नमो नमोच्या लाटेमुळे देशभरात वेगळीच लाट आली आणि राजकीय क्षेत्रात होत्याचे नव्हते होवून बसले. जे अडवाणी-वाजपेयींना जमले नाही, ते नरेंद्र मोदींनी करून दाखविले.स्वबळावर सत्ता स्थापण्याइतपत संख्याबळ या लोकसभेत भाजपाला मिळाले. मित्रपक्षांचा हातभार असला तरी स्पष्ट बहूमताइतपत संख्याबळ भाजपाकडेच असल्याने मित्रपक्षांना ‘धक्का तंत्राचा’ तसेच ‘दबावतंत्राचा’ वापर करणे शक्यच नाही. लोकसभा निवडणूकीत नवी मुंबईचा विचार करता ऐरोली आणि बेलापूर विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला ४७ हजाराच्या आसपास मताधिक्य मिळाल्याने बेलापूर मतदारसंघ लढविण्यासाठी शिवसेनेच्या छावणीत अनेल इच्छूक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मुळात हा मतदारसंघ जागावाटपात गेल्यावेळी भाजपाला सोडण्यात आला होता. अद्यापि भाजपाने हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याबाबत अधिकृत कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. भाजपाला यंदा कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद मिळविण्याची महत्वाकांक्षा असल्याने शत-प्रतिशतचे धोरण पाहता आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुलुखमैदानी तोफ असलेल्या ज्येष्ठ नेत्या मंदा म्हात्रे यांच्या भाजपा प्रवेशाच्या जोरदार उठत असलेल्या वावड्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आजच्या घडीला बेलापूर मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची सूतरामही शक्यता नाही. त्यामुळेच ठाणे जिल्ह्यात बेलापूर विधासनभा मतदारसंघ शिवसेना-भाजपामध्ये कळीचा आणि वादाचा मुद्दा बनण्याची अधिक शक्यता आहे.
लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आणि नमो लाट अद्यापि न ओसरल्याने बेलापूरची तिकीट मिळाल्यास आमदारकी नक्कीच ही समीकरणे मनाशी ठरवित नवी मुंबई शिवसेनेच्या छावणीत बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेकांची नावे चर्चिली जावू लागली आहेत. शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अँड. मनोहर गायखेंपासून काही नगरसेवकांसह शिवसेना पदाधिकार्यांचाही इच्छूकांमध्ये सेना वर्तुळातच होणार्या चावडी गप्पांमध्ये समावेश होत आहे. त्यातच अधूनमधून वैभव नाईकांच्याही नावाचा समावेश होतच असतो. मुळातच बेलापूरबाबत भाजपाची कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर झालेली नसताना शिवसेनेतील बेलापूर लढविण्याबाबतच्या इच्छूकांची वाढती संख्या पाहता ‘बाजारात तुरी अन् भट भटणीला मारी’ अशा स्वरूपाचा प्रकार घडू लागला आहे.
भाजपा नेते सुरेश हावरे यांनी गतविधानसभा निवडणूकीत भाजपाकडून निवडणूक लढताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते गणेश नाईक यांना कडवी लढत दिली होती. अकरा हजाराच्या आसपास मतांनी त्यांना पराभूत व्हावे लागले. राजकारणात नवख्या असलेल्या सुरेश हावरेंनी गणेश नाईकांना प्रचारादरम्यान फोडलेला घाम पाहता नवी मुंबईकरांना सुरेश हावरेंच्या नेतृत्वाविषयी आशा पल्लवित झाल्या होत्या. गतविधानसभा निवडणूकीपूर्वी जेमतेम सहा-आठ महिने सक्रिय झालेल्या हावरेंनी मतपेटीत मारलेली मजल पाहता हावरे आगामी निवडणूकीत नक्कीच आमदार होणार असल्याचा आशावाद केवळ सेना-भाजपाच्या वर्तुळात नाही तर नवी मुंबईकरांमध्येही वर्तविला जात होता. पण हावरेंना बांधकामाचा पक्का अनुभव असला तरी राजकारणाचा मात्र त्यांचा नवखेपणाच होता. राजकीय विरोधकांनी कोंडी केली आणि हावरेंनी काही पावले नव्हे तर नवी मुंबईच्या राजकारणातच थंड होण्याची पाळी आली. हावरे ग्रामीण भागातून विधानसभा लढविणार असल्याच्या चर्चा आता नवी मुंबई भाजपाच्या पदाधिकार्यांमध्ये सुरू आहे.
