दिपक देशमुख
नवी मुंबई : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील भीमाशंकरच्या लगतच्या माळीण गावाला आज जगभरात ओळख मिळाली आहे. ती ३० जुलै २०१४ रोजी सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी घडलेल्या दुर्घटनेमुळे. जिवितहानी, वित्तहानीचे आकडेच आपण शहरातील लोकांनी ऐकले. पण माळीण गावात काय घडले, तेथील लोकांनी काय अनुभवले, शासनाने काय मदत केली आणि कागदोपत्री माहिती काय व सत्य परिस्थिती काय याबाबतचा कानोसा घेण्यासाठी माळीण गावालाच भेट दिल्यावर प्रत्यक्षात पहावयास मिळते. माळीण गावाबाबतचे दुर्घटनेनंतरही १८ दिवसानंतरही वर्णन करावयाचे झाल्यास ‘माळीण गाव, काय खरे आणि काय खोटे, सर्वच अस्पष्टच!’ एवढ्याच शब्दामध्ये आपणास वर्णन करता येईल.
३० जुलै रोजी मुसळधार पाऊसात घडलेल्या निर्सगाचा प्रकोपामुळे माळीण गावाला नावलौकीक मिळाला खरा, पण त्या गावाला, गावातील ग्रामस्थांना, तेथील मातीला फार मोठी किंमत चुकवावी लागली. अर्थात हे कधीतरी होणारच होते. निसर्गाच्या अस्तित्वाला नाकारत मानवाने आपले अस्तित्व वाढविण्याचा प्रयास करत निर्सगाच्या संतुलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयास केल्यावर त्याची किंमत ही आज ना उद्या चुकवावी लागणारच! फक्त ती किंमत चुकविण्याची पाळी ३० जुलै रोजी माळीण गावाच्या नशिवी होती.
माळीण गावची पाहणी करण्याचा योग १६ ऑगस्ट रोजी आला. अर्थात माळीण गावाला भेट देण्यामागचा उद्देश वेगळाच होता. सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या हेतूने एक प्रयासही त्यामागे होताच. माळीण हे आदिवासी पट्ट्यातील भीमाशंकरच्या टापूतील गाव. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष ना. दिलीप वळसेपाटील यांचा हा मतदारसंघ. माळीण गावाकडे जात असताना रस्त्यांची दुर्रावस्थाच प्रामुख्याने प्रथम नजरेत आली. माळीण गाव विचारण्यासाठी कोणालाही थांबवा, अगदी किती किलोमीटर अंतरावर गाव आहे, याची कोणीही बिनचूक माहिती देते. माळीणच्या दुर्घटनेनंतर अनेकांचा राबता या ठिकाणी वाढला. पर्यटनस्थळाप्रमाणेच लोंढाच्या लोंढा आजही माळीण गावची पाहणी करण्यासाठी येत असल्याची माहिती आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांकडून मिळाली.
घोडेगाव सोडल्यावर डिंभे धरणाला वळसा मारतच आपणास माळीणकडे जाता येते. आपण पर्यटनासाठी कोकणात-गोव्यात जातो.अगदी गणपती पुळ्यालाही जातो. पण काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीची प्रचिती माळीण गावाला जाताना येते. डिंभे धरणाच्या परिसरातून जाताना या डोंगरटपट्ट्यावर निर्सगाने मुक्तहस्ते उधळण केलेली पहावयास मिळते. एकीकडे डोंणगरपट्टा आणि रस्त्याच्या बाजूलाच लागून डिंभे धरणाचे रस्त्याच्या समांतर दिशेपर्यत आलेले पाणी. सिनेमामध्ये परदेशातील चित्रीकरण आपण पहातो. पण आपल्याच भागात, आपल्याच मातीत निसर्गाने आपणाला दिलेल्या देणगीकडे आपले लक्षच आजवर गेले नाही याची खंत वाटते.
माळीण गावाबाबत, तेथील दुर्घटनेबाबत वर्तमानपत्रात बरेच काही वाचावयास मिळाले होते. पण मेल्याशिवाय स्वर्ग कळत नाही, असे का म्हटले जाते ते माळीण गावाला गेल्यावरच कळले. माळीण गावाकडे किती दुर्लक्ष जाते, दुर्घटनेबाबत किती गांभीर्याने काम केले गेले ते प्रत्यक्षात पहावयास मिळाले.
