाले. थकलेले उमेदवार विश्रांतीसाठी विसाव्याला निघून गेले. पण कार्यकर्त्यांचे काय, कारण कार्यकर्ता हा कधी थकत नाही, विश्रांती घेत नाही, म्हणूनच तो शेवटपर्यत कार्यकर्ताच राहतो, नेता बनत नाही. निवडणूका या कार्यकर्त्याच्या पाठबळावरच लढल्या जातात. निवडणूक ग्रासरूटसाठी कार्यकर्त्यांसाठीच प्रतिष्ठेची असते. नेतेमंडळींपेक्षा प्रत्येक निवडणूकीत कार्यकर्त्यांचाच बीपी वाढत असतो. आता निवडणूका संंपल्या, १६ मे मतमोजणीची प्रतिक्षा आहे. तोपर्यत कार्यकर्त्यांचा एककलमी कार्यक्रम ठरलाय, तो फक्त चावडी गप्पांचाच.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील यंदाची राज्यात लक्षवेधी ठरली आहे. एनसीपी आणि शिवसेनेत ही निवडणूक अटीतटीची आणि प्रतिष्ठेची ठरल्याने कार्यकर्तेदेखील जीवाचे रान करत होते. एनसीपीचे उमेदवार संजीव नाईक हे ठाण्यात तर शिवसेनेचे राजन विचारे हे नवी मुंबईत तळठोकून होते. शिवसेना आणि एनसीपी यांनी ही निवडणूक ग्रामपंचायतीप्रमाणे गांभीर्याने लढविली.
मनसे हा गतनिवडणूकीत १ लाख ३४ हजार मते मिळविणारा एक मातब्बर पक्ष. पण यंदा मनसेचा नावलौकीक प्रचार अभियानात फारसा पहावयास मिळालाच नाही. घणसोलीतील सभा वगळता नवी मुंबईमध्ये प्रचार अभियानात मनसेचा सहभाग फारसा गांभीर्याने पहावयास मिळालाच नाही. उलटपक्षी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार विनोद गंगवाल यांनी प्रचार अभियानात काही प्रमाणात धुराळा उडविला. आम आदमी पक्षानेदेखील नवी मुंबईत चांगल्या प्रमाणात ताकद लावली.
निवडणूकीपुरता विचार करावयाचा झाल्यास शिवसेना आणि एनसीपीनेच ही निवडणूक व्यापक प्रमाणावर लढविली, त्याखालोखाल आम आदमी पक्षाचा क्रमांक लागेल. ही निवडणूक शिवसेना आणि एनसीपीसाठी खरोखरीच प्रतिष्ठेची झाली होती. यंदाच्या निवडणूकीत नवी मुंबईत शिवसेना कधी नव्हे ती एकत्र, एकसंध आणि एकजीव असलेली पहावयास मिळाली. जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंच्या एकहाती नियोजनाखाली नवी मुंबई शिवसेनेने परिश्रम केले. विजय नाहटा यांची धोरणे आणि कल्पकता प्रचारात उपयुक्त ठरले. वैभव नाईकांमुळे प्रचार अभियानात युवा वर्गामध्ये खर्या अर्थाने जोश आणि उत्साह निर्माण झाला. ऍड. मनोहर गायखे, सुरेश म्हात्रे, विजय माने, रंजनाताई शिंत्रे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकार्यांनी जीवाचे रान केले. रतन मांडवेसारख्या शिवसेना नगरसेवकांनी आपल्याच प्रभागात ठाण मांडून एनसीपीची स्थानिक पातळीवर कोंडी करण्यासाठी शर्तीचे प्रयास केले. शिवसेनेकडून झालेल्या चौकसभा ही यंदाच्या निवडणूकीत शिवसेनेसाठी प्रचारादरम्यान मतदारांशी सुसंवाद करण्याकरीता नवी मुंबईत जमेची बाजू ठरली. विजय मानेंसारखे विजय चौगुलेंच्या मुशीत आक्रमकरित्या तयार झालेले लढवय्ये प्रचार अभियानात कधी पडद्यावर तर कधी पडद्याआडून ‘कमी तिथे आम्ही’ ही भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत होते.
एनसीपीची एकहाती प्रचाराची धुरा ना. गणेश नाईकांनीच सांभाळली. नाराजांची समजूत काढण्यात आमदार संदीप नाईकांची कल्पकता कामी आली. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे संदीप नाईक दिसेल तो परिसर पायाखाली पिंजून काढत होते. महापौर सागर नाईकदेखील बेलापूर मतदारसंघातील अनेक प्रभागांमध्ये सातत्याने कार्यकर्त्यांसमवेत पायपीट करत होते.
राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका ऑक्टोबर महिन्यात होत आहे. नवी मुंबई परिसर हा एनसीपीचा बालेकिल्ला गणला जायचा. पण आता तशी परिस्थिती राहीलेली नाही. पूर्वीची शिवसेना आणि आताची शिवसेना जमिनआसमानचा फरक पडलेला आहे. विजय नाहटा, वैभव नाईकांसारखी मंडळी आता शिवसेनेच्या छावणीत आहेत. विजय चौगुलेंसारखे नेतृत्व आता राजकारणातील उन-वारा-पाऊसातून चांगलेच तावून सुलाखून निघाले आहे. नगरसेवकांची संख्या वाढत चालली आहे. चौगुले यावेळी उमेदवार नसल्याने व प्रचार अभियानाची धुरा स्वत: सांभाळत असल्याने बोनकोडेकरांना शिवसेनेतील ‘बिभीषणांना’ पाहिजे त्या प्रमाणात मॅनेज करणे जमलेच नाही आणि चौगुले दैनंदिन स्वरूपात आढावा घेत असल्याने कोणी तशा प्रकारचे धाडसही दाखवू शकले नाहीत.
मनसेचा दबदबा आता पूर्वीइतका राहीला नसल्याचे प्रचार अभियानात स्पष्ट झाले आहे. मतपेटीतून मनसेच्या स्थानिक नेतृत्वाला आणि त्यांच्या पदाधिकार्यांना आपली जनसामान्यातील खरी ताकद समजण्यास मदत होईल. १६ मे नंतरच मनसेच्या हवेत चालणार्या पदाधिकार्यांना जनसामान्यात आपली काय गणना होत आहे या वास्तवाची जाण होवून त्यांचेही पाय जमिनीला टेकतील. किरकोळ-फुटकळ आंदोलने करून, मिडीयातील घटकांना सर-सर करून त्यांची दिशाभूल करून बातम्या छापून आणण्यापलिकडे मनसेवाल्यांनी फारसे भरीव काम केले नसल्याचे खुद्द मनसैनिकांकडून आता उघडपणे बोलले जावू लागले आहे. एनसीपी आणि शिवसेनेच्या तुलनेत मनसे कोसो मैल मागे असल्याचे निवडणूक निकालात स्पष्ट होणार असल्याची भीती मनसैनिकांकडून व्यक्त केली जावू लागली आहे.
आम आदमी पार्टी नवी मुंबईत नव्याने नावारूपाला येत चालली आहे. मुस्लिम आणि उत्तर भारतीय समाज मोठ्या संख्येने आम आदमी पक्षाच्या मागे उभा राहीला असल्याचे प्रचार अभियानात पहावयास मिळाले. नवी मुंबईचे ग्रामस्थ एनसीपीच्या तुलनेत शिवसेनेकडेच अधिक वळाल्याचे गावागावामध्ये पहावयास मिळाले.
फेसबुक आणि व्हॉटअप्देखील भूमिका लोकसभा निवडणूकीत महत्वाची ठरली. अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक काळात फेसबुक वॉरही लढले गेले. आता फक्त अंदाज काढण्याचे काम सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून सुरू झाले आहे. प्रभागाप्रभागात झालेल्या मतदानाची आकडेवारी मतदानाच्या दिवशीच रात्री उशिरापर्यत जागून जागृत कार्यकर्त्यांकडून काढण्यात आली आहे. पैजा लावण्याचे कामही वेगाने सुरू झाले आहे. अंदाजांच्या ठोकताळ्यावर आपल्या नेतेमंडळींना राजकीय माहिती पुरविण्याचे काम प्रामाणिक कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. चित्र १६ मे स्पष्ट होणार असले तरी राजकारणात मुरलेल्या अनुभवी कार्यकर्त्यांनी अंदाज वर्तविण्यास सुरूवात केली आहे. अधिकांश कार्यकर्त्यांनी खासगीत बोलताना आपल्या उमेदवाराचा पराभवही मान्य केला आहे.
कॉंग्रेसी घटकांनी आघाडीचा धर्म पाळला नसल्याचे नवी मुंबईत पहावयास मिळाले. कदाचित कोकणचा वचपा कॉंग्रेसवाल्यांनी नवी मुंबईत काढला, असे म्हणणेदेखील अतिशयोक्तीचे ठरणार नाही. कॉंग्रेसचे पदाधिकारी व नगरसेवकदेखील शिवसेनेप्रती बोलण्यामध्ये आत्मियता दाखवित होते. आता चावडी गप्पांमध्येही संशयकल्लोळचा प्रयोग जोरदारपणे सुरू आहे. कोण कितने पाणी और किसमेे है कितना दम याचे प्रत्यक्षात उत्तर उभ्या महाराष्ट्राला १६ मेलाच समजणार आहे, तोपर्यत अंदाज आणि चावडी गप्पा यामध्ये काय वाईट नाही. नाहीतरी आपल्या भारतात क्रिकेट आणि राजकारण हे असे दोन विषय आहेत की, ज्यामध्ये फारसे समजत नसले तरी अनेक तास बोलण्याची अधिकांश लोक क्षमता ठेवून असतातच की!