राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर अखेर शिवसेनेचा भगवा फडकला. शिवसेनेचे उमेदवार आमदार राजन विचारेंनी ठाणे लोकसभा मतदारसंघात तब्बल २ लाख ८१ हजाराचे मताधिक्य घेत गतवेळी शिवसेनेच्या झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली आहे. ठाण्याच्या गडावर पुन्हा शिवसेनेचा भगवा पुन्हा एकवार दिमाखात फडलेला पाहून स्वर्गलोकी असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचाही आत्मा निश्चितच सुखावला असणार.
ठाण्याचे आणि शिवसेनेचे एक भावनिक नाते आहे. गतलोकसभा निवडणूकीत एनसीपीच्या संजीव नाईकांनी शिवसेना उमेदवार विजय चौगुलेंचा केलेला पराभव शिवसैनिकांच्याच नाही तर खुद्द शिवसेनाप्रमुखांच्याही जिव्हारी लागला होता. ठाण्याचा गड गेल्याचे शल्य शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा जाहीरपणे बोलून व्यक्त केले होते. ठाण्याच्या गडावर तीन लाखाच्या आसपास मताधिक्य घेत शिवसैनिकांनी खर्या अर्थांने शिवसेनाप्रमुखांना श्रध्दाजंलीच वाहिली असल्याचे म्हणणेदेखील समर्पक ठरणार आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच ठाणे शहराने व ठाणेकरांनी शिवसेनेला भरभरून साथ दिलेली आहे. धर्मवीर आनंद दिघेंच्या परिश्रमामुळे ठाणे जिल्ह्याचा कानाकोपरा खर्या अर्थांने भगवामय होवून शिवसेनेचा बालेकिल्ला बनला होता.
ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणूकांमध्ये शिवसेनेचा वाढता प्रभाव पाहून धर्मवीर आनंद दिघेंनी ठाणे लोकसभेची जागा भाजपाकडून हक्काने मागून घेतली. त्यानंतर ठाण्याच्या जागेवर प्रकाश पराजंपे सातत्याने निवडून आले. प्रकाश पराजंपेंच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत त्यांचे पुत्र आनंद पराजंपेहेदेखील ९६ हजाराच्या दणदणीत मताधिक्क्याने विजयी झाले. लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेत अवाढव्य विस्तारलेल्या ठाने लोकसभा मतदारसंघाचे तीन लोकसभा मतदारसंघात विभाजन झाले. ठाण्यातून शिवसेनेने कोणताही दगड दिल्यास तो विजयी होतो, इतपत ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. हे माहिती असतानाही एप्रिल २००९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेनेने नवी मुंबईतील विजय चौगुलेंना रिंगणात उतरविले. ठाणेकरांनी चौगुलेंना स्विकारले नाही. त्यामुळे या नाराजीचा फायदा मनसेचे ठाणेकर उमेदवार राजन राजेंना मिळाला. त्यांना ठाण्यातून भरघोस मतदान झाले. एनसीपीच्या संजीव नाईकांनाही ठाण्यातून काही प्रमाणात मतदान झाले. परिणामी ठाण्यासारख्या हक्काच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा पराभव होवून या ठिकाणी ४९ हजार २००च्या मताधिक्क्याने एनसीपीचे संजीव नाईक विजयी झाले.
यंदाच्या लोकसभा निवडणूकीत ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना जय्यत तयारीनिशी उतरली. मुळातच ही जागा पुन्हा खेचून आणायची आणि ठाण्याच्या गडावर शिवसेनेचा भगवा फडकावयाचाच या इर्षेने शिवसेना गेल्या काही वर्षापासून शिवसेना इरेला पेटली होती. ठाण्याची जागा जिंकायचीच या उर्मीने शिवसैनिक पेटून उठले होते. आमदार राजन विचारेंसारखा तगडा आणि मातब्बर उमेदवार निवडणूकीत उतरविल्याने शिवसेनेचे मनसुबे तेव्हाच स्पष्ट झाले होते. ठाण्यात शिवसेनेचे आमदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार एकनाथ शिंदे असे तगडे आणि मातब्बर तीन आमदार असल्याने शिवसेनेला ठाणे शहरातील मतदानाची फारशी चिंताच नव्हती. मिरा-भाईंदरलाही प्रताप सरनाईकांचा करिश्माही शिवसेनेला अनुकुलच होता. शिवसेनेला खर्या अर्थांने ‘टेन्शन’ होते ते नवी मुंबईचे आणि नवी मुंबईकरांचेच! अर्थात ही भीती रास्तच होती.
गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबई परिसर हा ना. गणेश नाईकांचा बालेकिल्ला राहीलेला आहे. ना. गणेश नाईक बोले अन् नवी मुंबई डोले असे नवी मुंबईचे राजकीय समीकरणच राहीलेले आहे. नवी मुंबईत ऐरोली आणि बेलापुर असे दोन विधानसभा मतदारसंघ येत असून दोन्ही मतदारसंघात एकामध्ये आमदार संदीप नाईक तर दुसर्या ठिकाणी ना. गणेश नाईक हे स्वत: आमदार आहेत. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात एनसीपीचे ६० हून अधिक नगरसेवक आहेत. ठाण्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील मतदानाच्या आसपास नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर या दोनन विधानसभा मतदारसंघातील मतदान आहे. त्यातच शिवसेनेतील काही बिभीषणांना ना. नाईकांचा प्रारंभापासून असलेला ‘लळा’ शिवसेनेपुढील अडचणी वाढविणार्या होत्या. यावेळी मात्र नियतीलाच चमत्कार घडवायचा होता.
