सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका आता अवघ्या साडेतीन महिन्यावर येवून ठेपलेल्या आहेत. लोकसभा निवडणूकीत ठाणे मतदारसंघात झालेल्या दणदणीत पराभवानंतर विशेषत: नवी मुंबईत मिळालेल्या पिछाडीमुळे नवी मुंबईचे राजकीय सुप्रिमो असलेल्या बोनकोडेकरांचे पाय नक्कीच जमिनीवर आलेले असणार. महाराष्ट्राच्या राजकारणात फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी मारण्याची क्षमता असणारा नाईक परिवार यापूर्वीदेखील उभ्या महाराष्ट्राने २००४च्या विधासनभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत जवळून पाहिलेला आहे. बेलापूरची विधानसभा लढवायचीच या इर्षेने तसेच महत्वाकांक्षेने झपाटून शिवसेनेत अनेकजण गेल्या काही महिन्यापासून गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले आहेत. त्यातच मंदाताई म्हात्रेंसारखा मातब्बर मोहरा भाजपाच्या छावणीत आल्याने ही जागा लढविण्याची भाजपेयींची प्रबळ इच्छा पाहता भाजपा ही जागा शिवसेनेला सोडण्याची सुतरामही शक्यता नाही. भाजपाकडे तगडा उमेदवार असला तरी भाजपाची संघटनाबांधणी ही मुळातच नवी मुंबईत सुरूवातीपासूनच खिळखिळी राहीलेली आहे. त्यातच शिवसेनेला जागा न मिळाल्यास शिवसेना पदाधिकारी मंदाताई म्हात्रे यांना कितपत मनपासून सहकार्य करतील याबाबत प्रश्नचिन्ह कायमच आहे. शिवसेनेतील बिभीषणांना मॅनेज करण्याचा बोनकोडेकरांकडे दांडगा अनुभव असल्याने त्यांना महायुतीमधील शिवसेनेचे अधिकांश शिलेदार मॅनेज करणे त्यांना अवघड जाणार नाही. बेलापूरमध्ये गणेश विसर्जन करण्याची भाषा बोनकोडे विरोधकांकडून सातत्याने केली जात असली तरी बदलत्या राजकीय समीकरणामुळे बेलापूर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पर्यायाने ना. गणेश नाईकांचा पाडाव करणे अशक्य होणार असल्याचे राजकारणात बोलले जावू लागले आहे.
गतविधानसभा निवडणूकीत जागावाटपामध्ये सुरेश हावरेंकरीता भाजपाने ही जागा शिवसेनेकडून मागून घेतली. त्या जागेच्या बदल्यात गुहागरची जागा शिवसेनेला देणे भाजपाला भाग पडले. बेलापूरात भाजपाच्या हावरेंचा आणि गुहागरात शिवसेनेच्या रामदास कदमांचा पराभव झाला. गतविधानसभा निवडणूकीत भाजपाच्या सुरेश हावरेंनी ना. गणेश नाईकांची दमछाक करत कडवी झुंज दिली. मनसेच्या उमेदवारानी घेतलेली १९ हजार ५०० मते, कॉंग्रेसी बंडखोर नामदेव भगतांना मिळालेली १४ हजाराच्या आसपास मते यामुळे नाईकविरोधी मतांचे विभाजन झाले आणि नाईकांना ११ हजार मतांनी विजय मिळविणे सहज शक्य झाले. निवडणूकीपूर्वी सहा महिने अगोदर राजकारणात सक्रिय होवून सुरेश हावरेंनी दिलेली कडवी झुंज पाहता लोकांच्या त्यांच्याकडून आशा पल्ल्वित झाल्या खर्या, पण राजकारणाची झळ थेट हावरेंच्या चुलीपर्यत पोहोचल्याने हावरेंनी नवी मुंबईच्या राजकारणातून काढता पाय घेतला. हावरेंच्या सक्रियतेने नवी मुंबईत बहरलेला भाजपा हावरेंच्या उदासिनतेमुळे पानझड झालेल्या वृक्षाप्रमाणे भाजपा शांत झाला. भाजपाची नवी मुंबईतील शांतता पाहता आणि दुसरीकडे शिवसेनेची दरम्यानच्या काळातील वाढती आक्रमकता पाहता बेलापूरची जागा लढविण्यासाठी शिवसेनेच्या छावणीतून हालचाली सुरू झाल्या. शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, शहरप्रमुख विजय माने, ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे आदी नावांची इच्छूकांमध्ये जोरदार चर्चाही सुरू झाली. लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवाराला ऐरोलीतून २२ हजाराची आणि बेलापुरातून २५ हजाराची आघाडी मिळाल्याने दोन्ही जागा लढण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरू झाली. तथापि माशी शिंकली, राष्ट्रवादीतील नाराज मंदाताईंनी राष्ट्रवादीशी काडीमोड करत भाजपाशी घरोबा केला आणि निस्तेज झालेल्या भाजपाला नव्याने झळाळी प्राप्त झाली. भाजपाच्या छावणीत पुन्हा गमावलेला आत्मविश्वास प्राप्त झाला. मंदाताई म्हात्रेंच्या भाजपा प्रवेशाने भाजपा आता बेलापुरची जागा सहजासहजी सोडणार नसल्याचे स्पष्ट संकेत राजकारणात प्राप्त होवू लागले आहेत.
