नवी मुंबई / प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सी.बी.डी. बेलापूर किल्ले गावठांण समोरील नूतन मुख्यालय इमारतीमधील आधुनिक सुविधा व तंत्र प्रणाली याबद्दल मुख्यालय उप आयुक्त जगन्नाथ सिन्नरकर, शहर अभियंता मोहन डगांवकर व सह शहर अभियंता जी.व्ही.राव यांनी विविध वृत्तपत्र व वृत्तचित्र वाहिन्यांच्या प्रतिनिधींशी माहितीप्रद सुसंवाद साधला.
नवी मुंबई महानगरपालिकेची नूतन मुख्यालय इमारत ही नवी मुंबई शहराचा लँडमार्क म्हणून ओळखली जाते. या इमारतीची आकर्षक रचना व येथील अत्याधुनिक सुविधा तसेच त्यामध्ये राखलेला पर्यावरणपुरक दृष्टीकोन यामुळे ‘ग्रीन बिल्डींग’ म्हणून आकारास आलेली ही इमारत विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि जनता यांच्याकडून नावाजली जात आहे. व्ही.जे.टी.आय., आय.आय.टी. तसेच देशभरातील विविध ठिकाणच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती यांनी याठिकाणी भेटी देऊन या वास्तुरचनेचे कौतुक केले आहे. अनेक वास्तुविशारद महाविद्यालयांचे विद्यार्थी याठिकाणी वास्तू रचनेचा वेगळा नमुना म्हणून या इमारतीचा अभ्यास करण्यासाठी भेटी देत असतात.
अशाप्रकारे वास्तुरचनेच्या दृष्टीने वेगळी असणार्या मुख्यालय इमारतीत नागरिकांची गैरसोय दूर होण्याच्या दृष्टीने एकाच छताखाली महानगरपालिकेच्या विविध विभागांची कार्यालये आणण्याचा प्रयत्न केला गेला असून याठिकाणी केंद्रीय वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आता अशाचप्रकारची वातानुकूलीत यंत्रणा वापरात असून त्यामुळे कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच आग लागण्याची दुर्देवी घटना घडल्यास केंद्रीय वातानुकुलीत यंत्रणा असल्यामुळे एकाचवेळी संपूर्ण यंत्रणा त्वरीत बंद करणे शक्य होते व त्यामुळे आग पसरण्यास प्रतिबंध होतो. याउलट ठिकठिकाणी स्वतंत्र वातानुकुलित यंत्रणा असल्यास ते शक्य होत नाही व बहुतांशी कम्प्रेसर स्फोट होऊन आग वाढत जाते. ही बाब लक्षात घेऊनच मंत्रालयातदेखील मध्यंतरी घडलेल्या आग लागण्याच्या दुर्घटनेनंतर आता केंद्रीय वातानुकूलित यंत्रणा कार्यप्रणाली वापरात आणण्यात आली आहे.
या नूतन मुख्यालय इमारतीत केंद्रीय वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित असून अत्याधुनिक बिल्डींग मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे त्याच्या वापरावर पूर्णत: नियंत्रण ठेवण्यात येत आहे. कोणत्या भागातील वातानुकूल यंत्रणा किती तापमानावर कार्यान्वित ठेवायची अथवा बंद करायची यांचे संपूर्ण नियंत्रण या प्रणालीद्वारे करण्यात येत असून आवश्यक असलेल्या भागातच दिवे लावणे अशाप्रकारे शक्य तेवढा वीजेचा कमीत कमी वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. बिल्डींग मॅनेजमेंट सिस्टिमसह येथील अग्निशामक यंत्रणा या संपूर्ण प्रणालीची तांत्रिक माहिती सह शहर अभियंता जी.व्ही.राव यांनी पडद्यावर संगणकीय प्रणालीद्वारे वृत्तप्रतिनिधींना करुन दिली. तसेच ई-टेंडरींग पद्धतीतील नव्या बदलांचीही माहिती दिली.
या इमारतीत उपलब्ध लिफ्टचाही मर्यादीत वापर करण्यात येत असून अगदी प्रसाधनगृहातील पाण्याच्या नळालाही सेन्सर बसविण्यात आल्याने पाण्याचा दुरुपयोग टाळण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अधिकार्यांची दालने तयार करताना काचेचा वापर करण्यात आल्याने आतील भागात उजेड येण्यास प्रतिबंध होत नाही.
ग्रीन बिल्डींग संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने या इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टींग तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्या प्रक्रियाकृत पाण्याचा उद्याने व प्रसाधनगृहात फ्लशींगसाठी वापर करण्यात येत आहे. त्याशिवाय याठिकाणी बायोगॅस प्लान्ट कार्यान्वित आहे. इमारतीच्या आतील भागातील वातावरण निसर्गत: शीत रहावे यादृष्टीने डी.जी.यू. प्रकारच्या विशिष्ट काचा बसविण्यात आल्या असून भोवतालच्या टेरेसवरही रिफ्लेक्टेड टाईल्स वापरण्यात आल्या आहेत. यामुळे बाहेरील उष्णता बाहेरच परावर्तीत होत असून वातानुकूलीत यंत्रणेसाठी वापरात येणार्या वीजखर्चात बचत होत आहे. या सर्व बाबींमुळे ग्रीन बिल्डींग मानकापर्यंत पोहचणारी ही पहिली शासकीय इमारत म्हणून नावजली जात आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र शासनामार्फतही ग्रीन बिल्डींग स्वरुपात इमारती उभारणेबाबत शासन निर्णय काढण्यात आलेला असल्याची माहिती शहर अभियंता मोहन डगांवकर यांनी दिली.
