ठाणे लोकसभा मतदारसंघातील एनसीपीचे डॉ. संजीव नाईक आणि शिवसेनेचे राजन विचारे यांच्यातील लढतीकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. शिवसेना आपला गड हिसकावून पुन्हा भगवा फडकवणार का बोनकोडेकर मंडळी आपला वरचष्मा कायम ठेवणार याबाबत कमालीची उत्सूकता होती. पण मोदी लाटेत संजीव नाईकांचा तब्बल २ लाख ८१ हजाराहून अधिक मतांनी पराभव झाला. खिळखिळी पक्षसंघटना, कंत्राटदार-ठेकेदारांह खुशमस्कर्यांचाच सदोदीत जवळ असलेला गोतावळा, तळागाळातील जनतेशी तुटलेला सुसंवाद, बोनकोडेशी जवळीक असलेल्या नगरसेवकांना आलेला माज, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या विकासकामांची करावयाची गळचेपी याचा मिलाफ झाल्यावर दुसरे काय होणार होते? मोदी लाटेचे उदाहरण देवून आपल्या पराभवाचे समर्थन करून बोनकोडेकरांना चालणार नाही. विधानसभा निवडणूका तोंडावर येवून ठेपल्या आहेत. पराभवातून सावरून नव्याने जडणघडण ही बोनकोडेकरांना करावीच लागणार. कारण म्हतारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावता कामा नये. पराभवातून बाहेर येत तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी न झाल्यास आणि चुकांचा शोध व त्यातून बोध न घेतल्यास ऑक्टोबरमध्ये येवू घातलेल्या विधानसभा निवडणूकीत संजीव नाईकांपाठोपाठ ना. गणेश नाईकांना आणि संदीप नाईकांना घरी बसण्याची वेळ येण्याची दाट शक्यता आहे.
गेली तीन दशकाच्या नवी मुंबईकरांनी ना. गणेश नाईकांना प्रारंभापासूनच साथ दिलेली आहे. गणेश नाईक शिवसेनेत असो व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये. नवी मुंबईकरांनी सातत्याने ना. गणेश नाईकांची पाठराखणच केलेली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून आजतागायत त्यातील कारभारावर ना. गणेश नाईकांचाच अंकुश राहीलेला आहे. मग आज अचानक परिस्थितीत बदल कसा झाला, याचा वेळीच बोनकोडेकरांनी शोध घ्यावयास हवा. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात ५० पेक्षा अधिक नगरसेवकांचा ताफा दिमतीला असताना आणि तितकाच माजी नगरसेवकांचा गोतावळा दिमतीला असताना, नवी मुंबईत घरातीलच दोन आमदार कार्यरत असताना तीन लाखाच्या आसपास दणदणीत मतांनी संजीव नाईकांचा पराभव व्हावा आणि नवी मुंबईसारख्या बालेकिल्ल्यातच तब्बल ४७ हजार मतांनी दणदणीत पिछाडी मिळावी, यातच ग्यानबाची खरी मेख न समजण्याइतपत बोनकोडेकर असमजंस नक्कीच नाहीत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस कागदोपत्री वरकरणी बळकट वाटत असली तरी ती भक्कम पक्षबांधणी कधी वाटलीच नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोपीनाथ ठाकूर कधी सभा गाजविण्यापत, कार्यकर्त्यांना-पदाधिकार्यांना सामावून घेण्याइतपत सक्षम नेतृत्व कधी भासलेच नाहीत. अधिकांश नवी मुंबईकरांना गोपीनाथ ठाकूर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत, हे माहितीदेखील नसेल. भक्कम पक्षबांधणीचा फायदा जसा ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला झाला, त्याहीपेक्षा अधिक तोटा राष्ट्रवादी कॉंग्रेसला नवी मुंबईत झाला आहे. मोदी लाटेचा उदोउदो करून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकार्यांना लंगडी बाब शोधता येणार नाही अथवा पळवाटही काढता येणार नाही. काम करणारा माणूस असल्यावर त्याच्या विभागात कोणत्याही लाटेचा परिणाम जाणवत नाही, हे कुकशेत गावातील नगरसेवक सुरज पाटील यांनी दाखवून दिले आहे. काम करणार्या माणसाला मतदाररूपी जनता नक्कीच न्याय देतेच आणि त्याच्या कामाला मतपेटीतून स्वीकारतेच हे नेरूळ नोडमध्ये सुरज पाटील यांनी दाखवून दिले आहे. हॅट्रीकवीर नगरसेविका स्नेहा पालकर, हॅट्रीकवीर नगरसेवक नारायण पाटील, नगरसेवक रतन मांडवे, दिलीप घोडेकर, इंदूमती भगत, सतीश रामाणे यांच्या प्रभागात शिवसेनेचे धनुष्यबाण सुसाट असताना हा अश्वमेध नेरूळ पश्चिमेला केवळ राष्ट्रवादीमधून सुरज पाटील यांनीच अडविला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वच्या सर्व नगरसेवकांनी सुरज पाटील यांच्याप्रमाणे झोकून काम केले असते तर कदाचित मोदी लाटेला काही प्रमाणात नाही तर मोठ्या प्रमाणात नवी मुंबईच्या भूमीला थोपविणे राष्ट्रवादी कॉंग्रेसला शक्य झाले असते. बोनकोडेकरांच्या सभोवताली कंत्राटदार, ठेकेदार आणि स्वार्थी तसेच स्तुतीभाट मंडळींचा मोठ्या प्रमाणावर गेल्या काही वर्षात भरणा झाला आहे. बोनकोडेकरांच्या सभोवताली वावरणार्या मंडळींनीच आपला आर्थिक व राजकीय स्वार्थ साधण्यासाठी बोनकोडेकरांना सर्वसामान्य जनतेपासून दूर ठेवण्याचा एककलमी कार्यक्रम व्यापक प्रमाणावर राबविल्याचा फटका लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला पर्यायाने डॉ. संजीव नाईक यांना बसला आहे.
