योगेश शेटे
नवी मुंबई : २५ साव्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार संजीव नाईक यांचा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजन विचारे यांनी २ लाख ८१ हजारांचे मताधिक्य मिळवत दणदणीत पराभव केला.हा पराभव गेली अनेक वर्ष नवी मुंबईत सत्ता गाजविणार्या नाईक कंपनीच्या जिव्हारी लागला.त्यामुळे येत्या ऑक्टोंबर महिन्यांमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव डोळ्यांसमोर दिसत असल्याने नाईक कंपनीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून नवी मुंबई या शहरावर आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी एक नवीन खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईतील सिडकोच्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा २.५ एफएसआयच्या माध्यमातून पुनर्विकास, प्रकल्पग्रस्तांनी गावठाण विस्तारात केलेली बांधकामे नियमित करणे, गरजेपोटी बांधलेली घरे ही मूळ गावठाणांहून २०० मीटर परिघाच्या क्षेत्रफळाऐवजी ५०० मीटर परिघाच्या क्षेत्रफळापर्यंत नियमित करावीत, ४ एफएसआयच्या माध्यमातून एसआरआय अंतर्गत शहरातील झोपडपट्टीतील बांधकामे नियमित करुन पुनर्वसन योजना तातडीने मंजूर करणे, प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना मोफत किंवा अल्पदरात शालेय शिक्षण देणे, प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना सिडकोच्या सेवेत सामावून घेणे आदी प्रलंबित मागण्याचे निवेदन ऐरोलीचे आमदार संदीप नाईक व माजी खासदार डॉ.संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्ट मंडळाकडून सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांना देण्यात आले आहे.तसेच या प्रलंबित समस्यांची पूर्तता येत्या आठवड्याभरात न झाल्यास सिडको भवन,एमआयडीसी,कोकण भवन मुख्यालयावर २ जूनला मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे.आज इतकी वर्ष नवी मुंबईत नाईकांची एकहाती सत्ता घरातच मंत्रिपद,खासदार,आमदार,महापौर हि सर्व महत्वाची पदे असतानाही या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी नाईक कंपनीने नेहमी नवी मुंबईकराना दिलेले खोटे आश्वासन हा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॉ.संजीव नाईक यांचा झालेल्या मोठ्या पराभवाचा एक महत्वाचा भाग आहे.परंतु,लोकसभा निवडणुकीत घरातीलच खासदार पद गमावून बसविल्यामुळे नवी मुंबईकरांच्या प्रलंबित समस्यांबाबत सिडको प्रशासनाला निवेदन पत्र देऊन सिडको भवनवर मोर्चा काढण्याचा दिलेला इशारा हि एकप्रकारची नाईक कंपनीची नौटंकी असून त्यांना उशिरा आलेले शहाणपण असल्याचे नवी मुंबईकरांकडून सांगण्यात आले.
राष्ट्रवादीकडून ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि माजी खासदार डॉ.संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखाली २ जूनला नवी मुंबई करांच्या प्रलंबित प्रश्नांविरोधात सिडको भवन,एमआयडीसी,कोकण भवन मुख्यालयावर काढण्यात येणार्या धडक मोर्च्याची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.या संदर्भात राष्ट्रवादीच्या फेसबुक यंत्रणेकडून फेसबुकवर जोरदार प्रचारही सुरु करण्यात आला आहे.२ जूनच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करणारे राष्टवादीचे होर्डिंग फेसबुकवर पहावयास मिळत आहेत.नवी मुंबईत सत्ता राष्ट्रवादीची आणि मोर्चाही राष्ट्रवादीकडूनच काढला जात असल्यामुळे नवी मुंबई करांकडून फेसबुकवर राष्ट्रवादीच्या विरोधात विनोदी आणि जळजळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.कोणाविरुद्ध लढताय तुमचीच सरकार सिडको हि तुमचीच,मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर,म्हणजे आम्हाला अक्कल नाही नाईक साहेब उल्लू नका समजू जनता तुम्हाला माफ नाही करणार ,नाटके करणे बंद करा भरपूर केले तुम्ही आता वैतागलो आहोत या आशयाचे होर्डिंग फेसबुकवर राष्ट्रवादीच्या २ जूनच्या मोर्च्याच्या विरोधात पहायला मिळतात.तसेच कुणी येड्यांची जत्रा हा मराठी चित्रपट पाहिला नसेल तर त्यांनी २ जूनचा राष्ट्रवादीचा मोर्चा नक्कीच पहा अशा विनोदी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या मोर्च्याच्या विरोधात फेसबुकवर उमटताना दिसतात.