लोकसभा निवडणूकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पार्टीच्या छावणीत वावरणार्यांमध्ये विधानसभा निवडणूकीच्या तिकीटासाठी महत्वाकांक्षा पहावयास मिळत होते. पण नमोच्या लाटेमुळे देशालाच राजकीय हादरा बसला. अनेक रथी-महारथी पालापाचोळ्यासारखे उडून गेले. भूकंपाचा झटकाच इतका मोठा होता की पराभूत आजही या धक्क्यातून सावरले गेले नाहीत. निकालापूर्वी विधानसभा लढविण्याची महत्वाकांक्षा बाळगणार्यांमधील अनेक घटक आता निकालानंतर काढता पाय घेवू लागले आहेत. मोदी लाटेचा प्रभाव आणि नवमतदारांची कळून चुकलेली मानसिकता याचा उघडपणे अंदाज आल्याने नवी मुंबई कार्यक्षेत्रात विधानसभा लढविण्याची महत्वाकांक्षा बाळगणारे आता एकदा नाही तर हजार वेळा नक्कीच विचार करतील.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून ऐरोलीतून विद्यमान आमदार संदीप नाईक आणि बेलापूरमधून आमदार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे नाव निश्चित आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मातब्बर नेत्या, विधानपरिषदेच्या माजी आमदार , महिला प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सौ. मंदाताई म्हात्रेंचेदेखील विधानसभा लढविणार असल्याच्या चर्चांना आता जोर पकडू लागला आहे. फेसबुकवरदेखील ‘अब की बार, मंदाताई बेलापुर की आमदार’ अशा पोस्ट गेल्या काही दिवसापासून रंगू लागल्या आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी असल्याने नवी मुंबईच्या दोनही मतदारसंघात कॉंग्रेसच्या मंडळींनी आघाडीच्या धर्माला जागायचे ठरविल्यास त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच प्रचार करावा लागणार आहे. मंदाताई म्हात्रें समर्थकांची प्रबळ महत्वाकांक्षा पाहता ताईंची भूमिका येत्या दोन-तीन महिन्यात काय राहणार याबाबतही नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता लागून राहीली आहे.
नामदेव भगत हेदेखील नवी मुंबईच्या राजकारणातील मातब्बर प्रस्थच! कट्टर कॉंग्रेसी अशीच नामदेव भगत यांची राजकारणात प्रतिमा आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणिस अशी त्यांची वाटचाल आहे. सर्वसामान्य कोळी परिवारात जन्म घेवून सिडको संचालकपदापर्यत त्यांनी गरूडभरारी मारलेली आहे. आगरी-कोळी भवनाची निर्मितीमागे नामदेव भगतांचे योगदान कोणीही नाकारू शकणार नाही. नामदेव भगत यांचीदेखील आमदार बनण्याची महत्वाकांक्षा लपून राहीलेली नाही. गतविधानसभा निवडणूकीत नामदेव भगत यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना १५ हजाराच्या आसपास मते मिळविली होती. नामदेव भगत कॉंग्रेस पक्ष सोडणार आणि शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा गेल्या महिन्याभरापासून रंगू लागल्या आहेत. शिवसेनेने विधानसभेचे तिकिट निश्चित केल्याशिवाय नामदेव भगत कोणताही निर्णय न घेण्याची शक्यता आहे. नामदेव भगत शिवसेनेत लवकरच प्रवेश करणार असल्याच्या पैजाही झडू लागल्या आहेत. नामदेव भगत यांचा नेरूळमधील आगरी-कोळी भवनात २० मे रोजी जल्लोषात साजरा झालेला वाढदिवस, त्यांच्या समर्थकांचा उत्साह आणि शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेच्याच शामियान्यातील अधिकांश ताफा या घडामोडीवर बोनकोडेकर नक्कीच बारीक लक्ष ठेवून असण्याची दाट शक्यता आहे.