माळीण गावामध्ये घडलेल्या निसर्गाच्या प्रकोपामध्ये किती हानी झाली याबाबत स्थानिक तसेच प्रशासनाकडून दिल्या जाणार्या माहितीबाबत कमालीची तफावत पहावयास मिळते. घटनास्थळावर उपलब्ध असलेले प्रशासकीय अधिकारी ४० ते ४४ घरांना फटका बसला असल्याचे सांगतात, तर स्थानिक ग्रामस्थ ७०हून अधिक घरे गाडली गेली असल्याची माहिती देतात. दुर्घटना घडून गेल्यावरही १८ दिवसानंतर माळीण गावामध्ये वावरताना कमालीच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. शासनाकडून औषध फवारणी केली असून घटनास्थळी नागरीकांनी अधिक वेळ थांबू नये अथवा कोणत्याही वस्तूला हात लावू नये म्हणून सूचना फलकही लावण्यात आले आहे.
दुर्घटनेनंतर माळीण गावाच्या अस्तित्वावर कायमचेच प्रश्नचिन्ह लागले असले तरी माळीण गावातील लोक अजूनही काही प्रमाणात जिवंत आहेत. जे जिवंत आहेत, त्यांना माहिती विचारल्यावर डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे येत असल्याचे जवळून पहावयास मिळाले. माळीण गावात लेबे, झावरे , भोई याच आडनावाची माणसे असल्याचेपहावयास मिळाले. माळीण गावचे काम संपले असल्याचे वर्तमानपत्रात वाचावयास मिळाले. पण प्रत्यक्षात गेल्यावर प्रशासनाने जेमतेम २५ टक्केही काम केले नसल्याचे पहावयास मिळाले. मातीचे ढिगारे अजूनही उपसले गेले नाहीत. गाडली गेलेली घरे वरवर दिसतात, पण त्यामध्ये काय दडलेे आहे, त्याबाबत तपासणी करण्याचे सौजन्यही दाखविले जात नाही. अनेक मृतदेह ढिगार्यातच सडले गेले असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. माळीणच्या ग्रामस्थांना माळीणच्या मातीनेच आपल्या कुशीत सामावले, त्यांना अग्निदेखील मिळाला नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते. शाळेलगत असणार्या हनुमानाच्या मंदीराचे कोठेही नामोनिशाण पहावयास मिळत नाही. फक्त रस्ता साफ करण्यात आला आहे. गाळ, चिखल, मातीचे ढिगारे आजही जैसे थे अवस्थेतच आहे.
माळीणच्या कामाबाबत प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती आणि प्रत्यक्षातील वस्तूस्थिती यातील तफावत घटनास्थळीच गेल्यावर पहावयास मिळाली. प्रशासनातील काही अधिकार्यांनी ‘ऑफ द रेकॉर्ड’ दिलेल्या माहितीनुसार काम करताना अडथळेच खूप आले. पाऊस, दरड कोसळण्याचा धोका, सुटलेली दुर्गंधी , ढिगारे हटविण्यास उपलब्ध न झालेले मनुष्यबळ यामुळे अजूनही काम अपूर्णावस्थेतच आहे.
निसर्ग का कोपला, माळीणकरांवरच दु:खाचा डोंगर का कोसळला याची खातरजमा करण्यासाठी गुडघाभर चिखल तुडवित आमचे पथक डोंगराच्या उंचावर गेल्यावर ग्रामस्थांनी ठिकठिकाणी खासरे (भात लावणीची जागा) केल्याच्या खुणा पहावयास मिळाल्या. डोंगर पोखरून खासरे निर्माण करण्यात आली होती. खासरात पाणी साचून राहीले. मुसळधार पाऊस, खासरातले पाणी यामुळे डोंगराचाही अखेर संयम सुटला आणि माळीण गाव त्या दुर्घटनेत निसर्गाच्या स्वाधीन झाला. दुर्घटनेत वाचलेल्या काही घरांवर शासनाने चिपकविलेल्या नोटीसा पहावयास मिळाल्या. जे ग्रामस्थ या दुर्घटनेत वाचले, त्यांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. जे अनाथ झाले, त्यांना आधार देण्याचा प्रयास केला. क ारण त्याच कामासाठी आम्ही माळीणला गेलो होतो. माळीणवर आज दु:खाचा डोंगरकोसळला आहे. माळीणबाबतची वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी माळीणला प्रत्यक्ष जावून भेट देणे आवश्यक आहे. मृतदेहांबाबतही तफावत आहे. प्रशासनाची आकडेवारी काही वेगळे सांगते तर स्थानिक मात्र वेगळीच माहिती देतात. जन्म-मृत्यूची नोंद करण्याचे गांभीर्य न दाखविल्याचीही किंमत माळीणकरांना चुकवावी लागणार आहे. माळीणच्या भाळी आता ससेहोलपटच नियतीने लिहील्यामुळे तेथे गेल्यावर खरा प्रकार कळाला.पण एकाच शब्दामध्ये पुन्हा वर्णन करता येईल, ते म्हणजे ‘माळीण गाव, काय खरे आणि काय खोटे, सर्वच अस्पष्टच!’