* नवी मुंबईतील हॉस्पिटल्सना सिडकोचे निर्देश
योगेश शेटे
वाशी : नवी मुंबईतील हॉस्पिटल्स व्यवस्थापनांनी सिडकोशी केलेल्या करारानुसार दारिद्ररेषेखालील व अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी राखून ठेवायच्या रूग्ण खाटांची माहिती सिडकोला येत्या ८ दिवसात कळवावी असे निर्देश सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी गुरूवारी दिले. सिडको भवनमध्ये बोलावलेल्या नवी मुंबईतील हॉस्पिटल प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते.
ज्या हॉस्पिटल्सना सिडकोने अल्पदराने भाडेतत्वावर भूखंड दिले आहेत, त्यांच्याशी करण्यात आलेल्या करारानुसार हॉस्पिटल व्यवस्थापनाने दारिद्रयरेषेखालील आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना अल्प दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. काही हॉस्पिटल्स या अटींचं पालन करत नसल्याबद्दलच्या तक्रारी सिडकोकडे आल्यामुळे भाटिया यांनी ही बैठक बोलावली होती.
हॉस्पिटल व्यवस्थापनांकडून माहिती मिळविण्याकरिता सिडकोने चंद्रशेखर वझे, डॉ. मृदुला फडके आणि वृक्षाली मगदूम यांची एक उपसमिती नेमली आहे. नवी मुंबईतील प्रत्येक हॉस्पिटलच्या व्यवस्थापन समितीवर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या बैठकीस महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल समुहाचे प्रतिनिधी, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, पंजाब केसरी हॉस्पिटल, माथाडी कामगार युनियन हॉस्पिटल आणि नवी मुंबई महानगर पालिका हॉस्पिटल यांचे प्रतिनिधी हजर होते. सहव्यवस्थापकीय संचालिका श्रीमती व्ही. राधा आणि सिडकोचे अन्य वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
सिडकोशी केलेल्या करारानुसार सर्व हॉस्पिटल्सनी स्वागतकक्षातील दर्शनी भागात रूग्णांसाठी असलेल्या खाटांची एकूण संख्या आणि त्यापैकी दारिद्रयरेषेखालील तसेच अल्प उत्पन्न गटातील नागरिक यांच्यासाठी राखून ठेवायच्या रूग्ण खाटांची संख्या यांचा तपशील प्रदर्शित करावा. तसेच ही माहिती सिडकोलाही कळविण्यात यावी. सिडको आपल्या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध करेल. सर्व हॉस्पिटल्सना सोयिस्कर ठरेल असा माहिती आराखडा सिडको लवकरच तयार करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोणत्याही हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या कामकाजात सिडको हस्तक्षेप करू इच्छित नाही म्हणून सर्व हॉस्पिटल्सनी कराराची पूर्तता कशा प्रकारे केली आहे याची माहिती सिडकोस पुरवावी, अशी विनंती भाटिया यांनी केली. याप्रसंगी हॉस्पिटल प्रतिनिधींनी आपआपल्या व्यवस्थापनांतर्फे राबविण्यात येत असलेल्या सामाजिक जबाबदारीच्या उपक्रमांची माहिती दिली. ही माहिती जनतेपर्यंत पोहचणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे सिडको आपल्या संकेतस्थळावरदेखील ही माहिती उपलब्ध करून देऊ शकेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
सिडकोने पावसाळ्याकरिता २४ तास सज्ज असा आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन केला असून उलवे इथे एक म्ब्युलन्स उपलब्ध करून दिली आहे. अतिवृष्टीमुळे उद्भवणार्या पूरसदृष्य परिस्थिती आणि पावसाळी अपघात अशा घटनांच्या वेळी नागरिकांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून सर्व हॉस्पिटल्सनी सिडकोला सहकार्य करावे. सिडकोच्या आपत्ती नियंत्रण कक्षाचा तातडीच्या मदतीसाठी फोन येताच आपल्या म्ब्युलन्सची सुविधा सिडकोला पुरवावी, असे आवाहन भाटिया यांनी यावेळी केले.
हॉस्पिटलच्या आवारात आरोग्य सुविधापूरक सेवा म्हणून एटीएम मशीन्स बसविण्यास सिडको अनुमती देईल तसेच हॉस्पिटल्सच्या प्रवेशद्वाराच्या जवळपास कुठलीही वाहने उभी करण्यात येऊ नये म्हणून त्यांना नो-पार्किंग झोन म्हणून घोषित करील. सिडको अधिकारी कक्षातील परिसरातील हॉस्पिटल्सच्या जवळपास सार्वजनिक केरकचरा साचू नये याची विशेष खबरदारी घेतली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.