संदीप नाईक अभिष्टचिंतन सोहळा विशेषांक :- ४ ऑगस्ट २०१४
संदीप नाईक, विद्यार्थीचळवळीत घडलेले नेतृत्व. स्वभावाने मितभाषी पण कामात वाकबगर असलेले नेतृत्व. संपर्कात आलेल्या प्रत्येकाचे काम करत राहणे आणि नामानिराळे राहणे हा संदीप नाईकांच्या स्वभावाचा स्थायी भाव. आपण काम केल्यावर जनता आपणाला लक्षात ठेवणारच, जे काम करत नाहीत त्यांनाच आपल्या कामाची व नावाची प्रसिध्दी करावी लागते, अशी संदीप नाईक यांची धारणा आहे.
ना. गणेश नाईकांसारखे महाराष्ट्रातील ख्यातनाम राजकीय व्यक्तिमत्वाच्या पोटी जन्म झाला असल्याने घरातच संदीप नाईकांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. माशाच्या मुलाला आणि कोळ्याच्या मुलाला कोणीही पोहण्यास शिकविण्याची गरज नसते. ते ज्ञान त्यांना उपजतच प्राप्त होते. संदीप नाईक आज आमदार जरी असले तरी ते थेट आमदार झालेले नाहीत. विद्यार्थी चळवळ, पक्ष संघटना, नगरसेवक, स्थायी समिती सदस्य, स्थायी समिती सभापती आणि त्यानंतर आमदार असा चढता क्रम संदीप नाईकांनी आपल्या वाटचालीत पादाक्रांत केलेला आहे. संदीप नाईकांनी बाटम टू टॉप वाटचाल केली असल्याने त्यांना राजकारणाचे आणि जनसामान्यांचे खाचखळगे इत्यंभूत माहिती झालेले आहेत.
पुण्यापाठोपाठ नवी मुंबईला विद्येचे माहेरघर संबोधले जाते. सुशिक्षितांनी राजकारणात का यावे या प्रश्नाचे उत्तर कोणास हवे असेल तर त्यांनी आमदार संदीप नाईकांच्या जीवनपटाचा जवळून अभ्यास करावयास हरकत नाही. पदामुळे माणसाला शोभा आली नाही पाहिजे, तर त्या माणसामुळे त्या पदाला आणि खुर्चीला शोभा आली पाहिजे, हे संदीप नाईकांनी आपल्या कृतीतून उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. राजाच्या पोटी राजाच जन्माला का यावा लागतो, हेदेखील संदीप नाईकांकडे पाहिल्यावर प्रगल्भ लोकांना तात्काळ समजून येते.
प्रत्येकजण सुधारणेचा आणि प्रगतीचा-विकासाचा चाहता आहे. सुधारणांचे, विकासाचे, प्रगतीचे प्रत्येकाला आकर्षण हे असतेच. संदीप नाईक हे राजकारणात कार्यरत असलेले उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्त्व आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तिंचे काम होणार असेल तर स्पष्टपणे संदीप नाईक होकार देतात. काम होत नसेल तर ते नाही म्हणून स्पष्टपणे सांगतात. लोकांना झुलवित ठेवणे हे संदीप नाईकांना उभ्या आयुष्यात जमले नाही आणि त्यांना जमणारही नाही.
व्हिडिओ कॉन्फरसिंगचा प्रयोग हा प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. घरबसल्या अथवा कार्यालयात बसून समोरच्या व्यक्तिशी सुसंवाद साधण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरसिंगचे उत्तम व्यासपिठ आहे. आपणाला युरेापिय देशातील प्रगतीचे नेहमीच आकर्षण असते. पण हीच प्रगती ऐरोली विधानसभा मतदारसंघात राबविण्याचा, आणण्याचा प्रामाणिक प्रयास आमदार संदीप नाईकांनी केला. आपल्या मतदारसंघातील रहीवाशांंना व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून थेट सुसंवाद साधता यावा, आमदार आणि मतदार यामध्ये कोणताही अडथळा निर्माण होवू नये म्हणून संदीप नाईकांसारख्या कल्पक नेतृत्वाने हा प्रयोग राबविला. मतदार आणि आपणात सातत्याने संपर्क राहावा, सुसंवाद घडावा यासाठी संदीप नाईक सातत्याने प्रयत्नशील राहीले आहेत.
संदीप नाईकांचा पालिकेच्या तिसर्या सभागृहातील सहभागही उल्लेखनीय राहीलेला आहे. सभापती आपल्या अंगणात ही मोहीम राबवून त्यांनी नवी मुंबईकरांशी घरटी संपर्क साधून नवी मुंबईतील नागरी समस्यांची माहिती जाणून घेतली आणि त्या सोडविण्याचा प्रयास केला. नवी मुंबईच्या उत्कर्षासाठी राबणार्या, परिश्रम करणार्या नवी मुंबईच्या ओबामाला अर्थात आमदार संदीप नाईकांना उदंड आयुष्य मिळणे नवी मुंबईसाठी गरजेचे आहे.
– सुजित शिंदे
नेरूळ