लोकसभा निवडणूकीचे निकाल मोदीच्या लाटेमुळे देशभरात ‘नमो नमो’ राजकीय लाट आली आणि होत्याचे नव्हते झाले. राजकारणात रंकाचे राव झाले आणि राजाचे रंक झाले. नवी मुंबईच्या राजकीय सारीपाटावर ज्यांचा सुर्यास्त होणार नाही, असे छातीठोकपणे सांगितले जात होते, त्या बोनकोडेच्या साम्राज्यालाही खिंडार पडले. काम करूनही मोटी लाटेमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. संजीव नाईक तब्बल २ लाख ८१ हजारापेक्षाही अधिक मताधिक्क्याने पराभूत व्हावे लागले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या पदाधिकार्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मनोमिलाफच नसल्याने आघाडीची बिघाडी होवून नावाला कागदोपत्रीच आघाडी राहीली आणि प्रत्यक्षात मात्र कोकण असो वा ठाणे, सर्वत्रच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने परस्परांच्या विरोधातच कार्य केले. नवी मुंबईत कॉंग्रेसचा राजकीय प्रभाव यथातथाच राहीला आहे. महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणूकीत कॉंग्रेसच्या अखत्यारीत असलेले विरोधी पक्षनेते पदही शिवसेनेने हिसकावून घेतले. काही निवडक प्रभागांचा अपवाद वगळता सर्वत्रच कॉंग्रेसला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीत नवी मुंबईतील कॉंग्रेसी घटकांनी नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेचे जोमाने आणि उत्साहाने काम केल्याने त्यांनी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसशी असलेल्या वितुष्ठाचा हिशोब चुकता केल्याने कॉंग्रेसी गोटात समाधान पसरले असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी आपल्या पायावर कुर्हाड मारून घेतली आहे. ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी नजीकच्या काळात कॉंग्रेस पक्षाची अवस्था झाली तर त्यात कोणाला फारसे आश्चर्य वाटू नये.
एकेकाळी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून १९८५च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसी आमदार विजयी करणारा मतदारसंघ म्हणून महाराष्ट्रात या मतदारसंघाची ओळख होती. १९९०च्या विधानसभा निवडणूकीत बेलापूर विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाल्यानंतर कॉंग्रेस पर्व रसातळाला जाण्यास सुरूवात झाली. एकेकाळी नवी मुंबईत प्रभावशाली असणारी कॉंग्रेस आज नवी मुंबईत रसातळाला गेली आहे, ती प्रामुख्याने कॉंग्रेसी घटकांमुळेच. कॉंग्रेसचा पराभव करायची ताकद अन्य कोणामध्ये नाही, कॉंग्रेसचा पराभव केवळ कॉंग्रेसच करू शकते असे कॉंग्रेसबाबत बोलले जाते. नवी मुंबईच्या कॉंग्रेसच्या छावणीवर नजर टाकली असता त्यातील वस्तूस्थिती पहावयास मिळते. कॉंग्रेस नेते नवी मुंबईत नावारूपाला येत असताना कॉंग्रेसी पक्षसंघटना मात्र रसातळाला जात गेली. आजही नामदेव भगत, अनिल कौशिक, दशरथ भगत, संतोष शेट्टी , रमाकांत म्हात्रे असे मातब्बर कॉंग्रेसी पक्षसंघटनेत कार्यरत असले तरी त्यांचे प्रभावक्षेत्र किमान नवी मुंबई पातळीवर विस्तारण्यात त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा पडल्या आहेत. यामध्ये तर रमाकांत म्हात्रे आणि नामदेव भगत यांना पालिका निवडणूकीत पराभूत व्हावे लागले आहे. तसेच अनिल कौशिक यांना अमराठी भाषिकांचा अधिकांश भरणा असलेल्या वाशी सेक्टर १७ सारख्या परिसरातून आपली पत्नी सुदर्शना कौशिक यांना निवडून आणता आले नाही. संतोष शेट्टी सलग चार वेळा पालिका निवडणूकीत विजयी झाले असले तरी नेरूळ फेज-१च्या पुढे त्यांचे नेतृत्व विकसित झाले नाही.
महापालिकेच्या प्रथम सभागृहात कॉंग्रेसचे संख्याबळ समाधानकारक होते. अस्थिर राजकीय परिस्थितीमध्ये त्यांना काही विषय समित्यांची सभापतीपदे पदरात पाडता आहे. महापालिकेच्या दुसर्या सभागृहातही राजकीय अस्थिरता कायम असल्याने दोन्ही वेळा त्यांना उपमहापौरपदापर्यत मजल मारता आली. तिसर्या सभागृहात पालिकेचे प्रभाग वाढले तरी कॉंग्रेसला आपले संख्याबळ वाढविता न आल्याने त्यांना केवळ विरोधी पक्षनेतेपदावर समाधान मानावे लागले आणि चौथ्या सभागृहात तर कॉंग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही गमाविण्याची नामुष्की आली.
