नवी मुंबई : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका संपून जेमतेम आठवडाभराचाच कालावधीपण लोटला नाही तोच नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात विधानसभेच्या निवडणूकांच्या चर्चा आणि संभाव्य भाकीतांना ऊत येवू लागला आहे. नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील विधानसभेच्या निवडणूका अटीतटीच्या होणार असल्या तरी ऐरोली विधानसभेची निवडणूक ही सर्वाधिक रंगतदार व बहूचर्चित ठरणार आहे. बालाजीच्या युवराजाशी अर्थात नवी मुंबईच्या ओबामाशी टक्कर घेण्यास कलशातले सम्राट वैभव नाईक संभाव्य उमेदवार राहण्याची शक्यता असल्याने या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.
कॉंग्रेस आणि एनसीपीमध्ये लोकसभा निवडणूकीमध्ये काही मतदारसंघात कुरबुरी झाल्या असल्या तरी ऑक्टोबरमध्ये येवू घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये आघाडी होण्याचीच अधिक शक्यता आहे. कॉंग्रेसच्या नवी मुंबईतल्या घटकांनी ठाणे लोकसभा निवडणूक प्रचारात एनसीपीशी पूर्णपणे असहकाराचीच भूमिका घेतली होती. मतदानाच्या दिवशी कॉंग्रेसचे मातब्बर घटकच शिवसेनेच्या उमेदवारांनाच मतदान करण्याच्या सूचना करत असल्याचे उघडपणे पहावयास मिळाले. त्यामुळे या निवडणूकीत एनसीपी विरूध्द सर्व राजकीय घटक असेच नवी मुंबईतील निवडणूकीचे चित्र राहीले. नवी मुंबईच्या राजकारणात प्रत्येक पक्षात बिभिषणांची संख्या जास्त असल्याने मागील काही निवडणूकांपासून हेच बिभिषण आपल्या पक्षाशी दगाबाजी करून इतर पक्षांना पोषक वागत असतात. फेसबुकवर आपली मार्केटींग करायची, आपल्या पक्षाच्या नेत्यांबरोबर फोटोसेशन करायचे आणि पडद्यामागच्या घडामोडीत आपल्या पक्षाची काशी करून पैशासाठी जे करायचे आहे तेच नेमके हे बिभिषण मंडळी ठरवून करत असतात. राजकीय व्याभिचार करून पक्षसंघटनेत वावरताना मात्र हीच मंडळी सतीसावित्रीचा आव आणत असतात, पण हा खेळ जास्त दिवस चालत नाही.
जागावाटपात विद्यमान उमेदवाराच्या निकषावर कॉंग्रेसने कितीही आदळआपट केली तरी या दोन्ही जागा एनसीपीच लढविणार, हे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. कॉंग्रेसच्या घटकांनी गतविधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत बंडखोरी करत ऐरोली, बेलापूर या दोन्ही जागा लढविताना एनसीपीपुढे प्रचारात अडथळे निर्माण करण्याची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे गतनिवडणूकीत त्रास देणारे कॉंग्रेसी याही निवडणूकीत कॉंग्रेसी त्रास देणारच याची अटकळ नामदारांसह नवी मुंबईच्या ओबामानेही मनाशी बांधलीच असणार.