सध्या मोदी लाट आणि भगव्याचा जल्लोष पाहता विधानसभा लढविण्यासाठी शिवसेनेतही अखेरच्या क्षणी सुंदोपसुंदी होण्याची दाट शक्यता आहे. ऐरोलीच्या तुलनेत बेलापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या छावणीत इच्छूकांची संख्या अधिक आहे. शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, ज्येष्ठ नगरसेवक व बेलापूर संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या नावाची बेलापूरमधील संभाव्य उमेदवार म्हणून शिवसेनेच्या छावणीत चर्चा जोर धरू लागली आहे. यासह अन्य नावेदेखील चर्चेत येतात, पण त्या नावांची शिवसैनिकच फारशी दखल घेत नसल्याने त्यांची नावे स्पर्धेतून अनायसेच बाद होतात. ऐरोलीमध्ये खुद्द जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि युवा नेते वैभव नाईक यांच्याच नावाची चर्चा असून वैभव नाईकांना विधानसभा तर चौगुलेसाहेबांना विधानपरिषद असे शिवसैनिकच बोलू लागले आहे. निवडणूकीतील प्रचार अभियानातील चौगुलेंनी बाहेर राहून सांभाळलेली नियोजनाची कला व बिभीषणांवरील वचक पाहता बेलापूर व ऐरोली जिंकावयाची झाल्यास चौगुलेंनी स्वत: उमेदवार न राहता प्रचाराची धुरा सांभाळावी आणि विधानपरिषदेवर जावे अशी भूमिका खुद्द शिवसैनिकांकडूनच मांडली जावू लागली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पार्टीमध्ये निवडणूक निकालानंतर शांतताच आहे. शोलेतील ए.के. हंगलचा एक संवाद आहे, – ‘इतना सन्नाटा क्यू है भाई’ अशीच काहीशी परिस्थिती आम आदमी पार्टी आणि मनसेच्या छावणीत आहे. निवडणूक निकालानंतर मनसेच्या बोलीबच्चन मंडळींचे पाय नक्कीच जमिनीवर आले असणार. हवेत गोळ्या मारून आणि अव्वाच्या सव्वा बाता मारून जनाधार मिळविता येत नसल्याचे नवी मुंबईतील मनसेकारांच्याही एव्हाना लक्षात आले असणार. निकालापूर्वी विधानसभा लढविण्याची स्वप्ने पाहणार्यांना मतपेटीतून जनाधारामुळे अगदी मनसेसुप्रिमोंच्याच भाषेत सांगावयाचे झाल्यास त्यांना त्यांची ‘औकात’ मतपेटीतून समजली असणारच.बेलापूरमधून शहरअध्यक्ष गजानन काळे, कामगार नेते विजय घाटे आणि जनहितचे शहर अध्यक्ष आणि मनसे स्थापनेपासून नवी मुंबई मनसेवाढीसाठी प्रयास करणारे अल्पसंख्याकांतील मातब्बर प्रस्थ हाजी शाहनवाझ खान यांची नावे चर्चेत आहेत. बेलापूर मतदारसंघातील मुस्लिम मतदारांची संख्या पाहता काळे-घाटेंच्या तुलनेत हाजी शाहनवाझ खानची उमेदवारी मनसेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. गतविधानसभा निवडणूकीत बेलापूरमधील मनसेचे उमेदवार राजेंद्र महाले यांच्या प्रचाराची धुरा हाजी शाहनवाझ खान यांनी सक्षमपणे सांभाळली होती. ऐरोली मतदारसंघात गजानन खबाले आणि निलेश बाणखिले याच दोन नावांची प्रामुख्याने विधानसभा लढविण्यासाठी मनसेच्या छावणीतील चर्चेत नावे आहेत. सदोदीत गुटखा चघळणारी गुटखाप्रेमी बालिश मंडळी विधानसभा लढविण्याच्या बाता मारत असली तरी गजाजनालाही त्यांच्या मर्यादा समजल्याने गुटखाप्रेमींनी आता बालिशपणाला मर्यादा घालणेच योग्य ठरेल.
आम आदमी पक्षाचा बोलबालाही निवडणूक निकालानंतर बर्याच प्रमाणात कमी झाला आहे. नवी मुंबईतील अधिकांश आरटीआय सम्राटांना आपचा असलेला लळा लपून राहीलेला नाही. यातील काही आरटीआय सम्राटांना विधानसभा आपकडुन लढायची खुमखुमी होती. निकालानंतर हेच आरटीआय सम्राट आपण त्यातले नसल्याचा आव आणू लागले आहे. शिवसेना, एनसीपी वगळता आप आणि मनसेमध्ये आतातरी विधानसभा लढविण्यासाठी फारसा उत्साह नसल्याचे उघडपणे पहावयास मिळत आहे.