काश्मिरपासून ते थेट कन्याकुमारीपर्यत मोदी लाटेचाच प्रभाव होता. त्यात जैन समाजाचे असणारे उच्च सुशिक्षित नवी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त विजय नाहटा यांचा निवडणूकीअगोदरच शिवसेनेत झालेला प्रवेश आणि शिवसेनेने त्यांना बहाल केलेले उपनेतेपद यामुळे जैन समाजाची शिवसेनेशी सलगी मोठ्या प्रमाणावर वाढत गेली. भाईंदर आणि नवी मुंबईत जैन समाजाचा टक्का निर्णायक ठरला. नवी मुंबईत शिवसेनेच्या प्रचाराचे नियोजन पूर्णपणे विजय नाहटा यांनी सांभाळले. जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंनी रात्रीचा दिवस केला. निवडणूक काळात विश्रांती हा शब्दच चौगुलेंनी जणू शब्दकोषातून काढून टाकला असावा. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीचा दांडगा अनुभव स्वत: चौगुलेंना होताच. त्यांनी ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात प्रचाराची धुरा सांभाळली. विजय चौगुलेंच्या आक्रमक रणनीतीमुळे शिवसेनेच्या छावणीत बिभीषणांना फारसे धाडस दाखविता आले नाही. कधी नव्हे ती नवी मुंबई शिवसेना एकसंध आणि एकजीव होवून लढली. वैभव नाईकांच्या शिवसेना प्रवेशाने नवी मुंबईतील युवा वर्ग मोठ्या संख्येने वैभव नाईकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीला. शिवसेनेने यंदा प्रथमच नाक्यानाक्यावर, चौकाचौकात चौकसभा घेवून तळागाळातील जनतेशी सुसंवाद साधला. ऍड. मनोहर गायखेंनी आजारी असतानाही कामगार सेना, रिक्षा चालक, कामगार क्षेत्राच्या माध्यमातून छुप्पा प्रचार करत एनसीपीच्या नवी मुंबई गडाला आतून खिंडार पाडण्याचे काम जोमाने केले.
ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे, वैभव नाईक, सुरेश म्हात्रे, रंजनाताई शिंत्रे, विजय माने यासारख्या अनेक धुरींणांनी शिवसेनेच्या तळागाळातील पदाधिकार्यांना आणि शिवसैनिकांना सातत्याने प्रोत्साहीत करण्याचे काम केले. शिवसेना नगरसेवकांनीही आपापल्या प्रभागात ठिय्या मांडून आघाडी वाढविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. या सर्व बाबींचा मिलाफ झाला. एनसीपीच्या नवी मुंबईला खिंडार पाडत शिवसेनेच्या वाघांनी नवी मुंबईतून तब्बल ४७ हजाराच्या आसपास आघाडी देत शिवसेनाप्रमुखांचे ठाण्यावर भगवा फडकविण्यासाठी आपला सिंहाचा वाटा उचलला. नवी मुंबईतून शिवसेनेला आघाडी मिळण्यामागे उपनेते विजय नाहटा आणि जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंच्या परिश्रमाचा सिंहाचा वाटा कोणीही नाकारू शकणार नाही.
नवी मुंबई हा ना. गणेश नाईकांचा बालेकिल्ला असल्याने या ठिकाणी नाईकांचा अश्व रोखला तर ठाण्यावर भगवा फडकवणे अवघड नसल्याचे ओळखून शिवसेना उमेदवार आमदार राजन विचारेंनी प्रचारादरम्यान नवी मुंबईतच ठिय्या मांडला. ग्रामपंचायत निवडणूकीच्या धर्तीवर आमदार राजन विचारेंनी नवी मुंबईचा कानाकोपरा पिंजून काढला. सकाळी ६ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यत आमदार राजन विचारे नवी मुंबईत उपलब्ध झाल्याने शिवसैनिकांचा उत्साह वाढीस लागला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवार असो व मॉर्निग वॉक असो आमदार राजन विचारेंनी जनसंपर्काच्या बाबतीत कोठेही आळस केला नाही. टॉपच्या शिवसेना पदाधिकार्यांपासून ते ग्रासरूटच्या शिवसैनिकांपर्यत सर्वांनीच निवडणूकीत घरचे कार्य समजून काम केले. सर्वांना आदरणीय शिवसेनाप्रमुखांना ठाण्याचा गड जिंकूनच आदरांजली वाहायची होती.
तब्बल तीन लाखाच्या आसपास मतांनी विजय मिळवित आमदार राजन विचारेंनी ठाण्याच्या गडावर भगवा फडकवित शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार केले. सध्या मोदी लाटेमुळे भगव्याची हवा वाढीस लागली आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका येत आहे. एनसीपीचा नवी मुंबई बालेकिल्ला ढासळल्याने शिवसेनेत कमालीचा उत्साह संचारला आहे. ऐरोली व बेलापूरमध्ये शिवसेनेला चांगली आघाडी मिळाल्याने नवी मुंबईतील विधानसभेच्या दोन्ही जागा जिंकण्याची भाषा शिवसैनिकांकडून बोलली जावू लागली आहे.