संदीप नाईक हे नाव एव्हाना नवी मुंबईच्याच नाही तर ठाणे जिल्ह्याच्या कक्षा ओलांडून राज्याच्या राजकारणात गरूडभरारी मारणारे नाव बनले आहे. मोठ्या वृक्षाखाली लहान वृक्षाची वाढ होत नाही, असे म्हणतात. पण संदीप नाईक त्यांच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, पर्यावरण क्षेत्रातील परिश्रमामुळे त्याला अपवाद ठरले आहेत. संदीप नाईकांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर, परिश्रमाच्या शिदोरीवर आणि जनसंपर्काच्या पाठबळावर आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. ‘रसाळ बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ हे संदीप नाईकांकडे पाहिल्यावर नवी मुंबईकरांना अनुभवयास मिळते.
आपल्या समाजात पावलापावलावर हल्ली निसर्गप्रेमी पहावयास मिळतात. त्यातले कथित किती आणि तथाकथित किती हा एक संशोधनाचा भाग असल्याने त्या वादात न पडलेलेच बरे! अनेक निसर्गप्रेमी संस्थाही त्यात योगदान देत असतात. ग्लोबल वार्मिगचा धोका ज्यांनी वेळीच ओळखला, त्यांनी निसर्गाचे महत्व जाणून पर्यावरण संवर्धनाला महत्व दिले. त्यापैकीच नवी मुंबईतील संदीप नाईक हे एक युवा नेतृत्व होय! ना. गणेश नाईकांनीदेखील नवी मुंबईत वृक्षसंवर्धनाचा पायंडा फार पूर्वीपासूनच पाडलेला आहे. आध्यात्माच्या भाषेत सांगावयाचेच झाले तर ‘वृक्षलागवडीचा दादांनी रचिला पाया, संदीप नाईकांनी चढविला कळस’. एमआयडीसी पट्टी व नवी मुंबईच्या अन्य भागात दादांनी सातत्याने वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन केल्याने आजची हरित नवी मुंबई आपणास पहावयास मिळते.
संदीप नाईकांचे शैक्षणिक, आध्यात्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात विविध पैलू पहावयास मिळतात. दूरदृष्टीचा गुण त्यांना उपजतच अनुवंशिकतेतून मिळाला असल्याने त्यांच्याकडे पाहिल्यावर आध्यात्माच्याच भाषेत सांगावयाचे झाल्यास ‘इवलासा वेलू गगनावरी गेला’ याशिवाय अन्य शब्दच उरत नाही. पावसाळा आल्यावर वृक्षारोपण करणे आणि वृक्षारोपणाचे फोटोसेशन करून मिडीयामध्ये प्रसिध्दी मिळविणे हा नवीनच फंडा आजच्या समाजजीवनात रूजू झाला आहे. पण आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम केल्यावर त्यातील किती वृक्षांचे संवर्धन झाले आणि किती वृक्ष मृत झाले याचा लेखाजोखाही घेण्याची कोणी तसदी घेत नाही. पण संदीप नाईक हे त्यालाही अपवाद ठरले आहेत. संदीप नाईकांनी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या वेळी भाषणामध्ये ‘दरवर्षी वृक्षारोपणामध्ये वृक्ष बदलतात, खड्डे मात्र तेच असतात’ अशी खंत व्यक्त केली होती. त्यात फार मोठा शोध आणि बोध घेण्यासारखा आहे. चमकेशगिरी करण्याकरीता वृक्षारोपण करणार्या घटकांना संदीप नाईकांनी कमी शब्दांमध्ये चपराक दिली आहे आणि तीही शालजोडीतून.
