नवी मुंबई : कोळी लोक आणि खाडीचा संबंध हा श्वास आणि शरीराचा आहे. खाडीतील माशांवर आपल्या परिवाराची उपजिविका भागविणारा कोळी समाज हा आतुरतेने खाडीत बोटी सोडण्यासाठी पावसाळ्यात नारळीपौर्णिमेची वाट पाहतच असतो. अवघ्या तीन दिवसावर नारळीपौर्णिमा आली असल्याने जेटीची साफसफाई आणि सुशोभीकरण, रंगरंगोटीला सुरूवात झाल्याने पामबीच मार्गालगतच्या सारसोळे जेटीवर पहावयास मिळाले.
नवी मुंबई विकसित झाली असली तरी नवी मुंबईत असणारे सारसोळे गावही आजही विकासप्रक्रियेपासून वंचितच आहे. सत्ताधार्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि प्रशासनाच्या उदासिनतेमुळे सारसोळे गावामध्ये आजही विकासाची पहाट कधी उगवलीच नाही. पालिका प्रशासन ते जनता दरबार या ठिकाणी सारसोळेचे ग्रामस्थ पाठपुरावा करून थकले, पण सत्ताधार्यांना आणि पालिका प्रशासनाला सारसोळे ग्रामस्थांप्रती आजही दयेचा पाझर फुटलेला नाही. सारसोळेच्या जेटीची दुर्रावस्था आजही कायमच आहे. सारसोळेच्या जेटीवर हायमस्ट अथवा वीजपुरवठा उपलब्ध झालेला नाही. रात्रीच्या अंधारात समाजकंठक सारसोळेच्या कोळी लोकांची जाळी जाळणे, बोटी पाण्यात उलट्या करून सोडणे, जाळी चोरणे असे प्रकार करत असल्याने सारसोळेचा कोळी समाज आज कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे. रात्रीच्या अंधारात समाजविघातक शक्तिंचा जेटी परिसरात वावर वाढत असून गैरप्रकार करणार्यांचा शोध नेरूळ पोलिसांना आजतागायत लागलेला नाही.
नवी मुंबईतील अन्य गावांच्या तुलनेत सारसोळे गाव आर्थिक परिस्थिती आणि विकासाच्या बाबतीत मागासच आहे. सारसोळेकर ग्रामस्थ मनाने गरीब असले तरी सणासमारंभाच्या बाबतीत अन्य गावांच्या तुलनेत श्रीमंतच आहेत. नवी मुंबईतील राजकारण्यांची श्रीमतांच्या दिवाळी जेटीवर हजेरी असली तरी सारसोळेकरांना त्याचे काहीही दु:ख वाटत नाही. आपल्या मनाची श्रीमंती जोपासत ते आपले नारळीपौर्णिमा, दहीहंडी, गणेशोत्सव, बामणदेवाचा भंडारा आदी कार्यक्रम जल्लोषात आणि उत्साहामध्ये साजरा करतच असतात.
पावसाळा सुरू झाल्यावर नवी मुंबईतील अन्य कोळी लोकांप्रमाणे सारसोळे ग्रामस्थांना मासेेमारी बंद करून आपल्या होड्या जेटीवर आणून ठेवाव्या लागतात. नारळीपौर्णिमेपर्यत मासेमारी बंद असल्याने सारसोळेचे कोळी जेटी परिसरात आपल्या होड्याची डागडूजी व रंगरंगोटी करताना पहावयास मिळतात. मासेमारीवर परिवाराची उपजिविका अवलंबून असल्याने घर चालवायचे कसे याचे गणित जुळविताना जीव धोक्यात घालून पावसाचा अंदाज घेत सारसोळेचे कोळी खाडीत अधूनमधून मासेमारी करण्यासाठी जातच असतात. मासे विकलेच नाही तर घर चालणार कसे? घरातील सदस्यांनी जगायचे कसे या प्रश्नांसमोर खाडीत उधान आलेले असतानाही ते मासेमारीचे धाडस करतात ते केवळ बामणदेवावर असलेल्या श्रध्देवरच. खाडीअर्ंतगत भागात असलेला आपला बामणदेवच मासेमारी करायला गेल्यावर खाडीमध्ये आपले रक्षण करतो, अशी सारसोळेकर ग्रामस्थांची आजही श्रध्दा आहे.
रविवारी, नारळी पौर्णिमा आली असल्याने सारसोळेच्या जेटीवर कोळी ग्रामस्थांची वर्दळ वाढू लागली आहे. गावातील युवा वर्गाने स्थापन केलेल्या कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून गेली ८ वर्षे नारळीपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सारसोळेच्या कोळीवाड्यापासून खाडीला नारळ अर्पण करण्यासाठी पालखी निघते. या पालखीमध्ये सारसोळेचा कोळीवाडा महिला, मुले, वृध्दांसह सहभागी झालेला पहावयास मिळतो. सारसोळेचे कोळी लोकांचे मिरवणूकीतला जल्लोष, उत्साह आणि नृत्यातील आनंद पाहिल्यावर कुबेरालाही आपल्या संपत्ती खुजी झाल्याचा या दिवशी भास होत असावा.
अवघ्या तीन दिवसावर नारळीपौर्णिमा आल्याने जेटीच्या परिसराची सफाई युवा ग्रामस्थांकडून सुरू झाली असून वाढलेले गवत काढणे, रस्ता मोकळा करणे, रांगोळी काढून जेटी परिसर सुशोभित करणे आदी कामांना वेग येवू लागला आहे. पामबीच मार्गावरून ये-जा करणारे वाहनचालक वाहने थांबून सारसोळेच्या कोळी लोकांचा जेटी साफसफाईतील उत्साह पाहताना आढळले.