नवी मुंबई : योगेश शेटे
तुर्भे गावातील नवी मुंबई महानगर पालिकेचे सार्वजनिक शौचालय हे कचर्याचे मोठे आगार बनले असल्याने तुर्भे गावातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत चालली आहे.त्यामुळे गावातील नागरिकांकडून कमालीची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
तुर्भे गाव सेक्टर २२ येथील शितलादेवी मंदिराच्या मागे भूखंड क्र.१२८ जवळ महानगर पालिकेचे सार्वजनिक शौचालय असून या शौचालयाची मोठी दुरवस्था झाली आहे. हे सार्वजनिक शौचालय ३० ते ३२ वर्ष जुने असून मोडकळीस आले आहे.त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांकडून व कंत्राट दारांकडून या शौचालयात रेबिट,माती आणि कचरा मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येतो. त्यामुळे येथे कचर्याचे आणि मातीचे मोठे ढिगारे जमा झालेले पहावयास मिळतात. तसेच रात्रीच्या वेळी अंधारात काही घटकांकडून येथे उघड्यावरच माती आणि कचर्याच्या ढिगार्यांवर लघुशंका करण्याचे प्रकार सतत घडत आहे.त्यामुळे कचर्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. पालिकेच्या सार्वजनिक शौचालयाची मोठी दुरवस्था झाल्याने नागरिकांना सकाळ सकाळी प्रात: विधीसाठी दूरवर जावे लागत आहे.त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तसेच महानगर पालिकेने येथे सदर मालमत्ता नवी मुंबई महानगर पालिकेची आहे, या जागेवर कोणत्याही व्यक्तीने / संस्थेने अतिक्रमण केल्यास संबंधिताविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल याची गंभीर नोंद घ्यावी या आशयाचे फलक लावले आहेत. परंतु,पालिकेच्या या फलकांना वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या असून तेलाच्या डबेवाल्यांनी येथे मोठे अतिक्रमण केले आहे.तसेच बांधकाम व्यावसायिकांकडून व कंत्राट दारांकडून या शौचालयात रेबिट,माती आणि कचरा टाकण्याचा एककलमी कार्यक्रम अद्याप सुरूच असल्याचे आढळून येत आहे.या सार्वजनिक शौचालयाचे पुन्हा नव्याने नुतनीकरण करून हे सार्वजनिक शौचालय तुर्भे गावातील नागरिकांसाठी खुले करून देण्याची मागणी तुर्भे गावातील मनसेचे विभाग अध्यक्ष सुनिल तुकाराम पाटील यांनी अनेकदा महानगर पालिका प्रशासनाकडे मनसे,छत्रपती प्रतिष्ठान,श्री मांढरदेवी काळूबाई सेवाभावी संस्था आणि श्री मांढरदेवी काळूबाई मित्र मंडळाच्या माध्यमातून निवेदन पत्र देऊन लेखी केली.महानगर पालिका प्रशासनाकडून नेहमी मनसेचे विभाग अध्यक्ष सुनिल तुकाराम पाटील यांच्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली. मनसेचे विभाग अध्यक्ष सुनिल तुकाराम पाटील यांनी पालिकेच्या या सार्वजनिक शौचालयाच्या नूतनी करण्यासाठी २ ते ३ वर्ष पालिका प्रशासन दरबारी आपल्या चपला झिजवून सतत पाठपुरावा केला.परंतु,पालिका प्रशासनाकडून मनसेचे विभाग अध्यक्ष सुनिल तुकाराम पाटील यांची केवळ खोट्या आश्वासनावरच बोळवण केली जात असल्याचे पहावयास मिळाले..त्यामुळे तुर्भे गावातील नागरिकांकडून मनसेचे विभाग अध्यक्ष सुनिल तुकाराम पाटील यांच्या सुरु असलेल्या पाठपुराव्याचे तोंड भरून कौतुक केले जात असून महानगर पालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत मात्र नागरिकांकडून तीव्र शब्दात संताप व्यक्त केला जात आहे.