संपूर्ण देशभरात भाजपाच्या नरेंद्र मोदीची लाट असल्याने सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचा देशाच्या कानाकोपर्यात दारूण पराभव झाला. आदर्शफेम अशोक चव्हाण यांच्या एकमेव विजयामुळे महाराष्ट्र कॉंग्रेसचे लोकसभेत नाममात्र का होईना अस्तित्व पहावयास मिळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दारूण पराभव झाला असून ठाणे लोकसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार अभिजित पानसेंचा दारूण पराभव झाल्याने मनसेचे इंजिन कायमचेच कारशेडमध्ये रवाना झाल्याचे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात उपहासाने बोलले जात आहे. मनसेच्या उमेदवाराचे डिपॉझिटच जप्त झाल्याने नवी मुंबईच्या मनसेच्या छावणीत दिवसभरात स्मशानशांतता पहावयास मिळाली.
गतलोकसभा निवडणूकीत मनसेचे उमेदवार राजन राजेंनी तब्बल १ लाख ३४ हजार मते घेतल्याने यंदाच्या निवडणूकीत मनसेचे उमेदवार दोन-अडीच लाख मतांचा टप्पा पार करणार का, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. विधानसभा निवडणूकीतही ठाणे लोकसभा कार्यक्षेत्रात मनसेच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतदानामुळे अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यातच नवी मुंबईतही मनसेचा मिडीयाच्या कुबड्यांनी बोलबाला वाढीस लागला होता. मनसे गतनिवडणूकीप्रमाणे नाही निवडून आली तरी पाडणार नक्कीच, इतपत दर्पोक्तीही नवी मुंबईच्या मनसेतील ‘बालिश’ बोलीबच्चन पदाधिकार्यांकडून करण्यात येत होती. गतविधानसभा निवडणूकीत मनसेचे उमेदवार राजेंद्र (पप्पू) महालेंना २० हजाराच्या आसपास मतदान झाले असल्याने व आता गजानन काळे तसेच त्यांचे सहकारी सक्रिय असल्याने नवी मुंबईतून मनसेला ५० हजाराचा मतदानाचा आकडा ओंलाडणे अशक्य नसल्याचे बोलले जात होते. मनसेतील काही घटक विधानसभा लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याचेही गेल्या काही महिन्यापासून उघडपणे पहावयास मिळत होते.
निवडणूक निकालात काय पहवायस मिळाले? शिवसेनेचे उमेदवार आमदार राजन विचारे हे तब्बल २ लाख ८१ हजार मतांच्या दणदणीत मताधिक्यांने विजयी झाले. शिवसेनेच्या आमदार राजन विचारेंना ५ लाख ९५ हजार ३६४ इतके दणदणीत मतदान झाले. एनसीपीचे उमेदवार संजीव नाईक यांना ३ लाख १४ हजार ६५ मते मिळाली. मनसेला अवघ्या ४८ हजार ८६३ मतांवर तर कालपरवा कार्यरत झालेल्या आम आदमी पार्टीच्या संजीव सानेंना ४१ हजार ५३५ मतांवर समाधान मानावे लागले. गतनिवडणूकीत १ लाख ३४ हजार मतदान घेणार्या व यंदाच्या निवडणूकीत मनसेसुप्रिमो राज ठाकरेंच्या नवी मुंबईतील घणसोली व ठाणे अशा दोन सभा घेणार्या मनसेला ५० हजार मतांचाही आकडा गाठता आला नाही.
लोकसभा निवडणूकीत जनाधाराच्या बाबतीत मनसेचे मोठ्या प्रमाणावर अध:पतन झाले. नवी मुंबईतील मनसे पक्षसंघटना आपल्याच खिशात घेवून वावरणार्या गजानन काळे आणि त्यांच्या सहकार्यांचेही मतपेटीतील मतदानावरून पाय नक्कीच
जमिनीवर आले असणार. आंदोलनाचा फंडा वापरून मिडीयाच्या माध्यमातून ‘मार्केटींग’ करून चार-दोन दिवसांची प्रसिध्दी मिळविता येते, पण सर्वसामान्यांनी आपल्याला नाकारले नाही तर झिडकारल्याचे यातून आता गजानन काळे आणि त्यांच्या सहकार्यांनी बोध घेतला पाहिजे. नवी मुंबईतून मनसेला झालेले कमी मतदानाची नैतिक जबाबदारी गजानन काळे व त्यांचे सहकारी कितपत स्विकारतात, याचे उत्तर आपणास येत्या काही दिवसात पहावयास मिळणार आहे.
नवी मुंबईतून मनसेला मोठ्या मतदानाची अपेक्षा होती. पण भ्रमाचा भोपळा फुटला. मनसेस्थापनेपासूनच नवी मुंबईत मनसेला फाटाफूटीचा शाप लागलेला आहे, तो आजतागायत कायम आहे. नवी मुंबई मनसेत कालही गटबाजीचे राजकारण होते आणि आजही आहे. चळवळीत रमणार्या आणि जनसामान्यांसाठी झटणार्या गजानन काळेंकडून खूप अपेक्षा होत्या. पण काळेंसारख्या ‘चळवळ्या’ नेतृत्वालाही बडव्यांचा विळखा पडला आणि हे नेतृत्व त्यातच अडकून पडले. यामुळे काळेंचे आणि मनसेचे अध:पतन झाल्याचे नवी मुंबईत मनसेला झालेल्या मतदानावरून स्पष्टपणे पहावयास मिळत आहे.