कॉंग्रेस पक्षातील नेत्यांच्या महत्वाकांक्षा आणि त्यांच्यातील गटबाजी कॉंग्रेसी पक्षसंघटनेला हानीकारक ठरली. आजही कॉंग्रेसमध्ये नामदेव भगत आणि दशरथ भगत ही गटबाजी उघडपणे पहावयास मिळतेच. नामदेव भगत आणि दशरथ भगत यांचा खर्या अर्थांने आजही मनोमिलाफ झालेला पहावयास मिळत नाही. दशरथ भगत हे प्रारंभापासूनच नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात अनिल कौशिक यांचे कडवट निकटवर्तीय समर्थक म्हणून ओळखले जातात. अनिल कौशिक आणि नामदेव भगत यांच्यातील मतभेदामुळे पालिकेच्या दुसर्या सभागृहात दोन्ही वेळा महापौरपदाचा घास कॉंग्रेसच्या तोंडाशी आलेला असताना कॉंग्रेसी गटबाजीमुळे त्यांना केवळ उपमहापौर पदावरच समाधान मानावे लागले. महापालिकेच्या दुसर्या सभागृहात तर उत्तर प्रदेश आणि गोव्यातील एकेकाळच्या अस्थिर राजकीय पार्श्वभूमीला साजेशीच परिस्थिती होती. सर्वाधिक संख्याबळ असणार्या कॉंग्रेस पक्षाला दुसर्या सभागृहात उपमहापौरपदासह विरोधी पक्षनेतेपदावर समाधान मानावे लागले होते आणि कमी संख्याबळ असणार्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र दिमाखात पाच वर्षे महापौरपद भूषविले होते. पालिकेच्या दुसर्या सभागृहात महापौरपदाच्या निवडणूकीत नामदेव भगतांचा पराभव होतो आणि उपमहापौरपदाच्या निवडणूक अनिल कौशिक विजयी होतात. कौशिक समर्थकांनी नामदेव भगतांचा महापौर निवडणूकीत पराभव घडवून आणल्याचे नवी मुंबईकरांनी जवळून पाहिले. राजकारणात हिशोब चुकता करण्याची संधी मिळतेच. १६ नोव्हेंबर २००२च्या महापौर निवडणूकीत ती संधी नामदेव भगत समर्थकांना उपलब्ध झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तब्बल ९ नगरसेवक डी.आर.पाटील यांच्या नेतृत्वाखाली फुटून कॉंग्रेसमध्ये दाखल झाले होते. कॉंग्रेसची सरशी होण्याचीच चिन्हे होती.पण प्रत्यक्षात काय घडले? १६ नगरसेवकांचे संख्याबळ असणार्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संजीव नाईकांनी तब्बल ४२ मते मिळाली. (संजीव नाईकच. कारण त्यांना त्या काळात डॉक्टर ही उपाधी मिळाली नव्हती.) कॉंग्रेसच्या अनिल कौशिकांचा महापौरपदाच्या निवडणूकीत दणदणीत पराभव झाला. उपमहापौर पदाच्या निवडणूकीत कॉंग्रेसचे रमाकांत म्हात्रे मात्र दणदणीत मतांनी विजयी झाले. कौशिक ज्याप्रकारे सुरूवातीला उपमहापौर झाले, तोच प्रकार १६ नोव्हेंबरला कायम राहीला, मात्र यावेळी कौशिक पराभूत झाले आणि उपमहापौरपदी रमाकांत म्हात्रे विराजमान झाले. कॉंग्रेसी गटबाजीचे पडसाद खाडीपलिकडे कॉंग्रेस प्रदेश पातळीवरदेखील उमटू लागले होते.
महापालिकेच्या तिसर्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अगोदर वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात कॉंग्रेसचा मेळावा भरला असता तत्कालीन प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांच्या उपस्थितीत, पक्षसंघटनेसाठी आपण दहा पावले आपण मागे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात नामदेव भगत मागे गेले की नाही, हे कोणास पहावयासा मिळाले नसले तरी आजही नामदेव भगत आणि कौशिक यांच्यात मनोमिलाफ झालेला नाही.