ऐरोली मतदारसंघात खर्या अर्थांंने लढत शिवसेना आणि एनसीपी या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यातच होणार आहे. एनसीपीकडून ओबामाची अर्थात आमदार संदीप नाईकांची उमेदवारी निश्चित आहे. शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि युवा नेते वैभव नाईक हीच दोन नावे प्रबळ दावेदार मानली जात आहे. विजय चौगुले हे स्वत: निवडणूक रिंगणात असल्यावर फारशी करामत दाखवू शकत नाही, मात्र ते निवडणूक रिंगणाच्या बाहेर असल्यावर कुशल अन् कसलेल्या राजकारण्यांप्रमाणे निवडणूकीची समीकरणे सक्षमपणे सांभाळू शकतात, हे त्यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणूकीतील प्रचार अभियानावरून नवी मुंबईकरांना जवळून पहावयास मिळालेले आहे. विजय चौगुलेंनी प्रचार अभियानाची सूत्रे सांभाळल्याने शिवसेनेतील बिभिषणांच्या हालचालींनाही अनायसेच पायबंद बसला. काहींना इच्छा असूनही रामालय – मुक्तेश्वरांच्या जवळ जाता आले नाही. त्यामुळेच कलश आणि बालाजीमध्येच ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे सुकाणू सांभाळण्यासाठी अटीतटीचा संघर्ष होण्याची दाट शक्यता आतापासूनच निर्माण झाली आहे. राजकारणातील भाऊबंदकीचा संघर्ष उभ्या ठाणे जिल्ह्याला ऐरोली विधानसभेच्या कुरूक्षेत्रावर पहावयास मिळण्याची दाट शक्यता आहे.
वैभव नाईकांचा सध्या बोलबाला असला आणि वैभव नाईकांभोवताली युवा वर्गाचा गोतावळा असला तरी संदीप नाईकांच्या कसलेल्या रणनीतीपुढे आणि मातब्बर व्यूहरचनेपुढे वैभव नाईकांचा कितपत निभाव लागेल याबाबतचे उत्तर येत्या काळातच पहावयास मिळेल. १६ नोव्हेंबर २००२च्या महापौर निवडणूकीतील समीकरणात पडद्यामागून बजावलेली महत्वाची भूमिका, पालिकेच्या तिसर्या सभागृहात २००५ ते २०१० या कालावधीत स्थायी समितीच्या कारभाराची सक्षमपणे सांभाळलेली सूत्रे आणि ऑक्टोबर २००९ नंतर आमदार म्हणून केलेली वाटचाल हे राजकीय प्रवाहातील संदीप नाईकांचे तीन टप्पे जवळून पाहिल्यावर संदीप नाईकांचे नेतृत्व आता चांगलेच तावून सुलाखून निघालेले आहे. संदीप नाईकांच्या तुलनेत वैभव नाईकांपुढे अनुभवाचा निश्चितच वानवा आहे. संदीप नाईकांचा जनसंपर्क आणि मतदारसंघाच्या कानकोपर्यात सातत्याने केलेली पायपीट ही आजही संदीप नाईकांसाठी जमेची बाजू आहे. सभापती आपल्या प्रभागात, आमदार आपल्या दारी, पावसाळी पूर्व कामांची पाहणी, ठाणे-बेलापूर मार्गाच्या पाहणीसाठी पायपीट अशा विविध कारणास्तव संदीप नाईकांचा ऐरोली मतदारसंघाच्या कानाकोपर्यात वारंवार पायपीट झालेली आहे. नवी मुंबईच्या राजकारणात सध्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची फळी फोफावू लागली आहे. संदीप नाईकांना तशी गेल्या दोन दशकात सामाजिक व त्यानंतर राजकीय प्रवाहात वावरताना कधी गरज भासली नाही. संदीप नाईकांची गुप्तहेर यंत्रणाही तितकीच प्रभावशाली आहे. ना. गणेश नाईक, संजीव नाईक यांच्यापेक्षाही सामाजिक व राजकीय क्षेत्रात संदीप नाईकांची कामगिरी व तळागाळातील जनतेचे पाठबळ ही बाब नक्कीच काही प्रमाणात उजवी आहे.
वैभव नाईकांच्या नावाची हवा गेल्या काही महिन्यापासून नवी मुंबईच्या राजकारणात जोरदार वाहू लागली आहे. युवा वर्गात वैभव नाईकांची कमालीची क्रेज आहे. शिवसैनिकांचेही पाठबळ वाढत आहे. त्यामुळेच संदीप नाईकांच्या विरोधात शिवसेनेने वैभव नाईक उतरविल्यास ही लढत ठाणे जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षवेधी तसेच चुरशीची होण्याची दाट शक्यता आहे.