शिवसेनेने जागा लढविण्याची जय्यत तयारी केलेली असतानाच भाजपाने ही जागा लढविण्याचा अट्टहास कायम ठेवल्यास शिवसेना भाजपाला मनापासून कितपत साथ देणार याबाबत प्रश्नचिन्ह कायम निर्माण झाले आहे. ना. गणेश नाईकांना हटविण्यासाठी नाकीनऊ आले होते, आता कुठे शक्यता निर्माण झाली, तोच मंदाताईमुळे समीकरणात बिघाड झाला, उद्या मंदाताई निवडून आल्या तर भाजपा शिवसेनेला कधीही जागा सोडणार नाही, त्यामुळे बेलापुरातून ना.गणेश नाईकच निवडून आले तर पुढच्या निवडणूकीत तरी शिवसेनेला या जागेवर दावा करता येईल अशी कुजबुज शिवसेनेच्या छावणीत सुरू झालेली आहे.
ना. गणेश नाईक हे तसे पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच. छगन भुजबळ कॉंग्रेसवासी झाल्यावर विधानसभेतील गटनेते या न्यायाने विधानभवनात ना. नाईकांनी शिवसेनेची भूमिका खंबीरपणे सांभाळत शिवसेनेत आणखी पडझड होणार नाही याची काळजी घेतली होती. शिवसेनेचे निधीसंकलक म्हणून ना. नाईकांनी सक्षमपणे आपली भूमिका बजावली होती. नाईकांनी शिवसेना सोडल्यावरही शिवसेनेवर अथवा शिवसेनाप्रमुखांवर जाहीर कार्यक्रमातून अथवा खासगीतही कधी टीका न केल्याने नवी मुंबईतील शिवसैनिकांना तसेच शिवसेना पदाधिकार्यांनाही काही अंशी ना. गणेश नाईकांबद्दल ममत्व आहे. अनेक शिवसेनेचे पदाधिकारी व काही नगरसेवकदेखील आजही ना. नाईकांशी संपर्क ठेवून आहेत.
मंदाताईचा भाजपा प्रवेश आणि भाजपाने बेलापूर लढविण्याची केलेली तयारी पाहता बेलापूरच्या राजकीय समीकरणात बदल होण्याचे संकेत निर्माण झाले आहेत. कॉंग्रेसचा या मतदारसंघात प्रबळ नेतृत्वाअभावी फारसा प्रभाव नसला तरी कॉंग्रेसी मतदारांची बेलापूर मतदारसंघात संख्या लक्षणीय आजहे. मोदी पॅटर्नमुळे बेलापुरातील पिछाडी असली तरी लोकसभा निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर लगेचच त्या दिवसापासून बोनकोडेकरांनी विधानसभा निवडणूकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. पराभवाने खचून न जाता पराभवातून मार्ग काढणारा नाईक परिवार नवी मुंबईने १० वर्षापूर्वी जवळून पाहिला आहे आणि अनुभवला आहे. कॉंग्रेसी घटकांची नाराजी असली तरी भाजपाला सहकार्य करण्यापेक्षा मवाळ नाईकांना सहकार्य करण्याची कॉंग्रेसीची मानसिकता महायुतीच्या पर्यायाने भाजपाच्या वाटचालीत अडथळा ठरण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणूकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षसंघटनेने नव्याने टाकलेली कात, सेना-भाजपातील अर्ंतगत दुफळी, भाजपाला जागा गेल्यास शिवसेनेतील अधिकांश घटकाचे ना. नाईकांनाच पडद्याआडून सहकार्य मिळण्याची शक्यता, कॉंग्रेसीचा राग शांत करण्यात बोनकोडेकरांना आलेले काही प्रमाणात यश पाहता बेलापूरात गणेश विसर्जन करण्याचे विरोधकांचे स्वप्न येत्या विधानसभा निवडणूकीतही कायम राहण्याची शक्यता आहे.