संदीप नाईक हे गेल्या काही वर्षापासून सातत्याने खर्या अर्थांने वृक्षारोपण करत आहेत, ते ‘ग्रीन होप’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून. हरित नवी मुंबईचा संकल्प त्यांनी सोडला आहे आणि तो ते नक्की पूर्ण करणार याची आम्हाला खात्री आहे. ते आमचे नेते आहेत म्हणून त्यांची बाजू घेत नाही. त्यांच्या क्षमतेवर, ध्येयावर, कार्यप्रणालीवर आमचा विश्वास आहे. ते बोलत नाहीत तर करून दाखवितातच, हे नवी मुंबईकरांनी जवळून पाहिले आहे आणि अनुभवलेलेही आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यावर संदीप नाईकांकडून वृक्षारोपणाचा नवी मुंबई कार्यक्षेत्रात व्यापक प्रमाणावर दिघा ते बेलापूरमध्ये कार्यक्रम घेतला जातो. शे-दोनशे नाही तर हजारोच्या नाही तर लाखोच्या संख्येने संदीप नाईक वृक्षारोपण करत असतात, इतकेच नाही तर वर्षभराच्या कालावधीत रोपण झालेल्या वृक्षांचे जतन आणि संवर्धन होईल याकडेही ते काटेकोरपणे लक्ष देत असतात. ज्या विभागातील स्थानिक लोकप्रतिनिधी अधिकाधिक रोपण केलेल्या वृक्षांचे जतन आणि संवर्धन करेल, त्यास पुरस्कार देवून पर्यावरण संतुलनात त्यांचा हातभार लागावा, वाढावा यासाठी संदीप नाईक त्यांना वेळोवेळी प्रोत्साहीत करत असतात.
मध्यंतरी आलेल्या त्सुनामीच्या लाटेमुळे खारफुटीचे महत्व पुन्हा एकदा जगासमोर अधोरेखित झालेले आहे. नवी मुंबई शहराची निर्मिती ही शासकीय गरजेतून खाडीकिनारी तसेच काही प्रमाणात खाडीवर भराव टाकून झालेली असल्याने नवी मुंबईकरांच्या डोक्यावर त्सुनामीच्या लाटेची टांगती तलवार कायम आहे. खारफुटीबाबत कळवळा असणारे पावलापावलावर अनेकजण आढळतात. त्यांचा हेतू, जिव्हाळा, परमार्थ किती स्तुत्य आणि किती अस्तुत्य या वादात कोणीही न पडलेलेच बरे! पण संदीप नाईकांनी नवी मुंबईच्या खाडीअर्ंतगत भागात दोन लाख खारफुटींच्या रोपांचे रोपण करत नवी मुंबईकरांचा आपणास कितपत जिव्हाळा आहे, हे कृतीतून करून दाखविले आहे.
जगाच्या अस्तित्वाला खरा धोका निर्माण होणार आहे, तो ग्लोबल वॉर्मिगमुळे. त्यापासून वाचायचे असेल आणि जगाचे पर्यायाने आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर पर्यावरणाचे संतलन टिकवावेच लागेल. हे संदीप नाईकांनी जाणल्यामुळेच त्यांना पर्यावरण समतोलाकरीता नवी मुंबईतून सुरूवात केली आहे. या भुतलावर राहणार्या मानवप्राण्यांनी संदीप नाईकांच्या पर्यावरणप्रेमाचा आदर्श घेवून निसर्गप्रेमाच्या आहारी गेले पाहिजे. वृक्ष जगविले, टिकविले अन् वाढविले तरच पुढच्या पिढीला आपणास चांगल्या, मोकळ्या आल्हाददायी वातावरणाचा वारसा भेट देवू शकू. आज पैसा आपणाकडे किती आहे याला काहीही महत्व नाही. आपल्याकडे वृक्षसंपदा किती आहे, आपण त्यात किती वाढ केली हे महत्वाचे असल्याचे संदीप नाईकांनी खासगीमध्ये वारंवार बोलताना आमच्या मनावर बिंबविण्याचा प्रयास केला आहे. ४ ऑगस्ट हा आमचे युवा नेते संदीपजी नाईकसाहेबांचा जन्मदिवस. वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी अशा आमच्या नेत्याला उदंड आयुष्य मिळणे हे जगाच्या भल्यासाठी गरजेचे आहे.
– अशोक गावडे
उपमहापौर
नवी मुंबई महानगरपालिका