आज नवी मुंबईत कॉंग्रेसचे अस्तित्व मोजक्याच प्रभागात पहावयास मिळत आहे. ज्या ज्या ठिकाणी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक आहेत, त्या परिसराच्या बाहेर कॉंग्रेस पक्षसंघटना विस्तारलेली पहावयास मिळत नाही. अपवाद पालिका प्रभाग ६९चा. नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील मनोज मेहेर या कार्यकर्त्यांने आपल्या कामाने कॉंग्रेस पक्षाचे प्रभावक्षेत्र वाढविण्याचा प्रामाणिक प्रयास केला आहे.
कॉंग्रेस पक्षाच्या नवी मुंबईतील स्थानिक पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणूकीत आघाडीचा धर्म न पाळता शिवसेनेचे काम करत अनायसे शिवसेना वाढीला हातभारच लावला. शिवसेना नव्या जोमाने फोफावत आहे. शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विजय चौगुले, युवा नेते वैभव नाईक, ऍड.मनोहर गायखे, सुरेश म्हात्रे, विजय माने यांच्यासह अनेक रथी-महारथी तसेच विविध मातब्बर नगरसेवकांचा भरणा याशिवाय पालिका निवडणूक लढविण्यासाठी आतुर असलेल्या महत्वाकांक्षी पदाधिकार्यांचा भरणा आजमितीला शिवसेनेच्या छावणीत आहे. मग प्रश्न हा निर्माण होतो की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खच्चीकरण करण्यासाठी शिवसेनेला मदत करून कॉंग्रेसी घटकांनी साध्य काय केले? स्वत:चे जळके घर सावरण्याऐवजी अन्य उठाठेव केलेली वर्षभरावर येवून ठेपलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत कॉंग्रेसच्याच अंगलट येण्याची दाट शक्यता आहे. कुर्हाडीचा दांडा अन् गोतास काळ हा प्रकार काय असतो, ते कॉंग्रेसीना लवकरच समजेल.
कॉंग्रेस पक्ष आज खर्या अर्थांने अस्तित्वासाठी संघर्ष करत असून कॉंग्रेस पक्षाची सध्याची अवस्था ही बडा घर अन् पोकळ वासा होवून बसली आहे. आज कॉंग्रेस पक्षाच्या स्थानिक नेतेमंडळींनी व मातब्बर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पर्यायाने ना. गणेश नाईक व त्यांच्या परिवाराच्या विरोधात काम केलेले आहे. कॉंग्रेसचा प्रभाव त्यांच्या विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागाव्यतिरिक्त फारसा कोठेही नाही. लोकसभा निवडणूकीतील झालेला पराभव नाईक परिवाराच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. नवी मुंबई खाडीकिनार्यावर वसलेली असलेल्या येथील स्थानिक आगरी-कोळी लोकांना भरती-ओहोटीचा नियम माहितीच असणार. सध्या मोदी नावाची लाट आहे. लाट कधीही कायम टिकून राहणार नाही. उद्या लाट ओसरल्यावर मोदी करिश्मा कोणाला कितपत तारेल याबाबत अंदाज वर्तविणे अवघड आहे. आघाडी असतानाही विरोधात झालेले काम नाईक परिवार विसरणे शक्य नाही. कारण कलियुगात कोणी साधुसंत नाही.
कॉंग्रेसला नजीकच्या भविष्यात विधानसभा मतदारसंघ नवी मुंबईत मिळणे अवघड आहे. कारण आघाडीच्या निकषानुसार प्रस्थापित आमदारांच्या मतदारसंघाची अदलाबदल होणे अवघड आहे. त्यामुळे सध्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी पडझडीचा काळ आहे. एकमेकांच्या सोबतीने ‘तुझ्या गळा न् माझ्या गळा’ असे सूर आळविणे काळाची गरज आहे. उद्या राष्ट्रवादीने अन्य मतदारसंघात कॉंग्रेसची गळचेपी केल्यास नवी मुंबईतील कॉंग्रेसींना नाहक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम करावेच लागणार.
कॉंग्रेसी घटकांनी शिवसेनेला सहकार्य करून बोनकोडेकरांशी वितुष्ठ स्वीकारून आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. कॉंग्रेसला आपला पक्षसंघटनेचा विस्तार करावयाचा झाल्यास त्यांनी आता शिवसेना उमेदवाराला मदत करून एकप्रकारे शिवसेना विस्तारास हातभार लावला आहे. उद्या शिवसेना फोफावली तरी पालिका कार्यक्षेत्रात नाईक परिवार आपला प्रभाव कोणत्याही परिस्थितीत कमी करणार नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सुंदोपसुंदीत कॉंग्रेसची अवस्था निश्चितच ‘ना घर का, ना घाट का’ अशा स्वरूपाची होण्याची दाट शक्यता आहे.
– योगेश शेटे