व्हाईट हाऊस, बालाजी गार्डन, बोनकोडे गावातील कार्यालयात तसेच जनता दरबारात पांढरी शुभ्र कपडे परिधान करून चमकेशगिरी करणार्या घटकांनी आपल्या निवासी परिसरात काय दिवे लावले आहेत याची बुथ वाईज आकडेवारी बोनकोडेकरांकडे उपलब्ध असणारच. निवडणूक कालावधीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ३०च्या आसपास नगरसेवक शिवसेनेच्या नेतेमंडळींशी व माजी मनपा आयुक्त विजय नाहटांशी संपर्क ठेवून होती. याचा बोनकोडेकरांना अखेरपर्यत सुगावाही लागला नाही. डॉ. संजीव नाईक पडले याचा जल्लोष शिवसैनिकांपेक्षा, शिवसेनेच्या पदाधिकार्यांपेक्षा राष्ट्रवादीतील गद्दारांनीच मोठ्या प्रमाणावर साजरा केला आहे, याचा अहवाल बोनकोडेकरांनी मागविल्यास त्यांच्या गोधडीला किती आणि कोठे कोठे ठिगळे लावावी लागणार आहेत, याचा त्यांना बोध होईल.
बोनकोडेकर प्रसिध्दी माध्यमातील प्रचार अभियानातही शिवसेनेच्या तुलनेत कमजोरच ठरले. त्यांचे स्वत:चे १२ पानी दैनिक मुखपत्र असतानाही निवडणूक काळात या मुखपत्राला बोनकोेडेकरांची ठामपणे बाजू मांडण्यात आणि विरोधकांना उघडे पाडण्यात अपयश आले.
ऑक्टोबर महिन्यात येवू घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांची विरोधकांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. बेलापूर आणि ऐरोलीत मिळालेल्या दणदणीत आघाडीने विरोधकांचे बाहू आता विधानसभा मतदारसंघातही भगवा फडकाविण्यासाठी संचारू लागले आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी खांदे पडल्यागत वावरू लागले आहेत. चार महिन्यावर येवून ठेपलेल्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी ही भूषणावह बाब नाही. विधानसभा निवडणूकीत कार्यक्षेत्र पूर्वीच्या तुलनेत लहान आहे. बोनकोडेकरांचे पुन्हा एकवार राजकीय खच्चीकरण करण्यासाठी कॉंग्रेस व शिवसेना स्थानिक पातळीवर पुन्हा एकवार एकत्रित येण्याची शक्यता आहे. बेलापूर मतदारसंघात शिवसेना उपनेते विजय नाहटा, उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे तर ऐरोली मतदारसंघात खुद्द जिल्हाप्रमुख विजय चौगुले, युवा नेते वैभव नाईक अशी एकाचढ एक दमदार नावे शिवसेनेच्या छावणीत उपलब्ध आहेत. राष्ट्रवादीच्या गद्दारांची त्यांना पुन्हा एकवार मनोभावे त्यांना साथ मिळण्याची दाट शक्यता आहे. बोनकोडेकरांना राजकीय चक्रव्यूहात कोंडी करण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. लोकसभेतील पिछाडीने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नैराश्येचे मळभ आले आहे. सर्वप्रथम कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास जागा करण्याचे व त्यांच्यातील नैराश्य झटकण्याचे काम ना. गणेश नाईक व युवा आमदार संदीप नाईकांना करावे लागणार आहे. नगरसेवक व पक्षीय पदाधिकार्यांची पुन्हा एकवार मोट जूळवून सांगड घालावी लागणार आहे. विरोधकांचा उत्साह कमालीचा दुणावला असून मिळालेल्या आघाडीमुळे ना. गणेश नाईकांसह आमदार संदीप नाईकांचा आपण पराभव करू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्यात प्रथमच निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे. राज्याची सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हातात आहे. साडे तीन महिन्याचा कालावधी उपलब्ध आहे. नवी मुंबईकरांच्या प्रलंबित समस्या सोडविणे व तळागाळात पुन्हा एकवार जनसंपर्क साधण्याची किमया बोनकोडेकरांना करून दाखवावी लागणार आहे. सध्या खूपच मोठा राजकीय संघर्ष ना. गणेश नाईक व त्यांच्या परिवाराला करावा लागणार आहे. कारण त्यांच्या विरोधात विरोधी पक्षातल्या लोकांसह राष्ट्रवादीतील गद्दारांचीही फौज मोठ्या प्रमाणात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी पर्यायाने बोनकोडेकरांसाठी येणारा काळ खूप संघर्षाचा आहे. पावलापावला काटे आहेत. सावलीगणिक विश्वासघातक्यांची फौज जवळ आहे. कोणावर विश्वास दाखवावा आणि कोणाला चार हात लांब ठेवावे याचा राजकीय धुक्यात अंदाज येणे अवघड आहे. वावटळीचा सामना करण्यासाठी थंड डोक्याने राजकीय रणनीती आखणे बोनकोडेकरांना गरजेचे आहे. कारण लोकसभेचा गड पडलाच आहे. विधानसभेचा गड पडल्यास एप्रिल २०१५मध्ये होणार्या महापालिका निवडणूकांत बोनकोडेच्या प्रभावाचे पर्व संपण्याचा धोका आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणूकीतील पराभव गोंजारण्यात आता काहीही अर्थ नाही. विधानसभा निवडणूकांचा विचार करून दुसर्या व तिसर्या फळीतील प्रामाणिक कार्यकर्त्यांनाच आता आघाडीची धुरा सोपवावी लागणार आहे.