मनसेकडून झालेली जनआंदोलने आणि मिडीयाकडून त्याला मिळालेली वारेमाप प्रसिध्दी यामुळे नवी मुंबईतील मनसे घटकांच्या डोक्यात हवा गेली. त्यांचे वारू जमिनीवर आलेच नाही. मुळात ही जनआंदोलने कितपत जनहिताची होती आणि कितपत स्वहिताची होती, हाच मुळी एक संशोधनाचा भाग होता. मुळात टोलप्रकरणी मनसेसुप्रिमो राज ठाकरेंनी महाराष्ट्रभर ‘रास्ता रोको’चे आदेश दिल्यावर नेरूळ सेक्टर २४ येथील आगरी-कोळी भवनच्या जवळील पामबीच मार्गावरील गजानन काळेंचे आंदोलन वगळता मनसेच्या इतर जनआंदोलनांमध्ये फारसा दमच नव्हता. मनसेच्या जनआंदोलनात तेच ते तेच चेहरे पाहिल्यावर नवी मुंबईकरांचा या जनआंदोलनात फारसा सहभाग कधी दिसलाच नाही. प्रसिध्दीच्या हव्यासातून होत असलेली ही आंदोलने हा ठपकाच अल्पावधीत मनसेच्या आंदोलनाला बसल्याने नजीकच्या काळात मनसेच्या आंदोलनाला नवी मुंबईकरांनी फारसे गांभीर्याने घेतलेच नाही. घणसोली विभाग कार्यालयावरील मनसेच्या मोर्चात भाड्याने माणसे आणल्याची चर्चाही काही काळ मिडीयामध्ये रंगली होती. महाविद्यालयीन ऍडमिशन प्रक्रियेत होत असलेल्या अर्थकारणाच्या प्रकरणावरून तत्कालीन मनविसेतील आता मनसेतील निवडक व मोजक्या पदाधिकार्यांचे बदलते अर्थकारणही नवी मुंबईकरांच्या नजरेत तात्काळ पडले. त्यामुळे संबंधितांच्या कमाईचा फंडा नवी मुंबईकरांमध्ये रोष धरून बसला होता.
मोजक्या पदाधिकार्यांसोबत पोरकट आंदोलन करायची आणि सतत तोंड हलविणार्या वाचाळ गुटखाप्रेमी पदाधिकार्याच्या माध्यमातून मिडीयात बातम्या छापून आणायच्या, या प्रकाराला नवी मुंबईकर भुलले नसल्याचे नवी मुंबईतील मतमोजणीवरून स्पष्ट झाले आहे. घणसोलीत राज ठाकरेंची सभा झाली खरी, पण घणसोलीकरांनी राज ठाकरेंना, मनसेला व त्यांच्या गुटखापे्रमी पदाधिकार्याला कितपत स्वीकारले हेदेखील मतमोजणीत स्पष्ट झाले. सभेला जमलेल्यापैकी अर्ध्या लोकांनीही मनसेला मतदान केले नाही.
पाच वर्षापूर्वीचे मनसेचे मतदान आणि पाच वर्षानंतर मनसेला मिळालेले मतदान पाहील्यावर गजानन काळेंच्या नेतृत्वाखालील मनसे कोसो मैल मागे फेकली गेली असल्याचे मतमोजणीत स्पष्ट झालेे आहे. मनसेतील कामगार नेते विजय घाटे आणि मनविसेचे नवी मुंबई अध्यक्ष शिरीष पाटील यांचा आणि मनसे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळेंचा अद्यापि मनोमिलाफ झालेला नाही. मनसे जनहितचे अध्यक्ष शाहनवाझ खानदेखील गजानन काळे व त्यांच्या सहकार्यांपासून जाणिवपूर्वक चार हात लांब आहेत. मनविसे सांस्कृतिक ठाणे लोकसभा अध्यक्ष अमर पाटील व त्यांच्या सहकार्यांचादेखील गजानन काळेंशी मधल्या काळात अबोला होता.
मतमोजणीनंतर नवी मुंबईत मनसेला फारसा जनाधार नसल्याचे कागदोपत्री असणार्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मनसेला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. नवी मुंबईकरांमध्ये मनसेला फारसे स्थान नसल्याचे गजानन काळेंच्याही एव्हाना लक्षात आले आहे. आताच्या मतदानावर व पूर्वीच्या मतदानावर नजर टाकल्यास गजानन काळेंपेक्षा जितेंद्र कांबळींच्या नेतृत्वाखालील मनसेने चांगला जनाधार मिळवून दिल्याचे स्पष्ट होते.
विधानसभा निवडणूका लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या घटकांना या निकालातून व नवी मुंबईतून मिळालेल्या मतदानातून चांगलीच चपराक मिळाली असणार. मनसेला आता पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागणार आहे. निवडणूक काळात मनसेचे अनेक घटक बोनकोडेकडून मिळणार्या प्रेमाची चातकाप्रमाणे वाट पाहत असल्याचे पहावयास मिळत होते. मनसेच्या तुलनेत नव्याने राजकारणात आलेल्या आम आदमी पार्टीने चांगले मतदान घेतले आहे.
– सुजित शिंदे