* महापालिका आयुक्त, महापौर, उपमहापौरांनाही केले निमंत्रित नवी मुंबई : नेरूळमधील महापालिका प्रभाग ६९ मधील सेक्टर सहा परिसरात महापालिकेच्या उद्यान व क्रिडांगणाला आलेला बकालपणा व तेथील समस्यांची पाहणी करण्याकरीता महापालिका प्रशासनाने पाहणी अभियान राबविण्याची लेखी मागणी करत महापालिका आयुक्त, महापौर, उपमहापौरांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन नेरूळ तालुका कॉंग्रेसचे चिटणिस मनोज मेहेर यांनी केले आहे. नेरूळ सेक्टर सहा परिसरात शाळेसाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर (या प्रभागात एकही खासगी शाळा नसल्याने येथील मुलांना ऍडमिशनसाठी इतरत्र धावाधाव करावी लागत आहे.) स्थानिक जनतेला विश्वासात न घेता, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता उद्यान व क्रिडांगणाची निर्मिती केली असून पाच वर्षापूर्वीच पालिका प्रशासनाने या उद्यानाचे व क्रिडांगणाचे लोकार्पण केलेले आहे. उद्यानाला नामफलक असला तरी क्रिडांगणाला तानाजी मालुसरे क्रिडांगण हा नामफलक अद्यापि बसलेला नाही. आम्ही स्वखर्चाने क्रिडांगणाला नामफलक बसविण्याची लेखी निवेदबातून सतत परवानगी मागितली असतानाही पालिका प्रशासनाने कोणताही प्रतिसाद दिला नसल्याची नाराजी मनोज मेहेर यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे. नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील दहा हजाराहून अधिक लोकसंख्येला महापालिका प्रशासनाने हे एकमेव उद्यान व क्रिडांगण उपलब्ध करून दिलेले आहे. लोर्कापण झाल्यापासून महापालिका प्रशासनाने या उद्यान व क्रिडांगणाकडे कानाडोळा केल्याने उद्यान व क्रिडांगणाला बकालपणा आलेला आहे. मध्यंतरीच्या काळात उद्यानात कितीतरी महिने लोखंडी तुटक्या खेळण्यावरच मुलांना खेळण्याची पाळी आली होती. क्रिडांगण व उद्यानात ‘जॉगिंग ट्रॅक’ बनविण्यात आला असला तरी तेथील लाद्या ठिकठिकाणी उखडल्या गेल्या आहेत. उद्यानाच्या सुरूवातीच्या काळात संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियांनार्तगत सिमेंटचे बाकडे बसविण्यात आले होते. तथापि हे बाकडे तुटले असून त्याचे सांगाडेही गायब झाले आहेत. रहीवाशांना उद्यानात बसण्यासाठी पुरेसे बाकडेही नाहीत. मी उद्यानात स्वखर्चाने बाकडे बसविण्यासाठी सतत लेखी निवेदनातून परवानगी मागितली असता आपण त्याही मागणीला केराची टोपली दाखविली आहे. उद्यानात रहीवाशांना सतत डासांचा सामना करावा लागत आहे. उद्यानात व क्रिडांगणात अनेक समस्या आहेत. प्रत्यक्षात पाहणी केल्याशिवाय समस्यांचे गांभीर्य समजणार नसल्याने उद्यान व क्रिडांगणाकरीता पाहणी अभियान राबविण्याची मागणी मनोज मेहेर यांनी महापालिका आयुक्त, महापौर सागर नाईक, उपमहापौर अशोक गावडे यांच्याकडे स्वतंत्र लेखी निवेदनातून केली आहे.