सुजित शिंदे
नवी मुंबई :- लोकसभा निवडणूकीत नवी मुंबईत दणदणीत पिछाडीवर पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राजीनामा नाट्याचा कलगीतुरा कायम असून मनसेचे शहर सचिव ऍड. कौस्तुभ मोरे यांच्या राजीनाम्यापाठोपाठ त्यांच्या समर्थनार्थ मनसेचे नेरूळ विभाग अध्यक्ष सविनय म्हात्रेंसह अन्य तीन पदाधिकार्यांनी राजीनामे दिले आहेत. मनसेचे राजीनामे देणार्या घटकांनी मनविसेच्या पदाबाबतचा आपला लळा कायम ठेवल्याने ऍडमिशन कालावधीत विद्यार्थी सेवेचा ‘मोह’ त्यामागील कारण आता उघड होवू लागले आहे.
लोकसभा निवडणूकीपूर्वी हवेत वावरणारे आणि जनाधाराबाबत गमजा मारणार्या मनसेच्या जनाधाराची खरी ‘औकात’ नवी मुंबईकरांनी मतपेटीतून दाखवून दिली असली तरी नवी मुंबईतील मनसेचे घटक अद्यापि जमिनीवर येण्यास तयार नाहीत. लोकसभा निवडणूकीच्या काळात मनसेचे माजी शहर उपाध्यक्ष किशोर शेवाळे आणि महिला पदाधिकारी विद्या पावगे-किर्दत यांनी राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. नेरूळ पूर्वचे विभाग अध्यक्ष ऍड. मंदार मोरे यांनीदेखील निवडणूक कालावधीतच आपल्या पदाचा राजीनामा दिला. काही दिवसापूर्वीच मनसेचा सुशिक्षित चेहरा आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे गुरूवर्य विजय घाटेंनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला.
चार दिवसापूर्वी मनसेचे शहर सचिव ऍड. कौस्तुभ मोरे, उपविभाग अध्यक्ष बाळा पाटील,उपविभाग अध्यक्ष श्याम आरगडे,शाखा अध्यक्ष आशिष कुटे,शाखा अध्यक्ष दिनेश गवळी, शाखा अध्यक्ष ऋषिकेश तिडके, शाखा अध्यक्ष उमर देशमुख यांनी शहर अध्यक्ष गजानन काळेंच्या नेतृत्वप्रणालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाराजी व्यक्त केली होती.
ऍड. कौस्तुभ मोरेंनी मनसेच्या पदाचा राजीनामा दिला असला तरी मनविसेच्या ठाणे लोकसभा अध्यक्षपदाचा कार्यभार कायम ठेवला आहे. ऍड. कौस्तुभ मोरेंच्या समर्थंनार्थ परवा नेरूळ पश्चिमचे विभाग अध्यक्ष सविनय म्हात्रे, उपविभाग अध्यक्ष राकेश म्हात्रे, नेरूळगावचे शाखाध्यक्ष अनिकेत भोपी, जुईनगर प्रभाग ६५ चे अध्यक्ष जयेश मढवी यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
शुक्रवारी रात्री उशिरापर्यत नेरूळ पूर्वेकडील एसबीओच्या कार्यालयात मनसेचे संपर्कप्रमुख गिरीश धानुरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत नाराजांची भूमिका समजावून घेण्यात आले. अर्थकारणावरून आरोप-प्रत्यारोपही झाले. राष्ट्रवादीच्या एका आमदाराने मनसेला दोन कोटी रूपये दिल्याची चर्चादेखील या बैठकीत वादाचा मुद्दा बनली. त्यातच मनसे शहर उपाध्यक्ष निलेश बाणखिले आणि शहर चिटणिस संदीप गलुगडे यांची शाब्दिक बाचाबाची थेट ‘तुझ्या गळा-माझ्या गळा’पर्यत जावून पोहोचली. शहर अध्यक्ष गजानन काळे आणि संपर्कप्रमुख गिरीश दहाणूरकर यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने मनसेच्या पक्षसंघटनेतील शिस्तीची लक्तरे चव्हाट्यांवर आली. शनिवारी दिवसभर नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात बाणखिले आणि गलुगडेच्या वादाची आणि हमरातुमरीची चर्चा रंगतदार बनली होती. व्हॉट्स अपलादेखील चर्चा रंगतदार होत असताना शिवसेनेच्या सानपाड्यातील घटकांनी या स्वरूपाचा मेसेज फारवर्ड करण्यात धन्यता मानली. शिवसेनेच्या सानपाड्यातील घटकांचा या वादातील पुढाकाराविषयी आपण चोख प्रत्युत्तर देवू असा संताप मनसे व मनविसेच्या घटकांकडून व्यक्त केला जात आहे. विजय चौगुले आणि ऍड. मनोहर गायखे वादाकडे आम्ही दुर्लक्ष केले, पण यापुढे सेनेतील बारीक-सारीक प्रकरणे फेसबुक आणि व्हॉट्स अपवर टाकण्याचा इशाराही मनसेच्या वर्तुळातून देण्यात येत आहे.
नेरूळमध्ये बाचाबाची आणि मारामारीचे प्रकरण झाल्यावर संदीप गलुगडेंच्या घणसोलीतील निवासस्थानी रात्री उशिरापर्यत गलुगडेंची विचारणा करत ऐरोलीतील मुले फिरत असल्याने मनसेतील प्रकरण गुन्हेगारी विश्वापर्यत जावून पोहोचल्याची चर्चा नवी मुंबईत सुरू आहे.
मनसेच्या पदाधिकार्यांनी मनसेच्या पदाचा राजीनामा दिला असला तरी विद्यार्थी संघटनेचे आपणाकडे असलेले पद मात्र कायम ठेवले आहे. सध्या बारावीचा निकाल लागला असून दोन दिवसांनी दहावीचा निकाल लागणार आहे. विद्यार्थी संघटनेतील ठराविक पदाधिकार्यांची ऍडमिशन प्रक्रियेतील समाजसेवा आणि त्याबाबतचा त्यांचा लळा जगजाहीर असल्याने ते विद्यार्थी सेना कदापि सोडणार नसल्याचे उपहासाने बोलले जात आहे.
मनसेमध्ये अर्ंतगत धुसफुस वाढीस लागली असून शहर कार्यकारिणीतील पदाधिकारीच शहर अध्यक्ष गजाजन काळेंवर नाराज आहे. हे नाराजीचे लोण शहर कार्यकारिणीपासून शाखाध्यक्षांपर्यत पोहोचले आहे. पनवेलचे पदाधिकारी असलेले घटक आजही नवी मुंबई मनसेच्याच कार्यालयात ठिय्या मांडून बसलेले दिसतात. जुईनगरचे शाखाध्यक्षदेखील आपला विभाग सोडून पक्ष कार्यालयातच कायम दिसतात. गजानन काळेंनी पक्षाचे कार्यालय खासगी मालमत्ता केली असल्याचा आरेाप मनसेच्या पदाधिकार्यांकडून केला जात आहे.
गिरीश धानुरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ऐरोलीतील दत्ता मेघे कॉलेजच्या ऍडमिशनवरून मक्तेदारी प्रतिष्ठेचा विषय बनला असून त्यातूनच गलुगडे आणि बाणखिलेप्रकरण घडले. गलुगडे हे गजानन काळेंचे कडवट निकटवर्तीय समर्थक असतानाही काळेंनी याप्रकरणी घेतलेली बघ्याची भूमिका मनसैनिकांमध्ये दिवसभर उलटसूलट चर्चेचा विषय बनली आहे.