सुरेश हावरे नवी मुंबईतील राजकारणातून अलिप्त होत गेल्याने भाजपाच्या छावणीत विधानसभा लढविण्याइतपत आणि ना. गणेश नाईकांना झुंज देण्याइतपत प्रबळ नेताच उपलब्ध नसल्याने हा मतदारसंघ पुन्हा भाजपाकडून शिवसेनेकडे जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली. परंतु नमो लाट आली आणि भाजपाच्या छावणीलाही बेलापूर आपण जिंकू शकतो, शिवसेनेला जागा देण्याची गरज नाही, हा आत्मविश्वास निर्माण झाला. एकीकडे बेलापूर लढविण्यासाठी शिवसेनेच्या छावणीत वाढत्या इच्छूकांची संख्या आणि बेलापूर न सोडण्याची नवी मुंबई भाजपा कार्यकर्त्यांची मानसिकता या पार्श्वभूमीवर बेलापूर मतदारसंघावरून शिवसेना-भाजपा युतीमध्ये काही प्रमाणात तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि आक्रमक प्रवृत्तीच्या रणरागिनी असलेली मुलुखमैदानी तोफ मंदा म्हात्रेंची सध्याची भूमिका नवी मुंबईच्याच नाही तर ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत बेलापूर मतदारसंघातून पक्षाने तिकीट न दिल्यास बंडखोरी करण्याचा अथवा इतर पक्षातून निवडणूक लढण्याचा मंदाताई म्हात्रे यांनी जाहीर इशारा दिला असून लढाईचे बिगूल फुंकले आहेच. मंदा म्हात्रे यांची भाजपाशी वाढती जवळीक असल्याच्या चावडी गप्पांना गेल्या काही महिन्यात उधान आले होतेच. मंदा म्हात्रे यांच्या भाजपा नेते गोपीनाथ मुंडे आणि विनोद तावडे यांच्याशी चर्चा सुरू असल्याच्या गप्पाही (कदाचित अफवाही) होतच होत्या. मंदा म्हात्रेंसारख्या मातब्बर नेत्यांनी जर भाजपामध्ये येत्या काळात प्रवेश केलाच तर भाजपा शिवसेनेला हा मतदारसंघ सोडण्याची सुतरामही शक्यता नाही.
भाजपा केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही निर्णायक आणि घवघवीत यश संपादन करायचे आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ मतदारसंघापैकी ११९ जागा लढवून हे यश मिळणार नसल्याची भाजपालाही जाणिव आहे. देवेंद्र फडणवीसारखा स्वच्छ प्रतिमेचा अभ्यासू अन् सक्षम चेहरा भाजपाकडे सध्या उपलब्ध आहे. केंद्रात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र ही घोषणा वास्तवात आणण्यासाठी जागावाटपामध्ये भाजपा कोणत्याही परिस्थितीत आक्रमकता दाखविण्याची दाट शक्यता आहे. गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे काय झाले, हा इतिहास शिवसेनेने जवळून पाहिला असल्याने शिवसेनादेखील गाफील राहण्याची सुतरामही शक्यता नाही. त्यातच महाआघाडीतील आरपीआय (आठवले गट), राजू शेट्टींच्या अन् महादेव जानकरांच्याही समर्थकांनाही काही जागा सोडाव्या लागणार असल्याने भाजपाला जागा वाढवून देण्याची शिवसेनेची मानसिकता नाही. आरपीआय, राजू शेट्टी अन् महादेव जानकर समर्थकांनाही शिवसेनेच्या १६९ मधूनच जागा देण्याची दाट शक्यता असल्याने भाजपाला स्वबळावर सत्ता आणण्याचे स्वप्न महाराष्ट्रात यंदाच्या विधानसभा निवडणूकीत तरी शक्य होणार नाही. त्यामुळे नमो लाटेचाच प्रत्यय देत शिवसेनेवर दबाव आणत काही जागा वाढवून घ्यायच्या आणि मिळालेल्या जागा निवडून आणून मुख्यमंत्रीपदावर दावा सांगायची खेळी भाजपा करण्याची शक्यता अधिक आहे.
विधानसभा निवडणूकीपूर्वी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होण्याची दाट शक्यता असून नवी मुंबई हा स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. बेलापूरची जागा आपणाकडे ठेवून किमान अर्ध्या नवी मुंबई जिल्ह्यावर वरचष्मा ठेवण्याची संधी भाजपा गमविणार नाही. नवी मुंबईत भाजपाचे अस्तित्व यथातथाच आहे. बेलापूर मतदारसंघातून आमदार निवडून आणून एप्रिल २०१५ होणार्या नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपाला संजीवनी देण्याचाही भाजपा नक्कीच विचार करणार. भाजपाचे नवी मुंबई महापालिकेत अवघे एकच संख्याबळ आहे. महापालिकेच्या पहिल्या व दुसर्या सभागृहात भाजपाला खातेही उघडता आले नव्हते. तिसर्या सभागृहात एकच नगरसेवक भाजपाचा होता. मंदा म्हात्रे जर नजीकच्या कालावधीत भाजपामय झाल्या तर त्यांच्या माध्यमातून भाजपाला नवी मुंबईत पाया रोवणे सहज शक्य जाणार असल्याने बेलापूरचा दावा भाजपा सोडण्याची शक्यता नसल्याचा विश्वास भाजपा पदाधिकार्यांकडून व कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.