या इमारतीमुळे नवी मुंबईची शान निश्चितपणे वाढली असून नागरिक ज्याप्रमाणे या इमारतीचे कौतुक करतात त्याचप्रमाणे येथे काम करणार्या अधिकारी-कर्मचारीवृंदातही या वास्तूबद्दल अभिमानाची भावना आहे. वातानुकूलीत यंत्रणा ही कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणारी असल्याचे सर्वश्रुत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजातही यामुळे गतिमानता दृष्टीपथात येत आहे.
या इमारतीचे क्षेत्रफळ पुर्वीच्या मुख्यालय इमारतीपेक्षा १० ते १५ पटीने जास्त असून जुन्या मुख्यालय इमारतीच्या बाहेर असलेले ४ ते ५ विभाग या नूतन मुख्यालय इमारतीत एका छताखाली आलेले दिसून येतात. या विविध ठिकाणी असलेल्या विभागांच्या कार्यालयातील वीजखर्च व इतर उपयोगी बाबी लक्षात घेता विविध विभाग एकत्रितरित्या असलेल्या नूतन मुख्यालय इमारतीचा वीजखर्च तुलनेत जास्त अधिक नाही. त्यामुळे येथील वीजेचा आवश्यक तेवढाच वापर करण्याची संपूर्ण काळजी घेण्यात येत आहे व वीज बचतीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. यामुळे मागील महिन्याभरात प्रतिदिन साधारणत: ९०० युनीट वीज वापर कमी करण्यात यश आले असून वीज बचतीची अधिक कार्यवाही सुरु आहे.
मुख्यालय उप आयुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी मुख्यालय इमारतीच्या आवारातील संपूर्ण राज्याचे भूषण असणारा राष्ट्रध्वजाचे प्रतीक चिन्ह हा नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करणारा असून २२५ फूट उंचीच्या या ध्वजस्तंभाची नोंद सर्वात उंच ध्वजस्तंभ म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झालेली असल्याची माहिती देत ध्वजाचा यथोचीत सन्मान महानगरपालिकेकडून राखला जात आहे असे स्पष्ट केले. राष्ट्रध्वजाच्या ध्वजसंहितेतील नियमावलीपेक्षा याची संहिता वेगळी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रतिकात्मक ध्वज खाडीकिनारी मोकळ्या परिसरात असल्याने त्याठिकाणी कायम सोसाट्याचा वारा असतो. त्यामुळे ध्वजाची शिलाई उसविण्याचे प्रकार घडताना दिसतात. असे आढळल्यास हा ध्वज प्रतीकात्मक असला तरी तो बदलण्याची व्यवस्था केली जाते. पावसाळी कालावधीत जोरदार पाऊस व वार्यामुळे शिलाई उसविण्याचे प्रकार वाढल्याने याबाबत फ्लॅग फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेचे प्रमुख पदाधिकारी कमांडर के.व्ही. सिंग यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी असे प्रतिकात्मक ध्वज कारगील, हरियाना, लेह अशा ठिकाणी असून सारख्या भागातही असून त्याठिकाणी वादळी वारा आणि पावसात सलग तीन-चार दिवस हा ध्वज उतरविला जातो अशी माहिती मिळाली. त्यामुळे आपल्या परिसरातील हवामानाची परिस्थिती लक्षात घेता परवानगी घेऊन पावसाळी कालावधीत हा ध्वज केवळ दिवसाच फडकविण्याचा निर्णय घेण्यात आला असून २४ तास ध्वज फडकविण्याची जबाबदारी महानगरपालिका सक्षमतेने पार पाडणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ध्वज अधिक काळ टिकावा याकरीता विविध उपाययोजनांचा शोध सुरु असून सध्याच्या पॉलिस्टर कापडाऐवजी इतर कापड वापरणे शक्य आहे काय याचीही पाहणी केली जात आहे. सध्या या प्रकारचे प्रतिकात्मक ध्वज बनविणारे एकमेव उत्पादक आहेत. तथापि राज्याच्या खादी ग्रामोद्योग विभागाच्या अधिकार्यांशीही याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
नवी मुंबई महानगरपालिकेची नूतन मुख्यालय इमारत ही आकर्षक रचना, भूकंप प्रतिरोधक यंत्रणा, पर्यावरणपूरक ग्रीन बिल्डींग संकल्पना, बिल्डींग मॅनेजमेंट सिस्टीम अशा विविध बाबींमुळे देशातील महानगरपालिकांच्या इमारतीत आगळीवेगळी व स्वतंत्र ओळख निर्माण करणारी असून यामुळे नवी मुंबई शहराच्या नावलौकीकात लक्षणीय भर पडलेली आहे.